भंडारदरा धरणाचा जलसाठा तीन टीएमसीच्या पार! जोर नाही संततधार कायम; लाभक्षेत्रात मात्र पूर्णतः उघडीप

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या दहा-बारा दिवसांपासून सलग हजेरी लावणार्‍या मान्सूनने भंडारदरा धरणाचा जलसाठा तीन हजार दशलक्ष घनफूटाच्या पार पोहोचवला आहे. पाणलोटात उशिराने दाखल होवूनही पावसाला अद्याप जोर नसल्याने धरणात होणारी पाण्याची आवक मात्र कासवगतीने सुरू आहे. जुलैचा मध्य जवळ येवूनही अद्यापही पावसाला म्हणावा तसा जोर चढत नसल्याने आदिवासी पाड्यात काहीशी चिंताही निर्माण झाली आहे. मात्र आषाढी एकादशीनंतर पाणलोटातील पावसाला जोर चढेल असा अंदाज वर्तवित जून्या जाणत्यांकडून सबुरीची फुंकरही घातली जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटात अद्यापही मान्सूनला जोर नसल्याने एकटा भंडारदरा वगळता उर्वरीत सर्वच धरणांना नवीन पाण्याची प्रतीक्षा कायम आहे.

यंदा नियोजित वेळआधीच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वेळोवेळी वर्तविला होता. सुरुवातीला त्या अनुषंगाने वातावरणीय स्थितीही त्यासाठी अनुकूल होती. मात्र दरवर्षीप्रमाणे ऐन मान्सूनच्या प्रवासावेळी वादळांच्या लाटा उठल्याने वेळआधी देशात पोहोचू पाहणार्‍या मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले. त्यानंतरही वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने एकीकडे किनारपट्टीला मान्सून झोडपून काढीत असताना दुसरीकडे उर्वरीत महाराष्ट्राला मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम लागून आहे. जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाचे पाणलोट क्षेत्र तर मुसळधार पावसाचा पट्टा म्हणून ओळखली जातात, मात्र या पट्ट्यांनाच अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याने धरणांची अवस्था भर पावसाळ्यातही चिंताजनक आहे.

गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर अंशतः वाढला असला तरीही तो फार नसल्याने भंडारदर्‍यातील नवीन पाण्याची आवकही जेमतेम प्रमाणात सुरु आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कृष्णवंतीच्या खोर्‍यात अद्यापही पावसाचा झंझावात पहायला मिळत नाही. कळसूबाईच्या गिरीशिखरांवरही अधुनमधून कोसळणार्‍या आषाढसरी वगळता पावसाला जोर चढत नसल्याने निळवंडे धरणात अद्याप नवीन पाण्याचा प्रवाह सुरू झालेला नाही. रंधा धबधब्यावर वाकीजवळ असलेल्या 112 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या वाकी लघु पाटबंधारे प्रकल्पातील जलसाठा अद्यापही 59.71 दशलक्ष घनफूटावर असल्याने निळवंडे धरणाला अजूनही काही दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुळा खोर्‍यातील हरिश्चंद्रगडाच्या परिसरातही मान्सून टिकून आहे, मात्र त्यालाही जोर नसल्याने 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा अंबित लघुप्रकल्प ओसंडूनही मुळा नदी अद्याप वाहती झालेली नाही. त्याचा परिणाम कोतुळनजीकच्या पिंपळगाव खांड प्रकल्पात अद्यापही नवीन पाणी दाखल झालेले नाही. 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा प्रकल्प पूर्ण भरल्याशिवाय मुळा धरणात पाणी दाखल होण्याची शक्यता नाही. अंबित ते पिंपळगाव खांड या दरम्यान मुळा नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारे आहेत, मात्र तूर्ततः त्यांच्या फळ्या काढून घेण्यात आल्या असल्याने पिंपळगाव खांडपर्यंतच्या प्रवासात पाण्याला कोणताही अडथळा नाही. मात्र पावसाला जोरच नसल्याने नदीपात्रात उतरणारे ओहोळ मरगळले आहेत.

आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत (कंसात 1 जूनपासूनची आकडेवारी) पाणलोटातील रतनवाडी येथे 74 मिलीमीटर (824 मि.मी), घाटघर 72 मिलीमीटर (790 मि.मी), पांजरे 60 मिलीमीटर (499 मि.मी), भंडारदरा 52 मिलीमीटर (393 मि.मी), वाकी 32 मिलीमीटर (262 मि.मी), निळवंडे 21 मिलीमीटर (295 मि.मी), कोतुळ 08 मिलीमीटर (109 मि.मी), अकोले 04 मिलीमीटर (181 मि.मी), संगमनेर 02 मिलीमीटर (188 मि.मी), श्रीरामपूर 05 मिलीमीटर (154 मि.मी) व राहाता 04 मिलीमीटर (188 मि.मी) इतका पाऊस झाला. तर सकाळी धरणातील पाणीसाठे पुढीलप्रमाणे होते, मुळा 8 हजार 255 दशलक्ष घनफूट (31.75 टक्के), भंडारदरा 3 हजार 7 दशलक्ष घनफूट (27.34 टक्के), निळवंडे 3 हजार 566 दशलक्ष घनफूट (42.86 टक्के) व आढळा 413 दशलक्ष घनफूट (38.96 टक्के). चोवीस तासांत भंडारदरा धरणात 101 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 115417

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *