बळजोरीने लग्नं करुन तरुणीवर अमानुष अत्याचार! राजूरमधील घटना; चौघांवर हुंडाबळीच्या कलमान्वये गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, राजूर
कौंटुंबिक गरीबीचा फायदा घेत राजूरमधील चाँद सरदार शेख याने मूळच्या कोतुळ येथील एका अल्पवयीन मुस्लिम तरुणीला आपल्या अधेड मुलाशी विवाह करण्यास भाग पाडले. लग्नानंतर पहिल्याच दिवशी आपली फसवणूक झाल्याचे अणि आपला नवरा बाहेरख्याली असल्याचे नवर्‍या मुलीच्या लक्षात आल्याने तिने जाब विचारला. तेव्हापासूनच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु झाला. कायद्याच्या विरोधात जावून अल्पवयीन मुलीशी विवाह लावण्यासह तिच्या पोटातील गर्भ पाडण्यासाठी तिच्यावर दबाव आणून मारहाण करण्यापर्यंत बाहेरख्याली असलेल्या दाऊद शेखसह त्याचे आई-वडील, भाऊ आणि आत्याही सहभागी झाले. अत्यवस्थ अवस्थेत पीडितेच्या भावाने सुरुवातीला राजूर व नंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी राजूर पोलिसांनी पीडितेच्या जवाबावरुन नवरा, सासु-सासरे व दीरावर हुंडाबळीच्या तरतुदींसह कौंटुंबिक हिंसाचार, मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत राजूर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार आजरोजी एकोणावीस वर्षीय असलेल्या मूळच्या कोतुळ येथील विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गेल्यावर्षी 12 मे 2023 रोजी पीडितेचा विवाह राजूर येथील दाऊद चाँद शेख याच्यासोबत कोतुळ येथील एका मंगल कार्यालयात मुस्लिम पद्धतीने बळजोरीने पार पाडण्यात आला. नवरा मुलगा दाऊद शेख हा तोतया पत्रकार म्हणून त्यावेळी मिरवत होता. मुलगी अल्पवयीन असल्याने पीडितेच्या आईने लग्नाला कडाडून विरोध केला होता. मात्र मुलाचा बाप चाँद सरदार शेख याने आपण सोळा वर्षांच्या मुलींचे लग्नं लावले असल्याची शेखी सांगत जबरदस्तीने लग्नं लावून दिले. लग्नाच्या प्रमाणपत्रावर त्याने मुलीचे वय अधिक दाखवून अधेड असलेल्या आपल्या मुलाचे वय मात्र कमी करुन दाखवले.


लग्नाच्या दुसर्‍याच दिवसापासून सासरा चाँद, सासू आरिफा, दीर रियाज व आत्यासासू अवेदा यांच्याकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला. आपल्या नवर्‍याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यानंतर तिने त्याबाबत विचारणा केली असता नवरा दाऊदही आपल्या कुटुंबाच्या हिंसाचारात सहभागी झाला आणि अल्पवयीन पीडितेला मारहाण करु लागला. त्यामुळे लग्नानंतर महिन्याभरातच तिला माहेरी यावे लागले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी संगमनेरातील एका वकिलामार्फत समझौता बैठकही ठरवली. त्यावेळी झालेल्या करारात यापुढे शारीरिक व मानसिक छळ करणार नाही असे लिहून देण्यात आले. त्यामुळे लग्न होवून तीन महिने मोहरवासीन राहिलेली अल्पवयीन मुलगी 5 सप्टेंबर 2023 रोजी पुन्हा सासरी नांदण्यासाठी राजूरला गेली.


आता सगळं व्यवस्थित होईल असे अपेक्षित असताना पुन्हा सासरची मंडळी आपल्या रंगात आली. रोज मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या सुरु झाल्या. या दरम्यान पीडितेला दिवस गेले. ही गोष्ट समजल्यानंतर सासरा चाँद आणि सासू आरिफाचा तर पाराच चढला. त्यांनी ‘आम्हाला प्रॉपर्टीला वारस नको, तु पण नको आणि ते बाळंही नको’ असे म्हंणत तिला  बळजोरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने त्याला नकार दिल्यानंतर या सर्वांनी तिला इतकी बेदम मारहाण केली की त्यात ती बेशुद्ध पडली. इतकं सगळं केल्यानंतरही शिरजोर असलेल्या दाऊद शेख याने पीडितेच्या भावाला फोन करुन त्याला व त्याच्या आईला अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर पीडितेच्या आई-वडील व भावाने तत्काळ राजूर गाठले असता त्यांची मुलगी स्वयंपाक घरात बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे त्यांना दिसले.


यावेळी पीडितेच्या सासू-सासर्‍यांसह दीर व आत्यासासूने त्यांनाही काठीने बेदम मारहाण केली. पीडितेच्या कुटुंबियांनीच तिला अत्यवस्थ अवस्थेत सुरुवातीला राजूर पोलीस ठाणे व त्यानंतर राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तेथेच तिच्यावर उपचार सुरु होते. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांकडून कोणतीही कायदेशीर कारवाई होवू नये यासाठी चाँद सरदार शेख, दाऊद चाँद शेख व रियाज चाँद शेख यांनी वेगवेगळ्या मार्गाने दमदाट्या, धमक्या देवून प्रचंड दबाव निर्माण केला. सदरची बाब संगमनेरच्या लोकपंचायतच्या सदस्यांना समजल्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेवून त्यांना मदतीचे आश्‍वासन दिले.


या प्रकरणी 19 वर्षीय पीडितेने राजूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दाऊद चाँद शेख (नवरा), आरिफा चाँद शेख (सासू), चाँद सरदार शेख (सासरा) व रियाज चाँद शेख (दीर) या चौघांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 498 (अ), 315, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेतून चाँद सरदार शेख याने धमक्या व बळजोरी करुन अल्पवयीन मुलींचे विवाह लावून बालविवाह कायद्याचाही भंग केला आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या कायद्यातील तरतुदींनुसारही कारवाई होण्याची गरज आहे.

Visits: 45 Today: 1 Total: 114341

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *