दुसर्या लाटेत बाधितांचा जीव वाचविणे कठीण ः डॉ.फुलसौंदर नायक वृत्तसेवा, कोपरगाव

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने शिरकाव करत असताना सध्या राज्यातील परिस्थिती पुन्हा गंभीर होत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अशीच काहिशी परस्थिती बघायला मिळत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नागरिकांचा संपर्क बाजारात जास्त प्रमाणात वाढला. बाहेर गावी प्रवास, लग्न समारंभ अशा एक ना एक कारणाने लोकांचा संपर्क वाढला गेला आणि त्याचमुळे काही बाधित रुग्णांमुळे निरोगी लोकांमध्ये त्यांचा प्रसार झाला असावा. म्हणून या कालावधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची शक्यता कोपरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी वर्तवून बाधितांचे जीव वाचविणेही कठीण होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

कोपरगाव तालुका हा कोरोनाला आळा घालण्यास जिल्ह्यात अग्रेसर होता. तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या अतिशय कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मागील काळात अतिशय उत्तम होते. परंतु नोव्हेंबर महिन्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. एकाच महिन्यात 3 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमविल्यामुळे पुन्हा तालुक्यात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट येण्याचे मुख्य कारण नागरिकांचा निष्काळजीपणा ठरला आहे. सरकारने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन लॉकडाऊन उठविले. परंतु नागरिक त्याचा वेगळा अर्थ घेऊन वावरत आहे. लॉकडाऊन जणू संपले आणि कोरोनाही संपला अशा अर्थाने नागरिक वावरू लागले लागल्याने कोरोनाच्या दुसर्या लाटेचे संकट संपूर्ण राज्यावर उभे राहिले. यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये अतिशय गंभीर स्वरूपाची लक्षणे समोर येत असल्यामुळे व प्रथमोपचारांमध्ये निष्काळजी बाळगल्यामुळे रुगांचा जीव वाचविणे अतिशय कठीण बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

