विडी कामगार आजीचा नातू बनला शासकीय अधिकारी तुषार एरंडे सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंतापदी रुजू


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षण हा तिसरा डोळा आहे असे आपण म्हणतो. त्याचा प्रत्यय संगमनेरातील इंदिरानगरमध्ये राहणार्‍या एरंडे कुटुंबात आला आहे. विडी कामगार म्हणून काम करणार्‍या इंदुबाई एरंडे यांचा नातू तुषार उत्तम एरंडे महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन कणकवली येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून रुजू झाला आहे.

स्वर्गीय गणपत एरंडे व इंदुबाई एरंडे हे संगमनेरच्या भिकुसा यमासा क्षत्रिय विडी कारखान्यात विड्या वळण्याचे काम करायचे. त्यांना रवींद्र, उत्तम व सुदाम ही तीन मुले. मुले लहान असतानाच वयाच्या तिसाव्या वर्षी 1973 मध्ये गणपत एरंडे यांचे निधन झाले. मात्र इंदुबाई एरंडे डगमगल्या नाहीत. पती निधनाने आभाळ कोसळले तरीही विड्या बांधून त्यांनी आपल्या तीनही मुलांना शिक्षण दिले .मुलांनीही मिळेल ती कामे करुन शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा रवींद्र बारावीनंतर नाशिकला मामाकडे गेला. तिथे व्हीआयपी इन्डस्ट्रीजमध्ये नोकरी केली. नोकरी सांभाळून मास्टर इन कम्युनिकेशन अ‍ॅड जर्नालिझम ही पदवी प्राप्त केली. पत्रकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. तर सामाजिक कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य पुरस्कार, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, नाशिक महानगरपालिकेचा लोककल्याण पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त केले.

दुसरा मुलगा उत्तम यांनी एम. ए. बी.एड. ही पदवी संपादन केली व संगमनेरच्या मालपाणी विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. तिसरा मुलगा सुदाम यांनी डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन ही पदवी संपादन केली. सध्या संगमनेरला त्रिमूर्ती बुक सेलर्स नावाने व्यवसायात त्यांनी जम बसविला. इंदुबाई एरंडे यांचे द्वितीय चिरंजीव शिक्षक उत्तम एरंडे यांचा मुलगा तुषार याला लहानपणापासूनच अभ्यास आणि खेळाची आवड होती. मालपाणी विद्यालयात तुषारचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याचवेळी हँडबॉल क्रीडा प्रकारात त्याने नाव कमावले. बारावीनंतर कोपरगावला इंजिनिअरिंग शिक्षणासाठी गेला. तिथे तुषारने बी. ई. (सिव्हील) ही पदवी संपादन केली. त्याचवेळी हँडबॉल या खेळात राष्ट्रीय स्पर्धेतही यश मिळविले. बी. ई. पदवीनंतर तुषार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेच्या अभ्यासासाठी पुण्याला गेला. खुल्या प्रवर्गातून केवळ अभ्यासाच्या बळावर तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला. मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तुषारला नियुक्तीपत्र देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून तुषारची कणकवली कार्यालयात नियुक्ती झाली. अर्थात यामागे त्याची आजी इंदुबाई एरंडे यांची प्रेरणा आहे. स्वतः अशिक्षीत असली तरी विड्या बांधून या माऊलीने मुलांना उच्च शिक्षण दिले. मुले तर उच्च शिक्षित आहेच, शिवाय त्यांची दोन नातवंडे एम. बी. ए. तर तीन नातवंडे इंजिनिअरिंग पदवीप्राप्त आहेत. आज त्यांचा नातू तुषार हा एरंडे कुटुंबातील पहिला शासकीय अधिकारी झाला आहे. प्राप्त परिस्थितीला जिद्दीने सामोरे जात जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि निश्चित ध्येय समोर असले की, हमखास यश मिळते. याचे आदर्श उदाहरण म्हणजे तुषारचे यश होय. त्यामुळेच विडी कामगार आजीचा नातू महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाला आहे. तुषारचे हे यश नक्कीच सामान्य कुटुंबांना लढण्याचं बळ देणारे ठरेल.

Visits: 14 Today: 1 Total: 117862

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *