‘भारत बंद’ला राहुरी, श्रीरामपूर, नेवासा व शेवगावमध्ये संमिश्र प्रतिसाद शेतकरी व कामगार विरोधी कायदे तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी/श्रीरामपूर/नेवासा/शेवगाव
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता.8) पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये उत्तर नगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, नेवासा व शेवगावमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.
या बंदमध्ये सहभागी होण्याचे विविध राजकीय पक्षांसह राजकीय संघटनांनी आवाहन केले आहे. त्यानुसार राहुरी शहरात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक वगळता बाजारपेठ बंद आहे. तर दिवसभर बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी सांगितले. शिवाय आजचे कांद्याचे लिलावही बंद करण्यात आले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी मात्र बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. नेवाशामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तर शेवगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
केंद्र सरकारने शेतकरी प्रतिनीधींसह संघटनांशी चर्चेशिवाय कृषी संबंधित कायदे मंजूर केले. संसदेत चर्चा न करता, कोणत्याही शेतकरी संघटनेने मागणी केली नसताना शेतकरी हिताच्या नावाखाली सदर कायदे शेतकयांच्या माथी मारले. हे लोकशाही प्रक्रियेला धरून नसल्याचा आरोप करत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत त्यांनी घूमजाव केला असल्याचा हल्लाबोल शेतकर्यांनी केला आहे. तोंडी आश्वासनाऐवजी शेतकर्यांना आधारभूत किंमतीचा कायदा हवा आहे. तसेच आंदोलनातून मार्ग काढण्याऐवजी केंद्र सरकार दडपशाही करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदमध्ये आम्ही सहभागी झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केल्या आहेत.