संगमनेरच्या ‘प्रवरा-म्हाळुंगी’ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव! ‘साबरमती फ्रन्ट’ प्रमाणे विकासाचे स्वप्नं; मात्र पर्यावरणवाद्यांकडून विरोध होण्याची शक्यता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नद्यांमधील वाढते प्रदूषण, अतिक्रमणं यामुळे त्यांचे जलस्रोत दूषीत होण्यासह त्यांच्या पारंपरिक मार्गातही बदल होत असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याच्या घटना वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून नदीसुधार प्रकल्पांतर्गत नद्यांच्या संवर्धनासह त्यांच्या सुशोभिकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. अहमदबादमधील साबरमती नदीचा विकास त्याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रागैतिहासापासून प्रवाहित असलेल्या अमृतवाहिनी आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या विकासाचे स्वप्नं पाहुन पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी शासनाकडून भरीव निधीची मागणी केली. या विषयावर त्यांनी सभागृहातही निवेदन केले होते. ‘प्रवरा-म्हाळुंगी’ या नद्यांच्या पुनरुज्जीवनावरील त्यांच्या वक्तव्यानंतर संगमनेरातील पर्यावरणवाद्यांनी त्या विरोधात सूर आळवायलाही सुरुवात केली आहे. त्यातच आता संगमनेर नगरपरिषदेने सुमारे चारशे सत्तर कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासनाला सादर केल्याने येणार्या काळात त्यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. या अहवालातून शहराच्या भौगोलिक व पर्यावरणीय स्थितीचा विचार करता नदीसुधार प्रकल्प राबवण्याची नितांत गरज व्यक्त करण्यात आली आहे.
प्रागैतिहासापासून अखंड प्रवाहित असलेल्या अमृतवाहिनीच्या काठावरील मानवी वस्तीला हजारों वर्षांचा इतिहास आहे. कधीकाळी विस्तीर्ण पसरलेल्या दंडकारण्याचा घनदाट भाग म्हणून या परिसराची ओळख होती. जरासंधाची नगरी म्हणून जोर्वेच्या पुराणातील उल्लेखाला तेथील उत्खणाने सत्याचे रुप दिले आहे. म्हाळुंगी नदीच्या संगमाने समृद्ध झालेल्या लोकवस्तीला संगमनेर अशी ओळखही नद्यांनीच दिली आहे. मत्स्यपुराणात श्रीहरी विष्णूंनी राऊ नावाच्या दानवाचा कंठ आपल्या पायाच्या अंगठ्याने दाबला. त्यातून त्याने प्राशन केलेले अमृत बाहेर पडले, ते ज्या प्रवाहातून वाहिले ती अमृतवाहिनी होय. रामायणाच्या काळात जटायू पक्षाचा वावर, याच परिसरात उमटलेल्या श्रीरामांच्या पाऊलखुणा, अकोल्यातील अगस्ती आश्रम, रतनवाडीतील अमृतेश्वर, इतिहासात महाराजा शहाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजीराजे अशा विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला, कवी अंनत फंदी यांच्या फटक्यांनी आणि विठ्ठल परशरामी यांच्या चातुर्याने वेगळी ओळख दिलेला अमृतवाहिनीचा हा काठ.
पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगावचा पूल ते फादरवाडी पर्यंतचा परिसरसमोर डोळ्यासमोर ठेवून या भागातून वाहणार्या प्रवरानदीचे पात्र एकसारखे करुन त्याच्या दोन्ही बाजूच्या भूभागांचा विकास करण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी गुजरातच्या अहमदाबादमध्ये विकसित झालेल्या साबरमती नदीचा दाखलाही दिला. नद्यांच्या काठावर वाढत चाललेले शहरीकरण, त्यातून दररोज बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रियेशिवाय थेट नद्यांच्या पात्रात सोडण्याचे प्रकार, अनेक ठिकाणी गावातील जमा झालेला कचराही नद्यांच्या पात्रात टाकण्याचे प्रकार, पात्रात भर टाकून मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, त्यामुळे नद्यांच्या पारंपरिक प्रवाहातील बदल अशा विविध कारणांचा विचार करताना संगमनेरातून वाहणार्या प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांसह नाटकी आणि म्हानुटी या नाल्यांमधून वाहणार्या सांडपाण्याचे व्यवस्थापन होण्याची आवश्यकता आमदार तांबे यांनी वेळोवेळी बोलून दाखवली.
आपल्या मनातील संकल्पना घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय जलशक्ति मंत्री सी.आर.पाटील यांची भेट घेत त्यांनी संगमनेरात नदीसुधार प्रकल्पाची गरज असल्याचे त्यांना पटवून देण्यातही यश मिळवल्याचे दिसतंय. आमदार तांबे यांच्या संकल्पनेनुसार तीन-चार किलोमीटरच्या या अंतरातून वाहणारी प्रवरा आणि त्याहून निम्म्या अंतराच्या म्हाळुंगी नदीचा प्रवाह एका रेषेत आणला जाईल. नदीच्या काठावरील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या केंद्रांचे संवर्धन करुन हरित पट्टे विकसित केले जातील. गणपती विसर्जनासाठी वेगळा, पोहण्यासाठी, कपडे धुण्यासाठीही वेगळा घाट अथवा स्वतंत्र ठिकाणं असतील. आर्वतनाच्या काळात जीवरक्षक, आसपासच्या परिसरात सार्वजनिक प्रसाधनगृह, उद्यानं, कारंजी आणि मनोरंजनाची साधनं उपलब्ध करण्याचा मानसही त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे.
दोन वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. यावेळी प्रयागराजमधील कुंभमेळ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता गोदावरीच्या उपनद्यांचे आणि तेथील धार्मिक व ऐतिहासिक गोष्टींचे महत्व समोर आणल्यास या भागातील धार्मिक पर्यटनात वाढ होण्याचीही त्यांना अपेक्षा आहे. हा संपूर्ण भाग आणि अमृतवाहिनीचा प्रवाह पूर्वीच्या दंडकारण्यातून वाहत असल्याने त्याला खूप मोठे महत्त्व असल्याचा उल्लेखही आमदार तांबे यांनी सभागृहासह अन्य ठिकाणी या विषयावर बोलताना केला आहे. त्यातील काही प्रमाणातील कामही पालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाले असून येणार्या काळात त्याला गती देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आता दिसून येत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपरिषदेने राज्याच्या नगरविकास खात्याकडे सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून संगमनेरच्या प्रवरा व म्हाळुंगी या नद्यांच्या विकासासाठी 468.81 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमनेर शहरातून म्हानुटी व नाटकी नालेही वाहतात. शहराच्या भौगोलिक व पर्यावरणीय स्थितीचा विचार करता नदीसुधार प्रकल्पाची नितांत गरज असल्याचे पालिकेने आपल्या प्रस्तावात म्हंटले आहे. या चारही जलस्रोतांच्या काठांचा विकास, पूर नियंत्रण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी वरीलप्रमाणे निधी मिळावा अशी विनंती करण्यात आली असून सोबत सविस्तर प्रकल्प अहवालही सादर करण्यात आला आहे.
हा विषय समोर आल्यानंतर आता शहरातील पर्यावरणवादी कार्यकर्तेही पुढे येवू लागले असून त्यांच्याकडून या प्रकल्पाला विरोध होत आहे. नैसर्गिक जलस्रोतांच्या प्रवाहांशी छेडछाड केल्यास काय होते याचा प्रत्यय पुणेकरांनी गेल्यावर्षी घेतल्याचा दाखलाही आता समोर केला जात आहे. अशास्थितीत पालिकेने तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्रशासकीय ठरावाच्या संदर्भाने दुसर्या टप्प्यातील निधीची मागणी केल्याने येणार्या काळात संगमनेरचा ‘नदीसुधार प्रकल्प’ चर्चेत येण्याची शक्यता आहे.
संगमनेरातून वाहणार्या प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन्ही नद्यांच्या पात्रातून गेल्या दशकभरात प्रचंड वाळू उपसा झाल्याने पात्रांची खोली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी आसपासच्या जमिनधारकांनी भर टाकून नद्यांमध्ये अतिक्रमणं केल्याचीही उदाहरणं आहेत. या नद्यांमधून वाहणारे पाणीही उंचावरुन येत असल्याने त्याला अधिक वेग असतो. अशावेळी त्याच्या प्रवाह सुधारण्याच्या नावाखाली अडथळे निर्माण केले गेल्यास त्याचे दुष्परिणाम आसपासच्या लोकवस्तीला सोसावे लागू शकतात. त्यामुळे पालिकेने या प्रकल्पाविषयी लोकांना सविस्तर माहिती दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही आता पुढे येवू लागल्याने पालिकेचा ‘नदीसुधार प्रकल्प’ चांगलाच चर्चेत येण्याची शक्यता आहे.