शेती व्यवसायात आंतरपीक पद्धतीचा जास्त वापर करावा ः आ.डॉ.तांबे शेतकरी जागृती कार्यक्रमात नारळ पिकावर परिसंवाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र पारंपरिक शेती पद्धतीमध्ये बदल घडून शास्त्रोक्त पद्धत व अत्याधुनिक पद्धतीने शेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते. आंतर पिकाचे उत्पादन वाढल्याने शेतकर्‍यांना दुहेरी फायदा मिळू शकतो. त्यामुळे या पद्धतीवर अधिक भर द्यावा. तसेच नारळ हा कोणत्याही भागातही मोठ्या प्रमाणात येऊ शकतो आणि त्यातून मोठे उत्पादन मिळू शकते, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

महाराष्ट्र शासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी जागृती कार्यक्रमात नारळ पीक या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी नारळ विकास बोर्ड केंद्र ठाण्याचे उपसंचालक डॉ. अमिता देवनाथ, तंत्र अधिकारी डॉ. शरद आगलावे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, जयहिंद लोकचळवळ कृषी विभागाचे अभयसिंह जोंधळे, दूध संघाचे संचालक संतोष मांडेकर, वैभव कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, भारत देश शेतीप्रधान आहे. त्यामुळे येथे शेतीचा मोठा व्यवसाय आहे. यापुढील काळात शेतीचे रूपांतर शाश्वत शेती करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. नारळ हे कोकणातच येते असा आपल्या शेतकर्‍यांचा समज आहे. परंतु शास्त्रयुक्त पद्धतीने नारळाची लागवड केली तर त्या माध्यमातून आपण मोठे उत्पादन घेऊ शकतो. कृषी विभागाने नारळाचे मार्केटिंग करावे. त्यामुळे शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा होईल. पुढील काळात शेतकर्‍यांनी चार – पाच प्रकारची शेती केली पाहिजे. त्यामध्ये फळझाडे, फुलझाडे, आंतरपीक हमखास उत्पादन देणारे पीक अशी उत्पादने घ्यावी. त्यासाठी कृषी विभागाची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास शॅम्प्रोचे व्यवस्थापक बबन सावंत, जगन्नाथ गोडगे, बाळासाहेब पवार, शांताराम पानसरे, संजय थोरात, बंडोपंत थोरात, विजय यादव, राहुल दिघे, भाऊसाहेब गुंजाळ, उत्तम वामने आदिंसह तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केले तर वैभव कानवडे यांनी आभार मानले.

Visits: 122 Today: 1 Total: 1115033

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *