हारदे महाराज आश्रमाच्या गादीचा वाद पेटण्याची चिन्हे! संगमनेरमध्ये धार्मिक संघर्षाची ठिणगी; समाधीच्या भूमीपूजनास भक्तगणांचा विरोध..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संतांची आणि वैराग्याची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सध्या एका प्रतिष्ठित धार्मिक संस्थानाच्या गादीवरुन आणि आश्रमाच्या मालकीवरुन तीव्र वाद निर्माण झाला आहे. शहरालगतच्या गुंजाळवाडी (अकोले बायपास) येथील ‘श्री विठ्ठल मंदिर, ह.भ.प.किसन महाराज हारदे आश्रम’ या वास्तूच्या वारसाहक्कावरुन आणि नियोजित कार्यक्रमावरुन स्थानिक भक्तगण आणि अन्य धार्मिक गट आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी (ता.30) आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवर्य माऊली महाराज समाधी मंदिर भूमीपूजन सोहळ्या’ला स्थानिक भाविक आणि मूळ जागादात्यांनी तीव्र विरोध दर्शवल्याने तालुक्यातील धार्मिक वातावरण तापले असून, या आश्रमाच्या गादीचा वाद आता कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


भक्तगणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोले बायपास रस्त्यावर गुंजाळवाडी शिवारातील हारदे महाराज आश्रम परिसरातील भाविक आणि अभंग-ताजणे परिवाराच्या त्यागातून आणि आर्थिक मदतीतून उभा राहिला आहे. किसन महाराज हारदे यांच्या महानिर्वाणानंतर या आश्रमाची सर्व व्यवस्था त्यांचे पट्टशिष्य माऊली महाराज पाहत होते. माऊली महाराजांनी अत्यंत निष्ठेने आणि निस्पृह भावनेने या आश्रमाची सेवा केली आणि विठ्ठल मंदिराचा महिमा वाढवला. मात्र, काही महिन्यांपूर्वी माऊली महाराज यांचे 56 व्या वर्षी अचानक निधन झाले. हारदे महाराजांप्रमाणे माऊली महाराजांना आपल्यानंतर आश्रमाचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबतचे मृत्युपत्र करता आले नाही, हाच विषय कायदेशीर वादाचे मूळ ठरला आहे.


स्थानिक भक्तगणांच्या माहितीनुसार, माऊली महाराजांच्या निधनानंतर सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी या आश्रमाच्या कारभारात थेट रस घेण्यास सुरुवात केली. रामगिरी महाराजांनी गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड आणि महसूल दप्तरी मृत माऊली महाराजांच्या वृद्ध मातोश्रींचे नाव ‘वारस’ म्हणून नोंद करवून घेतले. त्यावरुन हा वाद अधिक चिघळला, हा सगळा प्रकार न्यायालयातील प्रलंबित दाव्यांना बगल देऊन बाह्य शक्तींच्या बळाचा वापर करुन केला गेल्याचा आरोपही करण्यात आला. रामगिरी महाराजांनी माऊली महाराजांच्या वृद्ध मातोश्रींना हाताशी धरुन आश्रमाची जागा आणि संस्थानावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आराखडा आखल्याचा दावा स्थानिक भक्तगणांनी केला आहे.


विठ्ठल नगरस्थित या आश्रमाच्या परिसरात सध्या शनिवारी (ता.30) होणार्‍या समाधी भूमीपूजन कार्यक्रमाचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. या बॅनर्सवर गुरुवर्य माऊली महाराज समाधी मंदिर भूमीपूजन सोहळा असे जाहीर करण्यात आले असून, हा कार्यक्रम महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते आणि प्रवचनाने होणार आहे. मात्र, या फ्लेक्सवर ‘किसनगिरी महाराज भक्त मंडळ, गुंजाळवाडी’ असा आयोजक म्हणून उल्लेख असला, तरी स्थानिक भक्तांनी याला बनावट म्हटले आहे. इंदिरानगर, जनतानगर आणि विठ्ठलनगर परिसरातील शेकडो भाविकांनी एकत्र येत या सोहळ्याला ‘बेकायदेशीर’ ठरवले आहे. हा सोहळा म्हणजे आश्रमाच्या जागेवर बळजबरीने ताबा मिळवण्याचा आणि बाहेरील ट्रस्टचे वर्चस्व लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही होत आहे.


या संदर्भात किसन महाराज हारदे आश्रम शिष्य मंडळ आणि स्थानिक भक्तगणांच्या वतीने मंदिर परिसरात ‘जाहीर निषेध व खुलासा’ करणारा फलक लावण्यात आला आहे. या फलकाद्वारे मूळ आश्रमाशी किंवा किसन महाराज हारदे यांच्या परंपरेशी या कथित सोहळ्याचा कोणताही संबंध नाही. बाहेरील व्यक्तींकडून बळाचा वापर करुन आणि जनतेची दिशाभूल करुन हा सोहळा आयोजित केला जात असल्याचा आरोपही होत असून स्थानिक भाविकांनी या संदर्भात पोलिसांना अर्जही दिला आहे.


आश्रमाच्या वारसा हक्कावरुन निर्माण झालेला हा वाद केवळ धार्मिक स्वरुपाचा उरला नसून तो आता थेट न्यायालयाच्या उंबरठ्यात पोहोचला आहे. संगमनेर न्यायालयाने या जागेच्या मालकी हक्काबाबत आणि अनधिकृत हस्तक्षेपाबाबत दिवाणी दावा दाखल करुन घेतला आहे. न्यायालयाचा कोणताही अंतिम निकाल आलेला नसताना, अशा पद्धतीने भूमीपूजन उरकून घेण्याचा रामगिरी महाराजांचा प्रयत्न कायदेशीर चौकटीला आव्हान देणारा असल्याचा सूर भाविकांमधून उमटत आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनावर राजकीय व सामाजिक दबाव असल्याचीही चर्चा आहे. सरला बेट आणि स्थानिक भक्तगण यांच्यातील सूप्तसंघर्ष आता समाधी मंदिर भूमीपूजनाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढणार असून शनिवारच्या कार्यक्रमातून कायदा व व्यवस्थेचा प्रश्‍नही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


पारमार्थिक मूल्यांचा र्‍हास की वर्चस्वाची लढाई?
संत तुकाराम महाराज म्हणतात; ‘ज्यापाशी नाही भक्ती। तो केवळ र्‍हासाची मूर्ती॥’ गुंजाळवाडीतील हा संघर्ष केवळ एका समाधी मंदिरापुरता मर्यादित नसून, तो धार्मिक संस्थानांमधील ‘गादी’ आणि ‘मालमत्ता’ यांच्यावर ताबा मिळवण्याच्या वाढत्या प्रवृत्तीचे दर्शक आहे. निस्पृह भावनेने चालणार्‍या आश्रमांमध्ये जेव्हा बाहेरील मठाधिपतींचे हितसंबंध गुंततात, तेव्हा स्थानिक भक्तांमध्ये निर्माण होणारा असंतोष अटळ असतो. रामगिरी महाराजांनी यापूर्वीही आपल्या शिष्याला हारदे आश्रमाच्या गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र स्थानिक भक्तांनी तो हाणून पाडल्यानंतर आता समाधी मंदिरावरुन पुन्हा तसाच प्रयत्न होत असल्याची भावना निर्माण झाल्याने या भूमीपूजन सोहळ्यातून गुंजाळवाडीच्या शिवारात धार्मिक संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.

Visits: 6 Today: 6 Total: 1833792

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *