‘मुजोर’ वैद्यकीय अधिकार्‍याला पाठीशी घालण्याची ‘राजकीय’ धडपड! आरोग्य उपसंचालकांवर दबावाची चर्चा; आरोग्यमंत्र्यांची दिरंगाई देखील संशयास्पद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केवळ वैद्यकीय पेशालाच नव्हेतर संपूर्ण मानवतेलाच काळीमा फासण्याची एकामागून एक श्रृंखला घडवणार्‍या आणि त्यातून केवळ आरोग्य विभागाचीच नव्हेतर शासनाचीही लक्तरे वेशीला टांगणार्‍या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या मुजोर वैद्यकीय अधिकार्‍यावरील कारवाईवरही आता राजकीय ढग जमू लागले आहेत. अवघ्या मानवजातीला कलंकित करणार्‍या या संतापजनक घटनेत डॉ.प्रशांत थोरात यांनी कर्तव्यावर असूनही ते बजावण्यास ठाम नकार देत तब्बल 36 तास मृतदेहाची विटंबना केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या या कृत्याने हतबल झालेल्या मयत तरुणाच्या पित्याने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे, त्यावर तत्काळ कारवाई होवून या मुजोर आणि अमानवी वैद्यकीय अधिकार्‍याचे निलंबन होणे अपेक्षित असताना चक्क त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी संगमनेरातील काही ‘आजी-माजी’ राजकारणी धडपडत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे आमदार अमोल खताळ यांनी या प्रकरणी निलंबनाची लेखी मागणी करुन आठवडा होवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने आरोग्यमंत्र्यांबाबतही संशय बळावला आहे.


मागील पंधरवड्यात शुक्रवारी (ता.8) पहाटेच्यावेळी मंगळापूर शिवारातील हॉटेल ग्रीनपार्कचा संचालक सिद्धांथ नितीनकुमार काद्री (वय 27, मूळ रा.उडपी, कर्नाटक) याचा हॉटेलच्या पाठीमागील बाजूच्या त्याच्या राहत्या घरात हृदयविकाराने मृत्यू झाला. सदरची घटना तेथील कामगारांच्या लक्षात आल्यानंतर त्याला दुपारी एकच्या सुमारास घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने दुपारी दीडच्या सुमारास त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला. या घटनेबाबत कर्नाटकातील उडपीत राहणार्‍या त्याच्या वडीलांना कळवण्यात आल्यानंतर ते आपल्या नातेवाईकांसह शनिवारी (ता.9) पहाटे संगमनेरला पोहोचले.
सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील शवागारात जावून आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाची अवस्था पाहताच त्यांचा कंठ दाटला. संगमनेरात लौकीक मिळवलेली दोन-दोन हॉटेल चालवणारा, शहरातील अनेक मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध असलेला त्यांचा तरणाबांड मुलगा शवागारातील फरशीवर उघड्यावर पडून होता. ग्रामीण रुग्णालयाने त्याच्या मृतदेहावर साधे एखादे कापड टाकण्याची अथवा त्याला सन्मानजनक विच्छेदनाच्या टेबलवर ठेवण्याचीही तसदी घेतली नव्हती. धक्कादायक म्हणजे त्याचवेळी अन्य एक मृतदेह देखील त्याच स्थितीत तेथे पडून होता. गुरुवारी रात्री झोपायला गेल्यानंतर शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंतच्या कालावधीत कधीतरी त्याला हृदयविकाराचा धक्का बसून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पित्यासह नातेवाईकांना मान्य असल्याने त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉ.प्रशांत सुरेश थोरात या वैद्यकीय अधिकार्‍याची भेट घेवून ‘आमची कोणतीही तक्रार नाही, कृपया मुलाचे शवविच्छेदन करुन द्यावे, त्याचा मृतदेह मूळगावी दीड हजार किलोमीटरवर न्यायचा आहे’ अशी त्यांना विनवणी केली.


मात्र संबंधित वैद्यकीय अधिकार्‍याने शयवविच्छेदन करण्यास ठामपणे नकार देत कोणालाही सांगितले तरीही मी विच्छेदन करणार नाही अशी राजेशाही भूमिका घेतली. आपल्या तरुण कर्त्या मुलाच्या मृत्यूने आधीच दुःखात असलेल्या त्या अभागी पित्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वरीष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांना भेटून त्यांना घडला प्रकार सांगत विनवणी केली, त्यांनीही शवविच्छेदन करुन देण्याची सूचना केली. मात्र आपल्याजवळील ‘विशिष्ट कार्ड’ आणि सोबत मंत्रालयातून मिळणारा सूप्त पाठींबा या बळावर या अमानवी वैद्यकीय अधिकार्‍याने वरीष्ठांच्या सूचनाही फाट्यावर मारुन त्या दुर्दैवी पित्याला आपल्या लेकाच्या मृत्यूनंतर सुमारे 36 तासांनी त्याचा मृतदेह घेवून लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जाण्यास भाग पाडले. तेथून पुढे विच्छेदनाचे सोपस्कार आटोपून तब्बल 40 तासांनी त्यांना आपला पुढील प्रवास करावा लागला.


घडल्याप्रकाराचे कागदावर सत्य कथन मांडून त्यांनी त्याच दिवशी (ता.9) जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार केली. याच तक्रारीवरुन दैनिक नायकने आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना सलग दोन दिवस लिखाण करुन ग्रामीण रुग्णालयातील या डॉक्टरांची मनमर्जी आणि त्याची दादागिरी चव्हाट्यावर आणली. त्यावरुन रुग्णालयाच्या अधिक्षकांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून 24 तासांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले, मात्र या महाशयांनी उलट तक्रारदारावरच दबाव आणल्याचा, मारहाण व दमबाजी केल्याचा आरोप करीत चक्क वास्तव मांडणार्‍या दैनिक नायकच्या संपादक व कार्यकारी संपादकांवरच शासकीय परिपत्रके, सेवाशर्ती व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करीत थेट अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यावरुनही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणं अपेक्षित आहे.


मयत तरुणाचे वडील नितीनकुमार काद्री यांची लेखी तक्रार आणि ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालावरुन जिल्हा शल्यचिकित्सकांनी घटनेच्या तब्बल 15 दिवसानंतर चौकशी समिती नेमून संगमनेरला पाठवली. मात्र या समितीने तक्रारदार, साक्षीदार आणि ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी चव्हाट्यावर आणणार्‍या दैनिक नायकच्या कार्यकारी संपादकांचे जवाब न घेताच पुन्हा अहिल्यानगर गाठले. त्यावरुन जिल्हा शल्यचिकित्सकांनी इतक्या गंभीर आणि संतापजनक प्रकारानंतरही गंभीर आरोप असलेल्या आणि मृतदेहाची विटंबना केल्यावरुन निलंबनासह कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित असलेल्या डॉ.प्रशांत थोरात यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न चालवल्याचे दिसून येते.


दुसरीकडे या भयानक प्रकाराची गंभीर दखल घेत तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना कठोर कारवाईच्या सूचना करीत संबंधित डॉक्टरला तत्काळ शासकीय सेवेतून निलंबित करावे यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी पत्रव्यवहार केला. सदरची बाब समोर आल्यानंतर संगमनेरातील काही ‘आजी-माजी’ राजकारण्यांनी नागरी हित सोडून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मानवताच पायदळी तुडवणार्‍या या वैद्यकीय अधिकार्‍याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष कारवाईचे आदेश काढण्याचा अधिकार असलेल्या नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांवर राजकीय दबाव निर्माण केल्याची चर्चा सुरु आहे. या शिवाय संबंधितांकडून थेट आरोग्यमंत्र्यांकडेही कारवाई टाळण्यासाठी बिळं बुजवली गेल्याची माहिती मिळत आहे. त्यावरुन शहरातील ‘काही’ राजकारण्यांना सार्वजनिक आरोग्यापेक्षा आपली राजकीय व्यवस्था अधिक महत्वाची असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.


एकंदरीत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या घटनेतून अतिशय कनिष्ठपदावर कार्यरत असलेल्या डॉ.प्रशांत सुरेश थोरात यांचे वेगवेगळे किस्से, मनमानी प्रकार, वरीष्ठ व कनिष्ठ सहकारी अशा सर्वांशी मुजोरीने वागण्याच्या घटना, प्रत्येकवेळी आपले ‘विशिष्ट कार्ड’ वापरुन मनमानी करण्याचा, नाशिकहून दररोज अपडाऊन करुन सेवेपेक्षा भलतेच उद्योग करण्याच्या आणि त्या विरोधात कोणी चकार उच्चारला तर त्याच्या विरोधातच भलतेसलते साचेबद्ध आरोप करीत तक्रार करण्याच्या प्रकाराने त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य विभागात ‘दहशत’ निर्माण केली असून त्यांच्या या कृत्यातून चक्क जिल्हा शल्यचिकित्सकही सुटले नसल्याने हा अधिकारी अधिक मुजोर झाला आहे. या वैद्यकीय अधिकार्‍यावर कारवाई करण्यास कोणीही धजावत नसल्याचे भयानक वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे.


घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात लोकसेवक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.प्रशांत थोरात यांच्याबाबत दबक्या आवाजात असंख्य तक्रारी असून त्यांच्या ‘विशिष्ट कार्ड’मुळे कोणीही त्या विरोधात उघड भूमिका घेण्यास धजावत नाही. धक्कादायक म्हणजे अलिकडच्या काळातच रुजू झालेल्या या महाभागाने रुग्णालयाचे नियम सांगणार्‍या चक्क अधिक्षकांविरोधात तक्रारअर्ज दाखल करुन त्यांना कचाट्यात आणले होते, त्यांच्या या मनमानी कृत्याला मंत्रालयात सेवेत असलेल्या ‘अज्ञात शक्ति’चे पाठबळ असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरु असून या महाशयाच्या तक्रार अटॅकमधून जिल्हा शल्यचिकित्सकही सुटलेले नसल्याने त्यांनी मयत तरुणाच्या वडीलांच्या गंभीर तक्रारीवरही थातूरमातूर कारवाई करुन प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न चालल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात या वैद्यकीय अधिकार्‍याच्या मुजोरीत किलोने भर पडणार असून संगमनेरची आरोग्य व्यवस्थाच आता व्हेंटीलेटरवर येण्याची भीती आहे.

Visits: 7 Today: 7 Total: 1832810

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *