अवघ्या 20 दिवसांत 30 टीएमसी पाण्याची आवक! प्रवराखोर्‍यात तुफानी जलधारा; जायकवाडीकडेही समाधानकारक जावक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अल-नीनोच्या प्रभावातून निर्माण झालेले दुष्काळाचे सावट धुवून काढणार्‍या वरुणराजाने जिल्ह्यावर भलतीच कृपा केली आहे. गेल्या अवघ्या 20 दिवसांतच पावसाने जिल्ह्याचा नूर पालटला असून मुळा वगळता उत्तेरतील सर्व छोटी-मोठी धरणं ओसंडून वाहत आहेत. या कालावधीत प्रवराखोर्‍यात तब्बल साडेसात हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भंडारदरा व निळवंडे धरणात मिळून 16 हजार 603 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. याशिवाय मुळा, आढळा व म्हाळुंगी नदीच्या पाणलोटातही जोरदार पाऊस कोसळल्याने पाच जुलैपासूनच्या 20 दिवसांत उत्तरेतील पाचही जलप्रकल्पांमध्ये मिळून 29 हजार 273 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून त्यातील 5 हजार 321 दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्रातून सोडण्यात आले आहे. एकीकडे धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस असला तरीही लाभक्षेत्रातील अकोले, संगमनेर वगळता उर्वरीत पाचही तालुक्यांना अद्याप सलग पावसाची प्रतिक्षा आहे.


प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्याने यंदा दुष्काळाचे सावट निर्माण केले होते. त्यातून एरवी जूनच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यातच धरणांच्या पाणलोटात हजेरी लावणार्‍या मान्सूनचे आगमन होण्यासाठी यंदा शेवटचा आठवडा उजेडला. सुरुवातीच्या पंधरवड्यात प्रवराखोरे वगळता उर्वरीत धरणांच्या पाणलोटात जेमतेम पाऊस असल्याने काहीशा चिंताही निर्माण झाल्या होत्या. त्यातच जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेल्या मान्सूनने अकोले, संगमनेर व कोपरगाव वगळता लाभक्षेत्रातील उर्वरीत तालुक्यांमध्ये मात्र प्रतिक्षा कायम ठेवल्याने दुष्काळाचे सावट कायम होते. एकीकडे धरणक्षेत्रात पाऊस सुरु असताना दुसरीकडे अपवाद वगळता लाभक्षेत्रात केवळ ढगांची दाटी आणि एखादी सर कोसळत असल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या होत्या.


मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या समाप्तीलाच पाणलोट क्षेत्रात जोरदार सलामी देणार्‍या मान्सूनने लाभक्षेत्रालाही व्यापले. त्यामुळे अकोल्यापासून नेवाशापर्यंत आणि राहुरीपासून कोपरगावपर्यंत सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने खोळंबलेल्या पेरण्यांची लगबग पार पडण्यासह पेरणी झालेल्या पिकांनाही संजीवनी मिळाली. या दरम्यान अकोले, संगमनेर व राहाता तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यावरील दुष्काळाचे मळभ हलके होण्यास मदत झाली. या कालावधीत मुळा, भंडारदरा व निळवंडेसह आढळा व भोजापूर धरणांच्या पाणलोटातही पावसाचा जोर वाढत गेल्याने जूनच्या अखेरपर्यंत खपाटीला असलेले जलसाठे वेगाने फूगू लागले. या कालावधीत भंडारदर्‍याच्या पाणलोटातील घाटघर, रतनवाडी व पांजरे येथे पावसाने एकामागून एक विक्रम नोंदवल्याने भंडारदर्‍याच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली.


जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात मुळा खोर्‍यासह कृष्णवंती, आढळा आणि म्हाळुंगीच्या पाणलोटातही पावसाला वेग आल्याने या नद्यांवरील लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून नद्या वाहत्या झाल्या. गेल्या 5 जुलैपासूनच्या 20 दिवसांतच एकट्या प्रवराखोर्‍यातील घाटघर, रतनवाडी, पांजरे आणि भंडारदरा या पावसाच्या आगारात तब्बल सात हजार 350 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे भंडारदर्‍याच्या पाणीसाठ्यात तब्बल 9 हजार 85 दशलक्ष घनफूटाची भर पडून धरण तांत्रिकदृष्ट्या (10 हजार 500 दशलक्ष घनफूट) भरल्याने धरणातून 2 हजार 359 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. निळवंडे धरणाच्या पाणलोटासह भंडारदर्‍यातून आलेल्या पाण्यामुळे निळवंडे धरणही तांत्रिकपातळीवर पोहोचल्याने गेल्या चार दिवसांत या धरणातून नदीपात्रात एक हजार 309 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे.


गेल्या दहाच दिवसांत अकोले तालुक्याच्या पश्‍चिम घाटमाथ्यासह उत्तरेलाही पावसाचा जोर वाढल्याने आढळा खोर्‍यातील पाडोशी, सांगवी उघुप्रकल्प ओसंडण्यासह आढळा धरणातील पाण्याची आवक वाढून 1060 दशलक्ष घनफूटाचे देवठाण धरणही ओव्हरफ्लो झाले आणि गेल्या चार दिवसांत या धरणातून एक हजार 11 दशलक्ष घनफूटपाण्यासह भोजापूरच्या ओव्हरफ्लोने प्रवाहीत झालेल्या म्हाळुंगीनदीतून 642 दशलक्ष घनफूट असे एकूण 2 हजार 962 दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहून गेले. यंदाच्या वर्षी प्रवराखोर्‍याच्या तुलनेत मुळाखोर्‍यातील पावसाला उशिराने जोर चढला. त्यामुळे प्रवरा खोर्‍यातील सर्व धरणं तुडूंब झालेली असतानाही मुळा धरणातील पाणीसाठा 63 टक्क्यांवर आहे. मागील 20 दिवसांत जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या जलाशयात 9 हजार 957 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे.


5 जुलैपासून आजअखेर जिल्ह्यातील पाऊसमान पाहता घाटघरमध्ये सर्वाधीक 2 हजार 336 मि.मी., रतनवाडी 2003 मि.मी., पांजरे 1610 मि.मी. व भंडारदरा येथे 1401 मि.मी. असा एकूण 7 हजार 350 मि.मी. तर चालू हंगामात आत्तापर्यंत 9 हजार 220 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. यासोबतच निळवंडे येथे (कंसात हंगामातील एकूण पाऊस) 643 मि.मी. (793), मुळा (धरण) 79 मि.मी. (167), आढळा 233 मि.मी. (283), कोतुळ 285 मि.मी. (363), अकोले 331 मि.मी. (393), संगमनेर 220 मि.मी. (285), राहाता 147 मि.मी. (207), कोपरगाव 127 मि.मी. (322), श्रीरामपूर 104 मि.मी. (198), नेवासा 93 मि.मी. (209) व राहुरी 81 मि.मी. (161) इतका पाऊस नोंदवण्यात आला आहे.


आज सकाळी सहा वाजता भंडारदर्‍यातून 830 क्यूसेक, निळवंडे धरणातून प्रवरापात्रात 4 हजार 767 क्यूसेक, देवठाण धरणातून आढळा नदीपात्रात 1 हजार 95 क्यूसेक, भोजापूरच्या भिंतीवरुन म्हाळुंगी नदीपात्रात 400 क्यूसेक व कालव्यांद्वारे 190 क्यूसेक, लहीत जवळील मुळानदीतून 8 हजार 28 क्यूसेक आणि ओझर येथून प्रवरानदीपात्रात (जायकवाडी) 6 हजार 300 क्यूसेकचा प्रवाह सुरु आहे. सध्या पावसाचा वेग पूर्णतः मंदावल्याने भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणाची पाणीपातळी नियंत्रित केली जात असून आवक होत असलेल्या प्रमाणात विसर्गाचा प्रवाह कमी-जास्त केला जात आहे.


निसर्गाचे वरदहस्त लाभलेल्या अकोले तालुक्याच्या पश्‍चिम व उत्तर घाटमाथ्यावर गेल्या 20 दिवसांत झालेल्या तुफानी पावसाने चैतन्य निर्माण केले आहे. या कालावधीत मुळा धरणात सर्वाधीक 9 हजार 957 दशलक्ष घनफूट, भंडारदरा धरणात 9 हजार 85 दशलक्ष घनफूट, निळवंडे धरणात 7 हजार 518 दशलक्ष घनफूट, आढळा धरणात 1 हजार 710 दशलक्ष घनफूट व भोजापूर धरणात 1 हजार 3 दशलक्ष घनफूट अशा एकूण 29 हजार 273 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली, त्यातील 23 हजार 952 दशलक्ष घनफूट पाणी आडवण्यात आले असून 5 हजार 321 दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्रातून सोडून देण्यात आले आहे. उत्तरेतील भंडारदरा व निळवंडे धरणं तांत्रिक तर, आढळा व भोजापूर पूर्ण क्षमतेने ओसंडले असून मुळाधरणाचा पाणीसाठा 16 हजार 313 दशलक्ष घनफूट (62.74 टक्के) इतका झाला आहे.

Visits: 1 Today: 1 Total: 1921900

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *