भंडारदरा परिसरात सुरू झाला फुलोत्सव! सह्याद्रीची पर्वतरांग पर्यटकांना घालतेय भुरळ


नायक वृत्तसेवा, अकोले
निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण असणार्‍या भंडारदरा परिसरात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये होणारे अनोखे चमत्कार पर्यटकांना भुरळ पाडत आहेत. सप्टेंबरच्या शेवटच्या सप्ताहापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत पिवळ्या रंगाची सोनकी व खुरासणीची फुले घाटघर, रतनवाडी, भंडारदरा परिसरातील हिरव्यागार डोंगरदर्‍यात पसरल्याने निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडल्याने पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे.

पावसाचा जोर काहीसा कमी होतो. सगळीकडे पावसाने राज्य केल्यामुळे हिरवळीने सह्याद्रीची पर्वतरांग नटून बसली आहे. हिरवाकच दिसणार्‍या या हिरवळरुपी शालीला आता रानफुले व गवत फुलांची झालर बसविली असून, अनेक प्रकारची निसर्गाची देणं असलेली फुले कळसूबाईच्या शिखरावर तसेच रतनगडाच्या सभोवताली थाटात डोलत आहेत.

सोनकळीच्या फुलांनी संपूर्ण जंगलालाच सोन्याचा मुलामा चढविल्यागत भास होताना दिसत आहे. भंडारदर्‍याच्या परिसरात अनेक प्रकारची गवत फुले व रानफुलेही उगवली असून निसर्गाचा हा अद्भूत देखावा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. रतनगडाच्या पायथ्याचा संपूर्ण परिसर रानफुलांनी बहरून गेला आहे, तर आशिया खंडातील सर्वांत मोठी दरी समजल्या जाणार्‍या सांदण दरीचा आनंद घेण्यासाठी आलेले शेकडो पर्यटक या फुलांची मनमोहक अदा आपल्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी आतूर झाले आहेत.

या फुलांमध्ये कारव्यासारख्या झाडाला सात वर्षांतून एकदाच फुले येत असून या कारव्याच्या झाडाचा उपयोग घरबांधणीसाठी व वाळल्यानंतर सरपणासाठी केला जातो. काही फुलांचा वापर आदिवासी बांधव आपले श्रद्धास्थान असलेल्या देवदेवतांना अर्पण करण्यासाठी करतात, तर काही फुलांचा वापर हा ठराविक आजारावर औषधांसाठी केला जातो. रिंगरोडवर पर्यटन करताना कितीतरी लहान लहान मुले हातात रानफुले घेऊन पर्यटकांना विकत घेण्यासाठी आमंत्रण देताना दिसत आहेत. ज्याप्रकारे भंडारदर्‍याला पावसाअगोदरचा काजवा महोत्सव व पावसाळ्यातील जलोत्सवाला असंख्य पर्यटक भेट देतात, अशीच पर्यटकांची पसंती फुलोत्सवाला मिळाली, तर भंडारदरा महाराष्ट्रातील दुसरे कास पठार म्हणून ओळखले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *