मन्सूरभाई विरोधात सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा! कार्यालयात गोंधळ घातल्याचाही आरोप; चावडीवर रंगले होते महानाट्य..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या कित्येक वर्षांपासून थेट संबंध नसतानाही तलाठी कार्यालयात वावरुन संगमनेरचा भूगोल डोक्यात घेणार्या आणि नंतर त्याचाच वापर करुन तलाठ्यांना ‘कामचुकार’ करीत मलिदा लाटणार्या खासगी दलालाचा आमदार अमोल खताळ यांनी बुधवारी पर्दाफार्श केला होता. यावेळी त्यांनी वरीष्ठ महसुल अधिकार्यांना तत्काळ कारवाईच्या सूचना देताना मन्सूरभाई नावाचा हा तोतया तलाठी तेथून हाकलूनही लावला होता. मात्र या प्रकाराला जेमतेम 12-15 तासांचा अवधी उलटण्यापूर्वीच खुद्द आमदारांनी हुसकावलेला हा माणूस गुरुवारी सकाळी नऊलाच पाटील चावडीवर आला आणि त्याने आंतून कुलुप ठोकून या शासकीय कार्यालयावरच दावा ठोकला. जवळपास दोनतास सुरु असलेल्या या महानाट्यादरम्यान त्याचा काळा धंदा उजेडात आणणार्या लोकप्रतिनिधींच्या नावानेही त्याने बोटं मोडली. त्याला समजावून सांगणार्या शासकीय कर्मचार्यांशीही त्याने हुज्जत घालीत त्यांना अरेरावी व धमक्या दिल्या. भरचौकात असलेल्या तलाठी कार्यालयात हा प्रकार सुरु असल्याने बाहेरच्या बाजूला बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. अखेर खताळ समर्थकांनी शासकीय अधिकार्यांच्या मदतीने त्याला तेथून दुसर्यांदा हुसकावले, त्यानंतर रात्री उशिराने संगमनेरचे तलाठी पांडूरंग भुरे यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या बुधवारी आमदार अमोल खताळ यांच्याकडे एका महिलेने तलाठी कार्यालयात पैशांसाठी काम आडवल्याची तक्रार केली होती. त्याची शहनिशा करण्यासाठी त्यांनी थेट तलाठी कार्यालयालाच धडक दिली असता मन्सूर नावाचा खासगी इसम दाखल्यांसह अन्य महत्वाची कामे करीत असल्याचे व येणार्या प्रत्येक नागरिकाला आपण तलाठी असल्याचे भासवत असल्याचे त्यांना दिसले. हा प्रकार पाहुन संतप्त झालेल्या आमदार खताळ यांनी वरीष्ठ अधिकार्यांना फोनद्वारे हा प्रकार कळवून कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची चौकशी करुन सत्य समोर आणण्याची स्पष्ट सूचनाही त्यांनी केली. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सुरु असताना आरोपी मन्सूर पटेल तेथेच हजर होता, मात्र नंतर त्याला हुसकावून लावण्यात आले.

गुरुवारी (ता.16) त्याने सकाळी नऊ वाजताच येवून तलाठी कार्यालयाच्या बाह्य बाजूला असलेल्या ओसरीवर ताबा घेतला व आतून कुलुप लावून एकप्रकारे सरकारी यंत्रणेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ऐकून धावतपळत आलेल्या तलाठ्यांनी त्याला समजावून, धमकावून व विनंती करुन पाहीले, मात्र अपार पैसा आणि झीरो तलाठी म्हणून मिळणार्या सन्मानाचा मोह टळत नसल्याने त्याने त्यांना धुडकावून लावले. या दरम्यान मानसिकता हरपल्याप्रमाणे या खोट्या तलाठ्याने आमदारांच्या कारवाईवरही बोटं ठेवले व मनात येईल त्या शब्दांचा वापर करुन अतिशय शिवराळ भाषेत त्यांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या उपस्थित नागरिकांसह खताळ समर्थकांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडून त्याच्या दप्तराची तपासणी केली.

यावेळी त्याच्याकडे शासकीय मोहोर असलेल्या शिक्क्यांसह तलाठ्यांनी सह्या करुन ठेवलेले कोरे दाखले, उतारे, अनेकांच्या कामाचे प्रस्ताव आढळून आले. त्यासोबतच एका विशिष्ट धर्माच्या प्रार्थनास्थळाच्या नावाने असलेले छापील देणगी पुस्तकही दिसून आल्याने हा तोतया तलाठी चावडीत बसून लोकांची पिळवणूक करुन मिळालेल्या पैशातील ठराविक रक्कम धर्मकार्यासाठी खर्च करीत असल्याचेही दिसून आले, त्यामुळे शहरात रोषही निर्माण झाला होता. त्यातच या महाशयांनी थेट सरकारी यंत्रणांना आव्हान देत शासकीय जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यासह या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रकार केला. त्याचा परिणाम अखेर रात्री उशिराने त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्यासह सरकारी सेवकांना धमकी देवून कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

