शहरातील तीन व्यापारी संकुलांना ‘धोकादायक’ इमारतींची श्रेणी! पालिकेने बजावल्या गाळेधारकांना नोटीसा; व्यापार्‍यांकडून विरोध होण्याची शक्यता..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चार दशकांपूर्वी पालिकेने नवीन नगररस्त्यावर बांधलेल्या दुर्वेनाना व्यापारी संकुलासह रंगारगल्लीत आजवर कधीही न भरलेला भाजीबाजार आणि नेहरु उद्यानाबाहेरील एकूण 61 व्यावसायिक गाळेधारकांना पंधरा दिवसांत गाळे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठी पालिकेने ‘स्ट्रक्श्‍चरल ऑडिट’चे कारण सांगून या इमारतींचे आयुष्य संपल्याचे नोटीसमध्ये नमूद केल्याने गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत. त्या विरोधात आता तेथील व्यावसायिकांची एकजूट होत असून नेहरु उद्यान व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी पालिकेचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत पालकमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. गेल्या दोन ते अडीच दशकांपासून व्यवसाय करणार्‍या येथील व्यापार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच मुख्याधिकार्‍यांनीही सौम्य भूमिका घेतली असून व्यापार्‍यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत.


पालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या बांधकामांची पडताळणी करुन त्यांचे ‘स्ट्रक्श्‍चरल ऑडिट’ केले जाते. त्यानुसार यापूर्वी पालिकेच्या अशा ‘ऑडिट’मध्ये शहरातील काही खासगी वाड्यांसह 1980 च्या आसपास पालिकेने बांधलेले नवीन नगररस्त्यावरील दुर्वेनाना व्यापारी संकुल यापूर्वीच धोकादायक ठरवले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पावसाळ्यापूर्वी पालिकेने वेळोवेळी या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यातच येथील व्यापारी संकुल नाल्यावर बांधण्यात आल्याने त्यावरुन शहरात नेहमीच राजकीय चर्चाही तापल्या आहेत. मात्र पालिकेकडून आजवर नोटीसा बजावण्याशिवाय अन्य कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही.


यावेळी मात्र पालिकेच्या बांधकाम विभागाकडून साथी भास्करराव दुर्वेनाना व्यापारी संकुलातील 34 गाळ्यांसह दर्शनीभागातील अपवाद वगळता आजवर कधीही वापरात न आलेल्या रंगारगल्लीतील भाजीबाजारातील सहा, नेहरु उद्यानाच्या संरक्षक कुंपनालगत दोन भागात दुमजली स्वरुपात बांधलेल्या व्यापारी संकुलातील 21 गाळे ‘धोकादायक’ श्रेणीत टाकले आहे. त्या अनुषंगाने या तिनही व्यापारी संकुलातील 61 भोगवटाधारकांना 15 दिवसांच्या आत गाळे खाली करुन पालिकेला त्याचा ताबा देण्यास सांगण्यात आले आहे.


मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या स्वाक्षरीसह बजावण्यात आलेल्या या नोटीसांमध्ये मालमत्ता हस्तांतर अधिनियमाचा दाखला देत पालिकेने 35 महिन्यांच्या व्यावसायिक करारावर वापरासाठी घेतलेल्या गाळ्यांची करार मुदत गेल्या वर्षीच संपल्याचा दावा केला आहे. जिल्हाधिकार्‍यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्त हानी टाळण्यासाठी जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींचे स्ट्रक्श्‍चरल ऑडिट करण्यात आल्याचा व त्याप्रमाणे सदरील इमारती सार्वजनिक वापरास धोकादायक असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.


आगामी पावसाळ्यात अशा धोकादायक इमारती अथवा त्यांचा काही भाग कोसळण्याची शक्यता गृहीत धरुन ती टाळण्यासाठी नगरपालिका कौंसिलने 27 मार्चरोजी ठराव करुन जुन्या व जीर्ण इमारतींच्या स्ट्रक्श्‍चरल ऑडिटमध्ये ‘धोकादायक’ ठरलेल्या शहरातील पालिकेच्या मालकीच्या या तिनही व्यापारी संकुलांना पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर या गाळ्यांमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करणार्‍या 61 गाळेधारकांना 15 दिवसांत गाळे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.


पालिकेच्या नोटीस कारवाईने प्रपंच धोक्यात आलेल्या नेहरु उद्यान व्यापारी संकुलातील काही गाळेधारकांनी एकत्रित येवून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांना निवेदन दिले असून पालिकेची कारवाई अन्यायकारक आणि त्यांचे जीवन उध्वस्त करणारी असल्याने त्याला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्याधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी नेहरु उद्यान व्यापारी संकुलाबाबत काहीशी लवचिक भूमिका दाखवली असून गाळेधारकांना विश्‍वासात घेवूनच कारवाईचे संकेत दिले आहेत, त्यातून तेथील व्यापार्‍यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.


जिल्हाधिकार्‍यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत जीर्ण व धोकादायक इमारतींबाबतचे धोरण ठरवण्यात आले असून अशा इमारतींचे स्ट्रक्श्‍चरल ऑडिट केल्यानंतर त्या मानवी वापरास धोकायदायक ठरल्यास त्या पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पालिका कौंसिलनेही ठराव करुन या धोरणाला मंजूरी दिली होती. पालिकेच्या बांधकाम विभागाने प्रचलित पद्धतीनुसार केलेल्या सर्वेक्षणातून यापूर्वीच धोकादायक ठरलेल्या साथी भास्करराव दुर्वेनाना व्यापारी संकुलातील 34 गाळ्यांसह नेहरु उद्यान व्यापारी संकुलातील 21 आणि रंगारगल्ली भाजी बाजारातील नवीन आणि जुन्या प्रत्येकी तीन गाळेधाकरांना 15 दिवसांत गाळे खाली करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. नेहरु उद्यान संकुलातील व्यापार्‍यांकडून होणारा विरोध लक्षात घेवून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, चर्चेतून मध्यम मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.
दयानंद गोरे
मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद

Visits: 2 Today: 2 Total: 1825181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *