आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मनसे’चा प्रकल्प कार्यालयात ठिय्या आमदार व प्रकल्प अधिकारी यांच्यात झाली शाब्दिक चकमक

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर प्रकल्प कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांना श्रीरामपूर येथील एका शाळेने प्रवेश नाकारल्याने आणि मवेशीतील शाळेने दोन विद्यार्थिनींना थेट दाखले काढून दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी (ता.1) राजून प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

राजूर प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना विविध नामांकित शाळांमध्ये पाठविले जाते. श्रीरामपूर येथील सेंट झेव्हिअर्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रकल्प कार्यालयामार्फत सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात सुमारे वीस विद्यार्थी पाठविण्यात आले होते. तेथे सहा वर्ष विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर अचानक तेथील शाळा व्यवस्थापनाने वसतिगृहाला विद्यार्थी ठेवणे परवडत नसल्याने तुमच्या मुलांना प्रवेश देत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांसमोर पुढील शिक्षणाचं काय करायचं हा प्रश्न उभा राहिला. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकार्यांची भेट घेतली असता तुमची आठ दिवसांत दुसर्या शाळेत व्यवस्था केली जाईल असे सांगितले. मात्र दीड महिने उलटूनही प्रकल्प कार्यालयामार्फत तारीख पे तारीख भेटल्याने अखेर पालकांनी मनसेकडे धाव घेतली. त्यानंतर मनसेचे ज्ञानेश्वर लेंडे यांनी संबंधित विषयासंदर्भात प्रकल्प अधिकार्यांची भेट घेतली असता हा विषय आमच्या स्तरावर नसल्याचे सांगितले. त्यावर आठ दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश भेटला नाही तर विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करू असे लेखी निवेदन मनसेच्यावतीने देण्यात आले होते.

तसेच शासकीय आश्रमशाळा मवेशी (इंग्रजी माध्यम) येथे काही दिवसांपूर्वी येथील शाळेत शिकणार्या वेदिका सचिन शेळके व प्रियांका सचिन शेळके या विद्यार्थिनी गंभीर आजारी असताना देखील तेथील मुख्याध्यापिका निरभवणे यांनी त्यांना आरोग्याची कुठलीही सुविधा न देता पालकांशी खोटं बोलून तुमच्या मुली आजारी नसल्याचे सांगून पालकांना माघारी पाठविले होते. मात्र पुन्हा पालक सचिन शेळके मुलींना घरी घ्यायला गेले असता तुमच्या मुली आजारी नसल्याचे सांगितले. मात्र आपल्या मुली गंभीर आजारी असल्याचे पालकांना निदर्शनास येत होते. त्याच अनुषंगाने पालकांनी मुलींना घरी सोडण्याची मागणी केली असता सदर मुख्याध्यापिकांनी मुलींना शाळेचे दाखले देऊन घरी काढून दिले होते. त्या पालकांनी सुद्धा मनसे कार्यकर्ते ज्ञानेश्वर लेंडे यांची भेट घेऊन तक्रार केली होती. त्यावेळी सुद्धा प्रकल्प अधिकार्यांनी सदर मुख्याध्यापिकेवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दोन्ही मागण्या पूर्ण न झाल्याने मनसेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर सदर विद्यार्थ्यांना मवेशी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत असल्याचे आणि सदर मुख्याध्यापिकेवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाल्याने त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी मनसे कार्यकर्ते ज्ञानेश्वर लेंडे, दत्ता नवले, विष्णू कर्णिक, सिकंदर पोपेरे, जावेद शेख, शिवाजी गायकवाड, हेमंत पदमेरे, शिवराम बांडे, प्रदीप पडवळे, किरण बांबेरे, मीनानाथ मुंढे, जालिंदर आडे, गोटीराम पिचड, गणेश खाडे, तुकाराम पोपेरे आदी कार्यकर्त्यांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसेचा मोर्चा प्रकल्प कार्यालयात आल्यावर आमदार डॉ. लहामटे यांनी प्रकल्प अधिकार्यांना फोन करून तातडीने सामोरे जा असे एकेरी भाषेत बोलताच प्रकल्प अधिकार्यांनी अधिकारी पाठवले आहेत, असे सांगितले. त्यावर आमदार तावातावाने कार्यालयात येऊन दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असल्याचे वृत्त आहे. मात्र काही वेळाने यावर पडदा पडल्याचेही समजते.
