पालकमंत्री साहेब, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चाललंय तरी काय? ‘ड्रग्ज’वरील कारवाईचा बनाव पोलिसांचाच; ‘त्या’ उपनिरीक्षकावरही ‘एनडीपीएस’ दाखल करण्याची मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे पथकाची स्थापना झाल्यापासूनच सातत्याने चर्चेत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अक्षरशः धिंगाणा घातला आहे. गतिमान तपासाच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या पथकाकडून प्रलंबित तपास सोडून हातात येईल त्यातून फक्त ओरबाडण्याचा प्रकार सुरु आहे. त्यात आता आणखी एका प्रकरणाचा समावेश झाला असून तिघांनी वैरत्वाच्या भावनेतून चक्क याच पोलीस उपनिरीक्षकाचा वापर करुन एका निष्पाप तरुणाला ‘एनडीपीएस’ सारख्या गंभीर गुन्ह्यात गजाआड घातले आहे. व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांनी एखाद्या पोलीस अधिकार्‍यालाच हाताशी धरुन अशा पद्धतीने षडयंत्र रचावे आणि त्यासाठी लागणारे अंमलीपदार्थ चक्क पोलिसांनीच पुरवावे हा प्रकार केंद्र आणि राज्य सरकारच्या ड्रग्जमुक्त अभियानालाच सुरुंग लावणारा आहे. गेल्या पंधरवड्यात या दुय्यम अधिकार्‍याने घडवून आणलेल्या छाप्यात प्रत्यक्षात शंभर ग्रॅमहून अधिक एमडी हा घातक अंमली पदार्थ वापरण्यात आला होता, प्रत्यक्षात मात्र तो 39 ग्रॅमच दाखवला गेला आहे. मग राहिलेल्या 71 ग्रॅमचे काय? यासह सदरचा अंमलीपदार्थ या महाशयांनी कोठून आणला होता? हे संपूर्ण षडयंत्र रचण्यामागील त्यांचा नेमका हेतू काय? असे कितीतरी प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे पालिका निवडणुकीपूर्वी गणेशनगर परिसरातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती, त्यानंतरही आसपासच्या भागात गांजासारख्या पदार्थाचे साठेही जप्त झाल्याने निवडणुकीत ‘उडता संगमनेर’वरुन एकमेकांवर झालेली चिखलफेकही संगमनेरकरांनी बघितली, प्रत्यक्षात मात्र आता पोलिसांकडूनच शहरातील ड्रग्ज व्यापाराला प्रोत्साहन दिले जात असण्याच्या घटना समोर येत असतानाही स्थानिक राजकारण्यांची चुप्पी खूपकाही सांगणारी ठरत आहे. बनावट गुन्ह्यात फसवण्यात आलेल्या तरुणाच्या वडिलांनी याबाबतच्या पुराव्यांसह पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करुनही या अधिकार्‍याचे अद्यापही निलंबन झाले नसल्याने ‘पालकमंत्री साहेब, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चाललंय तरी काय?’ असे विचारण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.


गेल्या पंधरवड्यात गुरुवारी (ता.3) शहर पोलिसांच्या निष्क्रिय ‘डीबी’ पथकाने बसस्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या मोपेडमधून 110 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा घातक अंमलीपदार्थ जप्त केल्याचा बनाव रचून कासिफ असद कुरेशी (वय 27, रा.भारतनगर) या जनावरांचा व्यापार करणार्‍या तरुणाला अटक केली होती. सदरचा प्रकार आरोपीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या मुलाची भेट घेतली. त्यावेळी त्याने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. त्यानुसार व्यावसायिक प्रतिस्पर्धेतून एकमेकांपासून दूरावलेल्या परिसरातीलच तिघांनी कासिफचा काटा काढण्यासाठी षडयंत्र रचले. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून त्यांनी त्याच्याशी पुन्हा संवाद सुरु करुन चौघे मिळून एकत्रित व्यवसायाची कल्पना त्याच्या डोक्यात घातली.


त्यांच्या आभासी कल्पनेत कासिफ अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रकरणाचा दुसरा अध्याय पूर्ण करताना त्याला गेल्या 3 सप्टेंबररोजी सायंकाळी चहा पिण्याच्या निमित्ताने संगमनेर बसस्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ बोलावले. भाबड्या विचाराने कासिफही आपल्या पिवळ्या रंगाच्या मोपेडवरुन ठरल्या ठिकाणी आला, अर्धातास थांबला, चहापाणी उरकला आणि पुन्हा माघारी घराकडे जाण्यासाठी निघाला. त्याची मोपेड डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या आसपास असतानाच अचानक ‘त्या’ उपनिरीक्षकाने सिंघम स्टाईल एन्ट्री घेत त्याला आपली दुचाकी आडवी घालून थांबवले आणि भररस्त्यात अंतर्वस्त्रांसह त्याच्या मोपेडचीही कसून तपासणी केली, मात्र काही संशयास्पद आढळले नाही.


त्यामुळे चिडचीड झालेल्या ‘त्या’ अधिकार्‍याने कासिफ कुरेशी याला मोपेडसह पुन्हा ‘त्या’ चहाच्या टपरीजवळ आणले. या ठिकाणी तो कोणाशी गप्पा करीत होता त्यांना बोलवं असे फर्मान त्यांनी सोडले, पण त्याचवेळी ‘ते’ तिघेही तेथे हजर झाले. त्यांच्याशी वार्तालाप सुरु असतानाच त्यातील एकजण मोबाईलवर बोलण्याच्या बहाण्याने कासिफच्या मोपेडजवळ गेला आणि काही मिनिटांत परत आल्यानंतर लागलीच ‘त्या’ अधिकार्‍याने त्याच्या मोपेडची पुन्हा तपासणी केली आणि आश्‍चर्य म्हणजे डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ काहीच नसलेल्या मोपेडच्या पुढच्या बॉक्समध्ये चक्क 110 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन अवतरले.


कासिफच्या एकूण कथनावरुन त्याला फसवल्याचे आणि या षडयंत्रात पोलिसच सहभागी असल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्या वडिलांनी तत्काळ हालचाल करीत डॉ.आंबेडकर पुतळ्यासह बसस्थानकावरील ‘त्या’ दोन्ही ठिकाणी जावून तेथील सीसीटीव्हीमधून संध्याकाळी 6.57 ते 7.31 असे एकूण 34 मिनिटांचे फूटेज मिळवले. त्यावरुन या संपूर्ण षडयंत्राचा पर्दाफार्श होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी पोलीस अधिक्षकांना पुराव्यांच्या पेनड्राईव्हसह सविस्तर घटनाक्रम लिहिलेली तक्रारही पोहोचती केली. या प्रकरणाचे गांभीर्य, कुंपनाकडूनच शेत खाण्याचा आणि केवळ संगमनेरच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्याच्या नावाला बट्टा लावणार्‍या या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून तत्काळ प्रभावाने या दुय्यम अधिकार्‍याचे निलंबन होईल अशी अपेक्षा होती.


प्रत्यक्षात मात्र त्याच्याकडून केवळ या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला असून डीबीतील त्यांचे स्थान आजही फेविकोलने घट्ट चिकटलेलेच आहे. त्यामुळे या घटनाक्रमात शिजलेल्या डाळेत एखादा खडा आहे की खड्यांचीच डाळ आहे अशी भाबडी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली असून कडवे प्रशासक म्हणून राज्यात लौकीक असलेल्या जलसंपदा तथा पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सुरु असलेला हा प्रशासकीय धिंगाणा आश्‍चर्यजनक ठरला आहे. त्यातून ‘पालकमंत्री साहेब, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चाललंय तरी काय?‘ असा प्रश्‍न उपस्थित झाला असून सर्वसामान्यांना त्याच्या उत्तराची अपेक्षा आहे.


गंभीर गुन्ह्यांच्या तपासासह आपल्या हद्दितील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रणाची जबाबदारी म्हणून पाहिल्या जाणार्‍या संगमनेरच्या ‘डीबी’ पथकाने गेल्या एक-दीड वर्षापासून अक्षरशः धिंगाणा घातला असून मनाला वाटेल तसा पदाचा आणि कायद्याचा वापर करुन केवळ ओरबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातूनच अंमलीपदार्थांसारख्या देशाच्या भावी पिढ्यांना बर्बाद करणार्‍या प्रकरणांमध्येही तपासच गुंडाळून मोठ्या तडजोडी होत असल्याच्या चर्चा सुरु झाल्यापासून शहरातील अशा पदार्थांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे दिसू लागले आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून 2200 वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराला राजकीय फायद्यासाठी ‘उडता संगमनेर’ संबोधून आपल्या राजवटीत असे घडणारच नसल्याचे दावे करणार्‍या स्थानिक राज्यकर्त्यांनी गांभीर्याने दखल घेवून अशा अधिकार्‍यांना सेवेतूनच बडतर्फ करण्यासाठी राजकीय शक्ति पणाला लावण्याची गरज आहे.

Visits: 9 Today: 9 Total: 2103989

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *