ग्रामीण भागातील संक्रमणात सुरु असलेली रुग्णवाढ आजही कायम..! आश्वी बुद्रुक मध्ये कोविडचा उद्रेक तर, शहरात कोविडवरील नियंत्रण आजही अबाधित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
थंडीच्या दिवसांत तालुक्यातील संक्रमणात वाढ होण्याचा अंदाज काही प्रमाणात सत्यात उतरत असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. महिन्याच्या पहिल्या दिवशी अवघ्या सतरा रुग्णांचे अहवाल समोर आणणार्या कोविडने मंगळवार वगळता उर्वरीत चारही दिवसांत तिसापेक्षा अधिक रुग्ण समोर आणल्याने तालुक्यातील रुग्णवाढीच्या गतीत काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे या महिन्यातही कोविडचे संक्रमण कमी प्रमाणात का असेना पण कायम राहील असा काहीसा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. आजही शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून तालुक्यातील 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील पाच जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता साडेचार हजार रुग्णसंख्येच्या दिशेने अग्रेसर झाला असून रुग्णसंख्या 4 हजार 474 वर पोहोचली आहे.

सप्टेंबरमध्ये उच्चांक गाठणार्या कोविड बाधितांच्या संख्येला गेल्या महिन्यात ओहोटी लागल्याने कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे ‘कोविड मुक्ती’च्या संगमनेरकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. गेल्या महिन्याप्रमाणे या महिन्यातही शहरी रुग्णसंख्या आत्तापर्यंत पूर्णतः नियंत्रणातच आहे, मात्र त्याचवेळी ग्रामीण रुग्णगतीत सातत्य कायम राहील्याने काहीशा कमी वेगाने मात्र तालुक्याची रुग्णसंख्या वाढतीच आहे. त्यामुळे निश्चितच काहीशा चिंता दाटल्या आहेत.

हिंदु धर्मामध्ये घराघरात साजरा होणारा दिवाळी सण अवघ्या आठवड्यावर येवून ठेपला आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कोविडचे संक्रमण काही प्रमाणात थोपल्याची स्थिती आज असली तरीही कोविड अजून गेलेला नाही याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ऑगस्टमध्येही सण-उत्सवाला बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने शेवटच्या आठवड्यासह संपूर्ण सप्टेंबरमध्ये कोविडने तालुक्याच्या सर्वच भागात अक्षरशः थैमान घातले होते. तशीच स्थिती यावेळीही निर्माण होत असून खरेदीसाठी बाहेर पडतांना नागरिकांचे नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास आज नियंत्रणात असलेली स्थिती अनियंत्रित होण्याची दाट शक्यता आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून दोघांचे, खासगी प्रयोगशाळेकडून आठ जणांचे, तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. आजच्या अहवालातही शहरातील अवघ्या पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरी संक्रमणावर सध्या तरी नियंत्रण मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आजच्या अहवालातून ग्रामीण भागातून तब्बल 29 रुग्ण समोर आले आहेत. त्यातील नऊ रुग्ण एकट्या आश्वी बुद्रुक मधील आहेत. आपल्याला काहीच होणार नाही, असा खोटा आत्मविश्वास मनात बाळगून बिनधास्तपणे नियमांची पायमल्ली करीत सामाजिक जीवनात वावरल्यास काय घडू शकते, याचे उदाहरणच या एकाच वेळी गठ्ठ्याने समोर येणाऱ्या रुग्णांवरुन दिसून येते.

आज प्राप्त झालेल्या अहवालातून माळीवाडा परिसरातून पुन्हा एक रुग्ण समोर आला असून तेथील 38 वर्षीय तरुणाला कोविडची लागण झाली आहे. यासोबतच शिवाजीनगर परिसरातील 18 वर्षीय तरुणी, विद्यानगर परिसरातील 40 वर्षीय महिलेसह 12 वर्षीय बालक व साईबन कॉलनीतील 27 वर्षीय तरुणालाही कोविडचे संक्रमण झाले आहे. ग्रामीण भागातील उंबरी बाळापुर येथील 61 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय तरुण, राजापूर येथील 55 वर्षीय इसम, सुकेवाडी येथील 36 वर्षीय तरुण, धांदरफळ येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कनोली येथील 51 वर्षीय इसम, वडगावपान येथील 51 वर्षीय इसम,

निमज येथील 46 वर्षीय इसमासह 22 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय महिला, गुंजाळवाडी शिवारातील रहाणे मळा भागातील 31 वर्षीय तरुण, मिर्झापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कुरकुंडी येथील 70 वर्षीय महिला, बोटा येथील 42 व 38 वर्षीय तरुण, पोखरी येथील 32 व 30 वर्षीय महिला. तर आज आश्वी बुद्रुक मधून तब्बल 9 तर आश्वी खुर्द मधून एक रुग्ण रुग्ण समोर आला आहे. त्यात आश्वी खुर्द मधील 45 वर्षीय तरुणाला तर आश्वी बुद्रुक मधील 28 व 18 वर्षीय तरुणासह 14 व चार वर्षीय बालक 73, 42, 38, 25 व 16 वर्षीय महिला संक्रमित असल्याचेही समोर आले आहे. ग्रामीण भागातील संक्रमणात झालेली वाढ आजही कायम असल्याने संगमनेरकरांच्या चिंता आजही कायम आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुका साडेचार हजार रुग्णसंख्येच्या दिशेने अग्रेसर होत 4 हजार 474 वर पोहोचला आहे.

