ब्रह्मकुमारी संतोष दीदींचा पत्रकार संघाकडून सन्मान
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
अध्यात्माच्या वाटेवर जवळपास 60 वर्षांपासून दीपस्तंभाप्रमाणे कार्य करणार्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आंध्रप्रदेश व महाराष्ट्र संचालिका राजयोगिनी ब्रम्हकुमारी संतोष दीदी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने सन्मान केला आहे.
ध्यानाच्या माध्यमातून प्रत्येक मानवाला ‘स्व’ची जाणीव करुन देण्याचे व्रतविधान घेऊन ब्रम्हकुमारी संस्थेमधून दीदींनी अर्पण केलेली अध्यात्मिक सेवा ब्रम्हकुमारी संस्थेचे सर्वोच्य मूल्य ठरले आहे. गेल्या 30 वर्षांपासून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, येथील झोनल इन्चार्ज म्हणून त्या कार्यरत आहे. गोवा राज्याकडून ग्लोबल कौन्सिल फॉर प्रोफेशनल एज्युकेशन मिशनच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला साजेशी अध्यात्माची डॉक्टरेट पदवी बहाल करुन गौरव करण्यात आला आहे. त्यांचा याच अध्यात्मिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व प्रदेश सचिव विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मनीष जाधव, शहराध्यक्ष हाफिज शेख, तालुका सचिव विनोद जवरे, तालुका सह-सचिव विजय कापसे, अनिल दीक्षित, ब्रह्मकुमारी वासंती दीदी, सरला दीदी, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, आयुर्वेदाचार्य डॉक्टर रामदास आव्हाड आदिंच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.