डॉ.सुधीर तांबे व्यापारी संकुल वाढविणार संगमनेरचे वैभव! तीस हजार चौरस फुटात दुकाने, कार्यालये, सभागृहे आणि अधिकारी निवासस्थानाची रचना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध शासकीय व प्रशासकीय इमारतींसह राज्यात देखण्या ठरलेल्या संगमनेर बस स्थानकाच्या इमारतीमुळे संगमनेर शहराचे वैभव वाढलेले असतांना आता त्यात आणखी एका दिमाखदार वास्तूची भर पडणार आहे. पालिकेच्या कचेरीमागील जलकुंभाच्या जागी शहराचे सौंदर्य वाढवणार्‍या ‘डॉ.सुधीर भास्करराव तांबे व्यापारी संकुला’ची निर्मिती सुरु झाली असून सुमारे सव्वाचार कोटी रुपये खर्चाच्या या संकुलातून संगमनेरच्या समृद्धीत आणखी भर पडणार आहे. व्यापारी गाळे, कार्यालये, दोन सभागृहे आणि अधिकार्‍यांची निवासस्थाने असलेली ही सुसज्ज आणि देखणी इमारत येत्या चार महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून पालिकेच्यावतीने स्वच्छ व सुंदर शहराच्या प्रवासात ही इमारत मैलाचा दगड ठरणार आहे.

मोठा इतिहास लाभलेल्या संगमनेर शहरात सन 1857 साली पालिका स्थापन्याची परवानगी मिळाली. मात्र याच काळात इंग्रजी राजवटी विरोधात बंड पुकारले गेल्याने संगमनेर नगरपालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरु होण्यात तीन वर्षे गेली आणि सन 1860 साली पालिकेचे कामकाज प्रत्यक्षात सुरु झाले. अपुर्‍या संसाधनांच्या बळावर गेल्या 160 वर्षांच्या प्रवासात संगमनेर नगरपालिकेने अनेक स्थित्यंतरे अनुभवत प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण केले. 1990 पर्यंत आघाड्या व मंडळांच्या माध्यमातून पालिकेच्या निवडणुका होत असतं. मात्र 1991 साली संगमनेरात पहिल्यांदाच पक्षीय चिन्हावर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि संगमनेरच्या निवडणुकांचा पॅटर्न नंतरच्या काळात राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पोहोचला.

याच काळात देशात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शहराला समृद्धीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प घेवून तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ.सुधीर तांबे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पक्षीय चिन्हावर लढविल्या गेलेल्या या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठा विजय संपादन करताना डॉ.तांबे यांची नगराध्यक्षपदी निवड केली आणि संगमनेरच्या विकासाचा नवा अध्याय सुरु झाला. आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत डॉ.तांबे यांनी पारदर्शी कारभाराचे नवे सूत्र निर्माण करुन शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. आपल्या कार्यकाळात त्यांनी पालिकेच्या कामकाजात आदर्श मापदंड निश्चित करतांना ‘जनसेवा हिच ईश्वर सेवा’ हे पालिकेचे ब्रीद पदोपदी सत्य ठरवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तीन दशकांनंतर आजही डॉ.तांबे यांनी निर्माण केलेल्या मार्गावरुनच पालिकेच्या प्रगतीचा प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल.

विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात गेल्या चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात आहेत. त्यांच्या राजकीय स्थानाचा संगमनेरच्या विकासात नेहमीत मोठा हातभार राहिला आहे. कधीकाळी पाण्यासाठी वणवण करणारे संगमनेर शहर आज पाण्याच्या बाबतीत जिल्ह्यातील सर्वात समृद्ध समजले जाते. विशेष म्हणजे नामदार थोरात यांच्या प्रयत्नातून 2014 साली निळवंडे धरणातून थेट पाईपद्वारे संगमनेरात पाणी पोहोचले खरे, मात्र तत्पूर्वी 1995 च्या सुमारास डॉ.तांबे यांनी महादेव घाटाजवळील प्रवरा नदीपात्रात भूमिगत बंधार्‍याची अभिनव संकल्पना राबवून संगमनेरकरांच्या पाण्याचे संकट हटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. पाच वर्षांच्या आपल्या कार्यकाळात भरगच्च काम केल्यानंतर त्यांना नगराध्यक्ष होण्याची पुन्हा संधी होती, मात्र त्यांनी ती नाकारली आणि पालिकेच्या राजकारणात अखंड काळासाठी आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली जी आजही अबाधित आहे.

गेल्या दशकभरापासून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सांभाळणार्‍या डॉ.तांबे यांच्या नगराध्यक्षपदाचा काळ संगमनेरच्या विकासातील सुवर्णकाळ समजला जातो. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पालिकेच्या कौन्सिलने कवी अनंत फंदी नाट्यगृहासमोरील जलकुंभाच्या जागी उभ्या राहत असलेल्या व्यापारी संकुलाला ‘डॉ.सुधीर भास्करराव तांबे व्यापारी संकुल’ असे नाव देण्याचा ठराव केला आहे. सध्या या जागी युद्धपातळीवर संकुलाचे काम सुरु आहे. जवळपास 30 हजार चौरस फुट आकाराच्या या व्यापारी संकुलात दहा हजार चौर फुटाचा वाहनतळ (पार्किंग) असणार आहे. याशिवाय 2 हजार 500 चौरस फुटाचे दोन सभागृह, पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांसह अन्य एका अधिकार्‍यांसाठी दोन निवासस्थानस्थाने, तळ मजल्यावर एकूण अठरा व्यापारी गाळे व पहिल्या मजल्यावर पंधरा कार्यालये असणार आहेत. संगमनेर शहराच्या समृद्धीत भर घालणार्‍या या देखण्या इमारतीसाठी 4 काटी 20 लाख रुपयांचा खर्च होणार असून प्रसिद्ध स्थापत्य विशारद् अरविंद वैद्य यांनी या वास्तूची रचना केली आहे. पुढील चार महिन्यात ही देखणी इमारत बांधून पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

पालिकेची प्रशासकीय इमारत असो, अथवा रामकृष्ण सभागृह, नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनाची इमारत असो, अथवा तहसील कार्यालयाची इमारत, पंचायत समितीची वास्तू असो, अथवा संगमनेरचे न्यायदान संकुल आणि कवी अनंत फंदी नाट्यगृह असो, किंवा संगमनेरचे बसस्थानक या देखण्या आणि सुसज्ज इमारतींनी संगमनेरची समृद्धी शतपटीने वाढविली आहे. याच श्रृंखलेत आता शहराच्या गावठाण भागाचा चेहरामोहरा बदणार्‍या ‘डॉ.सुधीर भास्करराव तांबे व्यापारी संकुला’च्या देखण्या इमारतीचीही भर पडणार आहे. 30 हजार चौर फुटाच्या या विशाल संकुलात व्यापारी गाळे, कार्यालये, दोन सभागृह आणि दोन अधिकार्‍यांसाठी निवासस्थानांची रचना आहे. याशिवाय जवळपास दहा हजार चौरस फुटांचे वाहनतळही उभारण्यात येणार असल्याने ही वास्तू संगमनेरच्या सौंदर्यात मोठी भर घालणार आहे.

Visits: 119 Today: 1 Total: 1109916

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *