‘रेझींग डे’निमित्त सायकल चालवून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रबोधन! पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व संगमनेर सायकलिस्टचा अनोखा उपक्रम
नायक वृत्तसेवा, घारगाव
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त 2 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत पोलीस ‘रेझींग डे’ सप्ताह पार पडत असतो. याचे औचित्य साधत संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व संगमनेर सायकलिस्ट यांच्यावतीने चाळीस किलोमीटर अंतर सायकल चालवून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबतचे समाज प्रबोधन केले. या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांनीही उत्स्फूर्त स्वागत करुन नियम पाळण्याचा विश्वास व्यक्त केला.
एरव्ही पोलीस म्हटले की नागरिकांची चांगलीच भंबेरीच उडते. त्यात कारवाई होणार या भीतीने नागरिक अनेकदा पोलिसांचा कानाडोळा चुकवून वाट शोधतात. परंतु, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदानुसार 24 तास नागरिकांच्या संरक्षणासाठी झटणारे पोलीस नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. त्यातच प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देणार्या वाहनचालकांवर कारवाई करुनही वारंवार नियम मोडत असल्याचे दिसून येते.
या पार्श्वभूमीवर रेझींग डे सप्ताहाचे औचित्य साधून वाहतुकीच्या नियमांबाबत समाज प्रबोधन करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी संगमनेर सायकलिस्टशी संपर्क साधला. त्यास सायकलिस्ट अण्णासाहेब रहाणे, श्याम कुलकर्णी, गणेश कानकाटे, राजेंद्र गुंजाळ, यश घुले, दिलीप घुले, अशोक जगताप, शिवराज थोरात आदिंनी होकार देत संगमनेर ते घारगाव असे चाळीस किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करत ठिकठिकाणी थांबत नागरीकांची वाहतुकीबाबत जनजागृती केली.
दरम्यान, ही सायकल रॅली घारगाव येथे आली असता घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील व पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे यांनी स्वागत केले. तसेच पोलीस खात्यातील कामकाजाविषयी माहिती देत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिक उपस्थित होते.
वाहतूक पोलीस 24 तास वाहनचालकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. परंतु, वारंवार वाहतुकीचे नियम मोडत असल्याचे निदर्शनास येते. नियम मोडणार्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. मात्र, तरीही नियम मोडणार्यांची संख्या कमी होत नाहीये. या पार्श्वभूमीवर ‘रेझींग डे’निमित्त समाज प्रबोधनासाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘रस्ता सुरक्षा दूत’ म्हणून संगमनेर सायकलिस्ट यांना बरोबर घेऊन जनजागृती केली. किमान यातून तरी वाहनचालक नियम पाळतील अशी अपेक्षा.
– भालचंद्र शिंदे (पोलीस उपनिरीक्षक, डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्र)