‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्ग कोमात मात्र औद्योगिक महामार्ग जोमात! शासनाकडून भूसंपादनासाठी अधिसूचना; संगमनेर तालुक्यातील तेवीस गावे होणार बाधित..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रदीर्घ कालावधीपासून तीन जिल्ह्यातील लाखों नागरिकांना प्रतिक्षा असलेला ‘पुणे-नाशिक’ सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याने ‘कोमात’ गेला आहे. त्याचवेळी गेल्या पंधरवड्यात राज्य शासनाने घोषित केलेला 213 किलोमीटर लांबीचा पुणे-नाशिक ‘विशेष’ ग्रीनफिल्ड औद्योगिक द्रुतगती महामार्ग मात्र ‘जोमात’ आला आहे. 20 हजार कोटी रुपये खर्चाच्या या संपूर्ण नवीन महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने अधिसूचनाही जारी केली असून पुणे जिल्ह्यातील चार आणि अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संपादीत होणार्‍या जमिनींचे गटक्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या महामार्गासाठी संगमनेर तालुक्यातील केळेवाडी (बोटा) ते कासारे पर्यंतच्या 23 गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.


पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जून 2023 मध्ये घेतला होता. यासाठी नेमलेल्या सल्लागार संस्थेने त्याबाबतच अहवाल सादर केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या पंधरवड्यात (7 फेब्रुवारी) पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाच्या 213 किलोमीटर लांबीच्या अंतिम आखणीस मान्यता देत बांधणीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर सोपविली. नव्याने होत असलेल्या या महामार्गामुळे पुणे ते नाशिक रस्ते प्रवासाचे अंतर पाच तासांवरुन अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे. त्यासोबतच या महामार्गाने भोसरी, चाकण, रांजगणगाव, सिन्नर व मुसळगाव या औद्योगिक वसाहतींना जोडले जाणार असल्याने पुणे, नाशिकसह अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची आशा आहे.


राज्यभरातील दळणवळण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने राज्यात 4 हजार 217 किलोमीटर महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 213 किलोमीटर लांबीच्या पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाचाही समावेश आहे. अंदाजे 20 हजार कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर कमी वेळेत पार करता येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करुन प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास केला आहे. तुलनात्मकदृष्ट्या सर्वाधिक सुयोग्य आखणीचा विचार या महामार्गासाठी करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने यापूर्वीच काढलेल्या आपल्या आदेशात म्हंटले आहे.


नव्याने आकाराला येत असलेला हा द्रुतगती महामार्ग पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातून जाणार असून त्यातून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासह माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रालाही (आय.टी) चालना मिळणार आहे. या महामार्गाने मुंबई-नाशिक-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोणही साधला जाणार असल्याने संगमनेर तालुक्यातील उद्योग-व्यवसायासह, नोकरदार, विद्यार्थी व शेतकर्‍यांनाही त्यांचा मोठा फायदा होईल. प्रस्तावित द्रुतगती महामार्गाची आखणी रेषा राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर अशा महत्त्वाच्या शहराजवळून प्रस्तावित करण्यात आली आहे. या महामार्गावरुन पुण्याहून शिर्डीचे अंतर 135 किलोमीटर, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंज (सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग) 60 किलोमीटर व सुरत – चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक-निफाड राज्यमार्गाचा भाग) लांबी 18 किलोमीटर असा एकूण 213 किलोमीटर अंतराचा असणार आहे.


वर्षभरापूर्वी प्रस्तावित झालेल्या या द्रुतगती महामार्गाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने तीनही जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरीही गेल्या तीन दशकांहून अधिक कालावधीपासून प्रतिक्षा असलेल्या ‘पुणे-नाशिक‘ सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्याने या आनंदालाही नाराजीची किनार जोडली गेली आहे. त्यामुळे एकीकडे मोठी प्रतिक्षा असलेला रेल्वेमार्ग ‘कोमात’ गेलेला असताना नव्याने आकाराला येवू पाहणारा पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग मात्र जोमात असल्याचे दिसत आहे.


या प्रस्तावित द्रुतगती महामार्गासाठी संगमनेर तालुक्यातील एकूण 23 गावे बाधित होणार आहेत. त्यात केळेवाडी, माळवाडी, बोटा, येलखोपवाडी, अकलापूर, आभाळवाडी, खंदरमाळ, नांदूर खंदरमाळ, डोळासणे, शेंडेवाडी, हिवरगाव पठार, साकूर, रणखांबवाडी, मालुंजे, डिग्रस, शेडगाव, ओझर बु., उंबरी, बाळापूर, मांची, कोंची, मेंढवण व कासारे ही 23 गावे बाधित होणार असून रेखांकनानुसार या गावांमधील बाधित होणार्‍या क्षेत्राचे गटक्रमांक राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. लवकरच त्याच्या संपादनाची प्रक्रियाही सुरु केली जाणार आहे.


राज्य शासनाने बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक रेल्वेमार्गात व्हाया ‘शिर्डी’चा खोडा घालून संगमनेर व सिन्नरकरांची नाराजी ओढावून घेतली असताना नव्याने जाहीर झालेल्या औद्योगिक द्रुतगती महामार्गाने त्यावर काहीशी फूंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र म्हणून या दोन्ही तालुक्यातील नागरीकांनी रेल्वेमार्गाचा आग्रह सोडलेला नसून शिर्डीसाठी दोडीजवळ जंक्शन उभारण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशातच नाशिक पदवीधर मतदार संघाचे सदस्य, आमदार सत्यजीत तांबे यांनी नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव, मंचर, शिरुर, संगमनेर, सिन्नर व नाशिकमधील आमदार आणि खासदारांशी पत्रव्यवहार करुन प्रस्तावित रेल्वेमार्गात बदल करण्यास विरोध दर्शवित आंदोलन उभे करण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले आहे. त्यातून रेल्वेमार्ग आणि द्रुतगती महामार्ग दोन्हीही पदरात पडल्यास या संपूर्ण परिसराचा दुप्पटगतीने विकास होण्याची आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *