आमदार अमोल खताळांकडून श्रीरामपूर आरटीओ प्रशासनाची पोलखोल! उर्मट अधिकार्यांची ‘सार्वजनिक’ कानउघडणी; थेट परिवहन मंत्र्यांकडे ‘ऑनलाईन’ तक्रार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वसामान्य वाहनधारकांना नेहमीच नकोशा असलेल्या, भ्रष्टाचारात आकांत बुडालेल्या आणि मनमानी कारभारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) दुय्यम अधिकार्यांचा उद्दामपणा खुद्द संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी आज प्रत्यक्ष अनुभवला. तालुक्यातील वडगाव पान येथील डी.के.मोरे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विशेष आरटीओ शिबिरात हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. लोकप्रतिनिधी समोर उभे असतानाही खुर्चीवरुन न उठणार्या आणि ‘ओळखलंच नाही’ अशी उर्मट उत्तरे देणार्या या लाचखोर अधिकार्यांची आमदारांनी जाहीर कानउघडणी केली. याप्रकरणी त्यांनी थेट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधून या अनागोंदी प्रकाराची तक्रार करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत साठवलेले पाणी दुष्काळाने होरपळणार्या 21 गावांना सोडण्याचा कार्यक्रम आटोपून आमदार अमोल खताळ संगमनेरकडे परतत होते. जनसामान्यांचे नेते म्हणून परिचित असलेल्या आमदार खताळ यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत होणार्या छळाबाबत आणि दलालांच्या सुळसुळाटाबाबत असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, वडगाव पान येथे सुरु असलेल्या आरटीओ शिबिरात आर्थिक लूट होत असल्याची खात्री करण्यासाठी आमदारांनी कोणताही ताफा न घेता, अचानक, पूर्वसूचना न देता थेट शिबिरस्थळी धाड टाकली. आमदारांच्या या ‘सरप्राइज व्हिजिट’मुळे शिबिरात उपस्थित असलेल्या दुय्यम अधिकार्यांची एकच तारांबळ उडाली.

आमदार खताळ यांनी शिबिरस्थळी प्रवेश करताच तेथील भीषण वास्तव समोर आले. रक्ताचे पाणी करुन आणलेले वाहन नोंदणी व परवान्यासाठी आलेले वृद्ध, शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्य वाहनधारक भर उन्हात ताटकळत उभे होते, तर दुसरीकडे शासकीय कर्तव्याचा विसर पडलेले दुय्यम अधिकारी स्वतः मात्र पंख्याच्या हवेत आरामात बसले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांनी दलालांच्या माध्यमातून चालणार्या येथील व्यवस्थेवर बोटं ठेवून तक्रारींचा अक्षरशः पाढाच वाचला. जनतेचा हा आक्रोश ऐकून आमदारांचा पारा चढला आणि त्यांनी शासकीय अधिकाराचा गैरवापर करणार्या परिवहन अधिकार्यांना कडक शब्दांत धारेवर धरले.

धक्कादायक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला ‘जायंट किलर’ म्हणून परिचित असलेले आमदार अमोल खताळ समोर उभे ठाकले असतानाही, सुरुवातीला या उद्दाम अधिकार्यांनी साधी आपली खुर्ची सोडण्याची तसदीही घेतली नाही. यावर आमदारांनी त्यांचे कान उपटताच ‘सर, आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही’ असे निर्लज्जपणाचे उत्तर संबंधित अधिकार्यांनी दिले. त्यांच्या या उर्मट वागणुकीने तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला होता. आमदारांनी परिवहन विभागाच्या अधीक्षकांना मोबाईलवरुन घटनास्थळावरील प्रकार सांगत दलालांमार्फत सुरु असलेली ही लूट आणि सर्वसामान्यांची अडवणूक बंद झाली पाहिजे, पुन्हा तक्रार आल्यास थेट उपमुख्यमंत्र्यांकरवी कठोर कारवाईचा इशारा दिला.

या अधिकार्यांच्या सर्वसामान्यांप्रति मुजोरीचा कळस पाहून आमदार अमोल खताळ यांनी थेट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन लावला. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कशाप्रकारे दलालांना हाताशी धरुन जनतेची लूट करत आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी मंत्र्यांच्या कानावर घातली. आरटीओ शिबिरातील या गंभीर अनागोंदीची दखल घेत परिवहन मंत्री सरनाईक यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आणि दोषी अधिकार्यांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या रोखठोक कारवाईमुळे वर्षानुवर्षे आरटीओच्या छळाला कंटाळलेल्या संगमनेर तालुक्यातील वाहनचालकांमध्ये समाधान निर्माण झाले आहे.

सर्वसामान्य नागरीक उपप्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) कामासाठी पदरमोड करुन इतक्या दूरवर येतात. त्यांना उन्हात तासनतास ताटकळत ठेवून परिवहन विभागाचे दुय्यम अधिकारी मात्र पंख्याखाली बसून दलालीला खतपाणी घालत आहेत. दलालांशिवाय सामान्य माणसाच्या फाईलला हातही लावायचा नाही, ही श्रीरामपूर आरटीओ प्रशासनाची मुजोरी यापुढे सहन केली जाणार नाही. लोकप्रतिनिधींचा अनादर करणार्या आणि जनतेला लुटणार्या अशा उर्मट अधिकार्यांची तक्रार राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे केली असून, या भ्रष्ट साखळीवर कठोर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
– आमदार अमोल खताळ,
संगमनेर विधानसभा मतदारसंघ

