खासदार साहेब, हीच ती इतिहास घडवण्याची वेळ! सोळा वर्षांच्या राजकीय प्रवासाची कसोटी; पुणे-नाशिक रेल्वे ठरवणार अंतिम मूल्यमापन..


श्याम तिवारी, संगमनेर
नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीचे मोजमाप त्यांनी किती वेळा निवडणूक जिंकली, किती पक्ष बदलले किंवा किती मोठी पदे भूषविली यावर होत नाही. अशा गोष्टी केवळ वर्तमानपत्रांच्या कात्रणात राहतात. इतिहास त्यांची नोंद ठेवतो, ज्यांच्या एका निर्णयामुळे एखाद्या प्रदेशाचे भविष्य बदलते. अनेक पिढ्यांच्या जीवनात ज्यांच्या कामामुळे सकारात्मक परिवर्तन घडते, त्यांची नावेच काळाच्या कप्प्यात कायमस्वरुपी कोरली जातात. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आज अशाच एका वळणावर उभे आहेत. त्यांच्यासमोरची संधी एखादे मंत्रीपद मिळविण्याची नाही, तर तीन जिल्ह्यांच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची आहे.


राजकारणात काही व्यक्ती पदांमुळे मोठ्या होतात, तर काही कामांमुळे. पद संपते, सत्ता बदलते, पक्ष बदलतात; पण काम शिल्लक राहते. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते झाले. काहींची नावे आजही घेतली जातात, कारण त्यांनी कोठेतरी एखादे धरण बांधले, महामार्ग दिला, उद्योग आणले किंवा संपूर्ण प्रदेशाचे अर्थकारण बदलणारा निर्णय घेतला. मात्र गेल्या सोळा वर्षात साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकार्‍यापासून ते विद्यमान खासदारापर्यंत विविध वळणे अनुभवणार्‍या भाऊसाहेब वाकचौरे यांची ओळख भविष्यात कोणत्या कारणासाठी राहणार?. सहज उपलब्ध होणारा खासदार म्हणून, की विकासाच्या इतिहासात नवे पान लिहिणारे नेतृत्व म्हणून?


खासदार वाकचौरे यांचा राजकीय प्रवास तसा अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. गेल्या सोळा वर्षांत महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणांसोबत त्यांच्या राजकीय वाटचालीतही अनेक वळणे आली. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपापल्या भूमिकेचे समर्थन केले, तर विरोधकांनी त्यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले. पक्ष बदलण्यामागे राजकीय भूमिका असू शकतात, परिस्थिती असू शकते, वैचारिक मतभेद असू शकतात. पण लोकशाहीत अंतिम निकाल मतदार देत असतो. मतदार केवळ भूमिका ऐकत नाही, तो त्या भूमिकेतून आपल्या भागाला काय मिळाले, याचाही हिशोब मांडत असतो.


याच ठिकाणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी उणीव एकाच वेळी समोर येते. त्यांच्याबद्दल आजही मतदारसंघात एक गोष्ट सहजपणे ऐकायला मिळते; खासदार साहेब भेटतात.. फोन घेतात.. आणि सामान्य माणसाला वेळही देतात. कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी ही गोष्ट छोटी नाही. पण म्हणून इतिहास फक्त भेटणार्‍या लोकप्रतिनिधींची नोंद घेतो का?, उत्तर अर्थातच नाही. इतिहास त्या लोकप्रतिनिधींची नोंद ठेवतो, ज्यांनी आपल्या काळात एखाद्या प्रदेशाच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला. ज्यांच्या नावाशी एखादा पूल, एखादा महामार्ग, एखादा सिंचन प्रकल्प, एखादे विद्यापीठ किंवा एखादा रेल्वेमार्ग जोडला गेला. कारण अशा कामांचा लाभ केवळ एका मतदारसंघाला नाही, तर पुढील अनेक पिढ्यांना मिळत असतो.


आज खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोर नेमका हाच प्रश्न उभा आहे. गेल्या सोळा वर्षांच्या राजकीय प्रवासाचे मूल्यमापन केल्यास सामान्य माणसाशी असलेला त्यांचा संपर्क हा त्यांच्यातील सर्वात मोठा गुण ठरेल. मात्र, इतिहासाला गुणांपेक्षा योगदान महत्त्वाचे असते. आजवर त्यांच्या नावावर संपूर्ण मतदारसंघाचे भविष्य बदलून टाकेल असा एखादाही विकास प्रकल्प दिसत नाही, ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही. त्यामुळेच पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा विषय केवळ रेल्वेपुरता मर्यादित नसून तो थेट भाऊसाहेब वाकचौरे यांच्या राजकीय प्रवासाशी जोडला गेला आहे.


विशेष म्हणजे, या रेल्वेमार्गाचा विचार काल्पनिक मुळीच नाही. त्यासाठी सर्वेक्षण झाले. प्राथमिक प्रक्रिया पुढे गेली. भूसंपादनाचे किचकट कामही प्रगतीवर होते. त्यामुळे लाभ होणार्‍या भागात आशेचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकर्‍यांनी, व्यापार्‍यांनी, उद्योजकांनी आणि तरुणांनी या प्रकल्पाकडे विकासाच्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली होती. अनेक गावांनी भविष्यातील बदलांची स्वप्ने रंगविली. मात्र, राजकीय घडामोडी बदलल्या आणि या प्रकल्पाच्या दिशेलाही अचानक ब्रेक लागला. आजही त्या निर्णयाबद्दल विविध पातळ्यांवर चर्चा होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपही होतात. परंतु झालेला निर्णय मात्र आहे तसाच आहे.


या रेल्वेप्रकल्पातून लोकांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न कोणत्याही एका पक्षाचे नाही.. कोणत्याही एका नेत्याचे नाही.. तर पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाची वाट पाहणार्‍या लाखो नागरिकांचे होते. हा रेल्वेमार्ग केवळ पुणे-नाशिक असा प्रवास कमी करणारा नव्हता. तर तो महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावर एका नव्या विकासपट्ट्याची निर्मिती करणारा होता. खेड, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, संगमनेर व सिन्नर या संपूर्ण पट्ट्याला उद्योग, शेती, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणारा होता. आजही या भागात फिरताना जर हा रेल्वेमार्ग झाला तर या भागचे चित्र वेगळेच असेल ही आशा जिवंत असल्याचे दिसते.


रेल्वेचा हा प्रश्न केवळ भावनिक नाही, तो आर्थिक आहे. तो सामाजिक आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तो भविष्यातील पिढ्यांच्या विकासाशी संबंधित आहे. याच कारणामुळे पुणे-नाशिक रेल्वेमार्ग फक्त पायाभूत सुविधांचा विषय राहिलेला नाही. तो या भागाच्या भवितव्याचा प्रश्न बनला आहे आणि त्याचबरोबर तो खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या राजकीय कारकिर्दीची सर्वात मोठी कसोटीही ठरला आहे.

(क्रमशः..)

 

Visits: 3 Today: 3 Total: 1902878

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *