संगमनेरच्या बिबट्याने पिंजर्यातल्या पार्टीवर फिरवलं पाणी! ‘मेनू’ तगडा, तरीही पाहुणा फिरकेना; घोडेकरमळ्यातील बिबट्याच्या नखर्यांनी रहिवाशी मात्र हैराण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या सर्वत्र आखाड पार्ट्यांचा जोरदार मोसम सुरु आहे. घरोघरी, शेतावर आणि मित्रमंडळांमध्ये ‘गोड-खार्या’ पार्टीचा घाट घातला जात असताना, संगमनेर शहरालगतच्या घोडेकरमळ्यातून मात्र एका वेगळ्याच आणि विनोदी आखाड पार्टीची चर्चा रंगात आली आहे. एरवी आपण माणसांच्या पार्ट्या ऐकल्या असतील, पण इथे चक्क बिबट्यासाठी ‘खास’ पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आम्रपुरीच्या राजासारखा ‘नखरे दाखवणारा पाहुणा इतकी भन्नाट सोय करुनही पार्टीस्थळी फिरकतच नसल्याने बिबट्यासाठी आणलेल्या तगड्या कोंबड्याची बडदास्त ठेवण्याची वेळ परिसरातील रहिवाशांवर आली आहे.

शहराच्या अगदी लगत आणि प्रवरानदीकडे जाणारा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणार्या घोडेकरमळा परिसरात सध्या एका महाभागाचे वास्तव्य आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून हा हिंस्त्र श्वापद खिडकीतून डोकावताच रहिवाशांना ‘थेट दर्शन’ देत होता. मात्र, अद्याप त्याने कोणावरही हल्ला केल्याचे किंवा दात विचकल्याचे ऐकिवात नाही. सध्या दर्शन देणारा बिबट्या जरी शांत भासत असला, तरी गेल्या दीड-दोन वर्षांत संगमनेर शहरासह ग्रामीण भागात या हिंस्त्र पाहुण्याने तब्बल आठ जणांचा जीव घेतल्याचा इतिहास ताजा आहे. त्यामुळे गेला जीव तर ‘मटकन’ या न्यायाने रहिवाशांच्या मनात धडकी भरली आहे. अतिशय दाट लोकवस्तीच्या या भागात थोडीफार शेती असल्याने, दहशत निर्माण करणारा हा बिबट्या दिवसभर लपून बसतो आणि रात्रीच्या अंधारात ‘इव्हिनिंग वॉक’ला बाहेर पडतो.

बिबट्याचा हा मुक्काम आणि त्याचा बिनधास्त वावर पाहून परिसरातील लोकांची पाचावर धारणा बसली आहे. नागरिकांनी तातडीने वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर अवघ्या काही तासांतच वनविभागाने त्या बिबट्याचा सर्वाधीक वावर असलेल्या ठिकाणी चक्क पिंजरा लावला. आता पिंजरा म्हटल्यावर पाहुण्याला आकर्षिक करण्यासाठी त्याचा मान राखायलाच हवा, या विचारातून स्थानिक नागरिकांनी आखाड पार्टीच्या मुहुर्तावर एकदम अस्सल, तगडा आणि तजेलदार कोंबडा पिंजर्यात ‘मेनू’ म्हणून बसवला.

पण गंमत अशी की, ज्याच्यासाठी हा घाट घातला, त्या बिबट्याने मात्र या ‘फ्री’ पार्टीवर अक्षरशः पाणी फेरले. चार-चार दिवस उलटून गेले तरी हा ‘व्हिआयपी’ पाहुणा पिंजर्याच्या आसपासही फिरकला नाही. उलट, बिबट्यासाठी आणलेला तो बिचारा कोंबडा पिंजर्यात बसून आपली वेळ कधी येणार? या अपेक्षेत दररोज त्याची वाट पाहतोय, आणि अजून मी आहे याची दिवस उजेडताच रोज आरवून साक्षही देतोय. पण बिबट्याचा काही थांगपत्ताच लागेना. त्यामुळे हताश झालेल्या परिसरातील रहिवाशांमध्ये ‘अरेऽ बाबा, याला आखाड पार्टीत रस नाही वाटतं अशा खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत.

सध्याच्या आखाड पर्वात मित्रमंडळी आणि खवय्या मंडळी काळ्या-तांबड्या रश्शावर ताव मारीत आहेत, पण घोडेकरमळ्यातील नागरिकांना मात्र ‘सातच्या आत घरात’ या नियमाचे पालन करावे लागत आहे. बिबट्या जरी पार्टीला आला नसला, तरी त्याची दहशत मात्र नागरीकांच्या बाहेर पडण्याच्या उत्साहावर पाणी फिरवत आहे.

संगमनेरच्या नागरी वस्तीत बिबट्यांचा वावर आता नवीन राहिलेला नाही. प्रवराकाठची झाडी, उसाची शेती आणि लपण्यासाठी मिळणारे सुरक्षित कोपरे यामुळे बिबटे आता शहरीकरणाशी जुळवून घेत आहेत. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांत तालुक्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागात बिबट्यांच्या हल्ल्यात तब्बल आठ निष्पाप बळी गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. त्यामुळे अशा प्रत्येक बिबट दर्शनानंतर लोकांच्या अंगावर काटा उभा रहातो. सध्या अशीच भीती दूर करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात तजेलदार कोंबडा ठेवूनही बिबट्या मात्र हुलकावणी देत आहे.

