राहुरी शहरातून सुमारे वीस गोवंश जनावरांची सुटका चार हातभट्टी दारुअड्डेही केले उध्वस्त; कारवाईचे नागरिकांतून स्वागत

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील खाटीक गल्ली परिसरात पोलिसांनी छापा टाकत निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या 15 ते 20 गोवंश जनावरांची सुटका केली. त्याचबरोबर या परिसरात असलेले दारुअड्डेही उध्वस्त केले. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मंगळवारी (ता.15) सकाळी गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की, शहरातील खाटीक गल्ली येथील मौलाना आझाद नगरमध्ये एका मोठ्या काट्याच्या झुडुपांमध्ये कत्तल करण्यासाठी असलेली 15 ते 20 गोवंश जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवलेली आहेत. याचबरोबर बाजूला असलेल्या राजवाडा परिसरामध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारुविक्री होत आहे.

त्यानुसार त्यांनी दंगा नियंत्रण पथक व पोलीस कर्मचारी आजिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाय, राजेंद्र डोळस, शिवाजी खरात, संतोष राठोड, दिनकर चव्हाण, नवनाथ भिताडे, सुनील निकम, जालिंदर साखरे, शेषराव कुटे यांना कारवाईसाठी पाचारण केले. सुरुवातीला राजवाडा येथे गावठी हातभट्टी दारु बनविणारे चार अड्डे उध्वस्त केले. त्यावेळी पोलीस आल्याचे कळताच गावठी हातभट्टी दारुविक्री करणारे पसार झाले. तसेच याच परिसरात असलेल्या मौलाना आझादनगर येथे छापा मारला. तेथील पंधरा ते वीस जनावरे व वासरे मिळून आली. ही सर्व जनावरे ताब्यात घेतली. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 29296

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *