गणेशोत्सवाच्या उत्साहाला पहिल्याच दिवशी गालबोट! गचाळ वाहतुकीने घेतला महिलेचा बळी; शांतता समितीमधील चर्चा फक्त कागदावरच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक एकता आणि परंपरेचा अद्वितीय सोहळा मानल्या जाणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ होवून जेमतेम 24 तास उलटायच्या आंतच शहरातून अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गचाळ वाहतुकीचे क्षेत्र म्हणून राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या येथील दिल्लीनाका परिसरात घडलेल्या भीषण अपघातात मोपेडवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनरच्या चाकात अडकलेली महिला दूरवर फरफटत गेली, त्यामुळे तिच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. घटनेनंतर कारणीभूत ठरलेला चालक पसार झाला आहे. या प्रकरणी अकस्मात दप्तरी नोंद करण्यात आली असून चौकशीनंतर कलमांत बदल करण्याची तजबीज ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या भीषण घटनेने संगमनेरची गचाळ वाहतूक व्यवस्था पुन्हा ऐरणीवर आली असून त्यासाठी आणखी किती सामान्य नागरिकांचा बळी घेतला जाणार असा संतप्त सवालही विचारला जात आहे. धक्कादायक म्हणजे शांतता समितीच्या बैठकीत उत्सवाच्या काळात शहरातून जड वाहतूक होणार नसल्याची हमी देवूनही पोलीस चौकीच्या अगदी तोंडावरच हा अपघात घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सतत वर्दळीने गजबजलेल्या दिल्लीनाका परिसरातील पोलीस चौकीसमोर घडली. या भीषण अपघातात सुमय्या मतीन तांबोळी (वय 34, रा.वडगावपान) या त्यांच्या ज्युपीटर मोपेडवरुन इथापे रुग्णालयाकडील रस्त्याने दिल्लीनाक्याच्या दिशेने येत होत्या. त्याचवेळी नगरकडून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगात येणार्‍या हरियाणा येथील माल वाहतूक कंटेनरने (क्र.एच.आर.55/ए.एम.8434) त्यांच्या मोपेडला जोराची धडक दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या कंटेनर चालकाने मारहाणीच्या भीतीने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघातग्रस्त महिला तिच्या वाहनासह चाकात अडकल्याने काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने वाहन सोडून तेथून पळ काढला.


दोन वाहनांमध्ये झालेल्या या भीषण अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या हृदयद्रावक घटनेत अपघातानंतर मयत महिला चाकात अडकून मोपेडसह काही अंतर फरफटत गेल्याने त्यात त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवरकर यांच्यासह नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे, आरोग्य सभापती किशोर टोकसे, नगरसेवक नितीन अभंग यांच्यासह पालिकेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील काहींच्या मदतीने पोलिसांनी कंटेरच्या चाकाखाली अडकलेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढून अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर ताब्यात घेतला आहे.


या भीषण अपघातानंतर नगरकडे जाणार्‍या रस्त्यावरील दिल्लीनाक्याच्या चौफुलीवर मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस चौकीसमोरच अपघात घडत असतील तर चौकी सुरु करण्याचा फार्स कशासाठी? अशा शब्दात आपला राग व्यक्त केला. तर, शांतता समितीच्या बैठकीत शहरातील गचाळ वाहतूक व्यवस्था केंद्रस्थानी येवून त्यावरील उपाय म्हणून उत्सवाच्या कालावधीत शहरातून होणारी अवजड वाहनांची वर्दळ पूर्णतः थांबवण्याची ग्वाही दिल्यानंतरही उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘ती’ खोटी ठरल्याने शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. या अपघातात एका मध्यमवयीन महिलेचा हृदयद्रावक प्रकारे हकनाक बळी गेल्याने शहराच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उत्साहालाही गालबोट लागले आहे.


अरुंद अंतर्गत रस्ते, त्यात पुणे-नाशिक आणि कोल्हार-घोटी असे दोन्ही महामार्ग शहरातून जात असल्याने संगमनेरात 24 तास मोठी वर्दळ असते. त्यातच सध्या सार्वजनिक गणेशोत्सव सुरु असल्याने जागोजागी गणेश मंडळांचे मांडव, स्वागत कमानी, समनापूरच्या महागणपतीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची गर्दी यामुळे मोठ्या वाहनांच्या वाहतूकीला अडथळे निर्माण झाले आहेत. त्यावरील उपाय म्हणून ऐन उत्सवाच्या तोंडावर बोलावलेल्या ‘शांतता समिती’च्या बैठकीत वाहते पाणी, खड्डे आणि वाहतूक व्यवस्था या विषयावरच अधिककाळ मंथन होवून उत्सवाच्या काळात कोणत्याही अवजड वाहनाला शहरातून प्रवेश निषिद्ध करण्याचा निर्णय झाला. मात्र त्याच्या चौथ्याच दिवशी भर पोलीस चौकीच्या समोरच भरधाव अवजड वाहनाने एका निष्पाप महिलेला चिरडल्याने पोलिसांची कार्यशैली पुन्हा एकदा चर्चेत आली असून शहरातील बेशिस्त वाहतुकीला कधीतरी शिस्त लागेल की नाही? असा सवाल विचारला जावू लागला आहे.

Visits: 67 Today: 63 Total: 2099619

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *