श्रीरामपूरमध्ये भाजपला मोटारसायकल रॅली भोवली 433 जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शिवजयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने मोटारसायकल रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीत सहभागी होणार्या युवकांकडून दिल्या जाणार्‍या जयघोषाने संपूर्ण श्रीरामपूर शहर दणाणून गेले होते. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून मोटारसायकल रॅली काढली म्हणून शहर पोलीस ठाण्यात 433 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ संगमनेर रस्त्यावरील शिवराणा क्रिकेट मैदानापासून भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. भाजप संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, सुदर्शन नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष देवीदास चव्हाण, नगरसेवक किरण लुणिया, संजय पांडे, भाजपचे ज्येेष्ठ नेते शशीकांत कडूसकर, राजेंद्र चव्हाण, बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे, गणेश मुदगुले, अभिजीत कुलकर्णी, अर्जुन दाभाडे आदी उपस्थित होते.

या रॅलीतील सर्व मोटारसायकलींना भगवे झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी शहर दुमदुमून टाकले होते. या रॅलीत सुमारे तीन हजार मोटरसायकलस्वार व हजारो युवक सहभागी झाले होते. भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे पूर्णवेळ या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीनंतर अनासपुरे यांनी प्रकाश चित्ते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दरम्यान शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून मोटारसायकल रॅली काढली म्हणून शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई लगड यांच्या फिर्यादीवरून राहुल धुमाळ, सागर धुमाळ, बबन जाधव, अर्जुन दाभाडे, महेश विश्वकर्मा, अर्जुन करपे, सॅन्टी उर्फ संदीप पवार व इतर अंदाजे 433 लोक यांच्याविरुद्ध भादंवि कलम 341, 188 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 3 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. आलम पटेल करीत आहेत.

Visits: 14 Today: 1 Total: 115778

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *