संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासण्याचा प्रकार! ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची संतापजनक विटंबना; मुलाच्या मृतदेहा समोरच बापाशी अरेरावी..


श्याम तिवारी, संगमनेर
संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार म्हणजे ‘पांढरा हत्ती’ आणि रुग्णांसाठी ‘कसाईखाना’ ठरत असल्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. एका बाजूला पोटचा गोळा गमावल्याचे अतीव दुःख आणि दुसर्‍या बाजूला शासकीय व्यवस्थेची निर्दयी मुजोरी, अशा कात्रीत सापडलेल्या पित्याला आपल्या मुलाच्या मृतदेहासाठी तब्बल 24 तास शासकीय रुग्णालयात झुंजावे लागले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत थोरात यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत मृतदेहाचे विच्छेदन करण्यास स्पष्ट नकार दिलाच, शिवाय एकूलता एक तरुण मुलगा गमावलेल्या दुर्देवी बापाशी ‘अरेरावी’ची भाषा करीत त्यांना चक्क हुसकावून लावले. वैद्यकीय व्यवसायालाच काळिमा फासणार्‍या या नीच कृत्याने प्रचंड व्यथीत झालेल्या त्या पित्याला अखेर तब्बल चोवीस तासानंतर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात आपल्या मुलाचे विच्छेदन करुन त्याचे पार्थिव त्याच्या मूळगावी कर्नाटकातील उडपी येथे न्यावे लागले. या संतापजनक घटनेने संगमनेरात प्रचंड रोष निर्माण झाला असून डॉक्टरांच्या वेशातील त्या दानवावर मृतदेहाची विटंबना केल्यावरुन फौजदारी दाखल करण्यासह त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी होत आहे.


या धक्कादायक प्रकाराबाबत ‘त्या’ दुर्दैवी पित्याने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार त्यांचा तरणाबांड एकूलता एक मुलगा सिद्धार्थ नितीनकुमार (वय 27, रा.उडपी, कर्नाटक, ह.मु.हॉटेल ग्रीनपार्क, मंगळापूर) याचे त्याच्या राहत्या घरातच झोपेत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सदरचा प्रकार शुक्रवारी (ता.8) दुपारी एकच्या सुमारास लक्षात आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. त्यामुळे त्याचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारातील शवागारात हलवण्यात आला.


सायंकाळनंतर शवविच्छेदन टाळले जात असल्याने शुक्रवारी ऑनड्युटी असलेल्या डॉक्टरांनी दुपारी दीडच्या सुमारास दाखल झालेल्या मृतदेहाचे विच्छेदन करणं त्यांचे कर्तव्यच होते. मात्र शुक्रवारी दिवसभर ग्रामीण रुग्णालयातील एकाही वैद्यकीय अधिकार्‍याने किंवा कर्मचार्‍याने त्याकडे बघितले नाही. दुसर्‍या दिवशी शनिवारी (ता.9) मयत तरुणाचे वडिल नितीनकुमार आपल्या काही नातेवाईकांसह रुग्णालयात आले व त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉ.प्रशांत थोरात यांना भेटून आमची कोणाही विरुद्ध तक्रार नसल्याचे सांगून नियमानुसार शवविच्छेदन करण्याची विनंती केली. मात्र, ‘डॉक्टरी’ वेशातील या दानवाने त्यांची विनंती धुडकावून उलट कोणतेही कायदेशीर किंवा तांत्रिक कारण नसताना ‘मी पोस्टमार्टम करणार नाही..’ असे स्पष्टपणे सांगत नकार दिला. आपला एकूलता एक कर्ता मुलगा गमावल्याच्या दुःखात बुडालेल्या त्या दुर्दैवी बापासाठी हा प्रसंग प्रचंड आघात करणारा होता. मात्र त्यानंतरही त्यांनी वारंवार विनवण्या करुनही निष्ठूर झालेल्या डॉ.थोरात यांनी ग्रामीण रुग्णालय म्हणजे त्यांच्या बापाची मालमत्ता असल्यागत त्या दुर्दैवी पित्याला अतिशय अपमानास्पद वागणूक देत त्यांना अक्षरशः रुग्णालयातून हाकलून दिले.


एका तरुणाचा मृतदेह 24 तास ग्रामीण रुग्णालयात पडून राहतो, मात्र तिथल्या प्रशासनाला त्याचे काहीही सोयरसुतक नसते, ही गोष्ट संगमनेरच्या संस्कृतीसाठी अतिशय लांच्छनास्पद आहे. मयत तरुणाचा मृत्यू होवून 30 ते 35 तासांपेक्षा अधिक काळ होवूनही त्याचे विच्छेदन न झाल्याने उन्हाच्या प्रभावाने मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. आपल्या पोटच्या मुलाच्या मृतदेहाची ही विटंबना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ त्या दुर्दैवी बापावर आली. शेवटी, विनवण्या करुन, अपमान सहन करुन थकून गेलेल्या त्या पित्याने तब्बल 24 तासांनी आपल्या लेकाचे पार्थिव घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारातून लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेले व मृत्यू झाल्यानंतर तब्बल 40 तासांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन त्याचा मृतदेह त्याच्या मूळगावी कर्नाटकातील उडपी येथे अंत्यसंस्कारासाठी रवाना झाला.


गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ.प्रशांत थोरात यांच्याबद्दल ही घटना म्हणजे केवळ एकमेव तक्रार नाही, तर हे महाशय शासकीय कर्तव्यावर असतानाही चक्क खाजगी रुग्णालयात काम करीत असल्याच्या आणि गोरगरिब रुग्णांना शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध असतानाही खाजगी तपासणी शााळा (लॅब) व खासगी रुग्णालयात जाण्यास भाग पाडून दलालीही खात असल्याच्या असंख्य गंभीर तक्रारी आहेत. सर्वसामान्यांच्या करातून मिळणारा गलेलठ्ठ पगार घ्यायचा आणि सर्वसामान्य जनतेची मात्र प्रतारणा करायची, हा डॉ.थोरात यांचा जणू शिरस्ताच बनला आहे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी गरिबांच्या जिवाशी आणि भावनांशी खेळणार्‍या अशा वैद्यकीय अधिकार्‍याला गोरगरीबांना उपचार देणार्‍या केंद्रात थारा मिळता कामा नये अशी संतप्त भावना त्यांच्या या कृत्यातून निर्माण झाली आहे.


वैद्यकीय क्षेत्रात मृतदेहाचा सन्मान राखणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असते. मात्र, या प्रकरणात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील अतिशय मुजोर असलेल्या डॉ.थोरात यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई करुन मृतदेहाची घोर विटंबना केली आहे. भारतीय न्याय संहिता आणि वैद्यकीय आचारसंहितेच्या तरतुदीनुसार, मृतदेहाची विटंबना करणे आणि कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करुन रुग्णाच्या नातेवाईकांचा मानसिक छळ करणे हा फौजदारी गुन्हा ठरतो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित डॉक्टरांचे लायसन्स रद्द करण्यासोबतच त्यांच्यावर ‘सदोष मनुष्यवध’ सदृश वागणुकीसाठी गुन्हे दाखल करण्याची तरतूदही आहे. डॉ. थोरात यांनी केलेले कृत्य एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी नाही.


संगमनेर ग्रामीण रुग्णालय यापूर्वीही भ्रष्टाचार, अनागोंदी आणि खाजगीकरणाच्या आरोपांनी सतत चर्चेत राहिले आहे. मात्र, आता थेट मृतदेहाची हेळसांड होण्यापर्यंत मजल गेल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांनी केवळ कागदी घोडे न नाचवता डॉ.प्रशांत थोरात सारख्या ‘दानवी’ वृत्तीच्या डॉक्टरांना तात्काळ सेवामुक्त करुन त्यांचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र कायमस्वरुपी रद्द करण्याची शिफारस करण्याची गरज आहे.


निगरगट्ट प्रशासनाचा ‘पोस्टमॉर्टम’ अहवाल!
संगमनेर ग्रामीण रुग्णालयात घडलेला हा प्रकार म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक अध:पतनाचा कळस आहे. पोटचा तरुण मुलगा गमावलेल्या बापाला माणुसकीची साथ मिळण्याऐवजी डॉक्टरांची ‘मुजोरी’ सहन करावी लागणे, हे या व्यवस्थेचे अपयश आहे. डॉ.प्रशांत थोरात यांनी दिलेली ही वागणूक केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून, संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. अशा मुजोर डॉक्टरांना केवळ बदलीची शिक्षा पुरेशी नाही, तर त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र कायमस्वरुपी रद्द करुन त्यांच्यावर फौजदारी खटला चालवणे, हीच खर्‍या अर्थाने त्या मयत युवकाला न्यायाची श्रद्धांजली ठरेल.


या घटनेत मयत झालेला सिद्धार्थ नितीनकुमार (वय 27) हा मूळचा कर्नाटकातील उडपी येथे राहणारा तरुण आहे. हॉटेल व्यवसायात असल्याने त्याने अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात ‘हॉटेल ग्रीनपार्क’ सुरु केले होते. अलिकडच्या काळात सुरु झालेल्या त्याच्या या व्यवसायात त्याने चांगला जमही बसवला होता. मात्र गेल्या शुक्रवारी (ता.8) रात्री हॉटेल बंद करुन नजीकच्याच आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेलेला हा तरुणाबांड तरुण शनिवारी (ता.9) दुपारी मृतावस्थेत आढळून आला. अर्थात त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे शवविच्छेदनातूनही स्पष्ट झाले आहे. मात्र तत्पूर्वी ग्रामीण रुग्णालयातील अव्यस्थेच्या कारणाने त्याच्या मृतदेहाला आणि दुर्दैवी पित्याला भोगाव्या लागलेल्या यातना अतिशय संतापजनक असून या प्रकरणात पालकमंत्र्यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांचा आधार असलेल्या घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश द्यावेत व ग्रामीण रुग्णालयात पसरलेली प्रचंड अनागोंदी आणि मनमानी कारभार दुरुस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Visits: 6 Today: 6 Total: 1796842

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *