गुंजाळवाडीमध्ये 7 मे पर्यंत ‘जनता कर्फ्यू’! शहरालगतच्या गावांनीही निर्णय घेण्याची गरज
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून गुंजाळवाडी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. परंतु, कोविडचे मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढले असून, अनेक नागरिक बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच घेतलेल्या बैठकीत 30 एप्रिल ते 7 मे पर्यंत ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय घेतला असल्याचे सरपंच वंदना गुंजाळ यांनी सांगितले.

शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. आत्तापर्यंत 86 रुग्ण आढळले असून, गाव बाधित क्षेत्र म्हणून शासकीय नियमानुसार घोषित करण्यात आले आहे. याबाबत ग्राम सुरक्षा समितीच बैठक घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून 30 एप्रिल ते 7 मे पर्यंत जनता कर्फ्यू घोषित केला आहे. या काळात हद्दीतील हॉस्पिटल्स, मेडिकल, दूध डेरी वगळता सर्व आस्थापनांमध्ये कामकाज बंद राहील. यात मुख्यतः हॉटेल्स, बांधकामे यांच्यासह भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, प्रवासी वाहतूक रिक्षा, सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात फिरणारे नागरिक यांना बंदी असणार आहे. सर्व नागरिकांना दवंडीद्वारे सूचना दिली गेली असल्याचेही सरपंच गुंजाळ यांनी सांगितले.

या कालावधीत ग्राम सुरक्षा समिती बारीक लक्ष ठेऊन, ग्रामपंचायत सदस्य जागरूकतेने प्रत्येक प्रभागात लक्ष ठेवणार असल्याचे उपसरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी सांगितले. तर ग्रामपंचायत कर्मचार्यांनी कालपासूनच जनजागृतीला सुरवात केली असून प्रत्येक नागरी वस्तीमध्ये जाऊन प्रबोधन करत आहे, असे ग्रामविकास अधिकारी कोल्हे यांनी सांगितले. या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा पोलीस पाटील गणेश म्हस्के यांनी दिला आहे.

संगमनेर शहरालगतचे घुलेवाडी, गुंजाळवाडी, राजापूर, समनापूर गावांचे सध्या झपाट्याने शहरीकरण होत आहे. या गावांमध्येही कोरोनाचे संक्रमण होत असून, गुंजाळवाडीप्रमाणे इतर गावांनीही जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्याची गरज आहे. यातून साखळी तोडण्यासही मोठी मदत होईल.
