साईनगरी पुन्हा हादरली; अज्ञाताकडून तरुणावर गोळीबार! पोलिसांचा कसून शोध सुरू; साईभक्तांसह नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, शिर्डी
जगप्रसिद्ध तीर्थस्थान असलेली साईनगरी पुन्हा एकदा हादरली आहे. शुक्रवारी (ता.10) भल्या पहाटे अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. साई मंदिर सुरू झाल्यापासून भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी होत आहे. त्यातच हा प्रकार घडल्याने साईभक्तांसह नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील लक्ष्मीनगर भागातील खासगी वाहनतळावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असून यात सूरज ठाकूर हा तरुण जखमी झाला आहे. त्याला जवळील साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबार करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकाराची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपीचा कसून शोध असून भल्या पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गावठी कट्टे मोठ्या संख्येने सापडत आहे. वाळूतस्करी यांसह इतर अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढल्याने यातील अनेकजण गावठी कट्ट्े वापरत असल्याचे समोर आलेले आहे. पोलिसांकडून कारवाई देखील होते. पंरतु, गुन्हेगारी काही थांबण्याचे नाव घेईना. त्यामुळे पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून गावठी कट्टे वापरणार्‍यांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. अन्यथा दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढल्यास पोलिसांची डोकेदुखी वाढून समाजातही भीती पसरेल.

कोविड संकटामुळे गेली काही दिवस साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने येथील जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. शासनाच्या आदेशानुसार नियम-अटींवर मंदिर पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, गोळीबारासारख्या घटना घडत असल्याने भाविकांसह ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *