राहुरीतील वकील दाम्पत्याचा अपहरण करुन खून! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना केले गजाआड


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. आता या वकील दाम्पत्याचे मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील एका विहिरीमध्ये आढळून आले. त्यामुळे या दुहेरी हत्याकांडाने आता अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वकील राजाराम जयवंत आढाव आणि मनीषा राजाराम आढाव असे हत्या झालेल्या वकील दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघे मानोरी येथील रहिवासी असून दोघेही राहुरी येथील न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करत होते. गुरुवारी (ता.२५) दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयामध्ये होते. दोन वाजेच्या सुमारास ते अहमदनगर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून पत्नी मनीषा यांना आणण्यास पाठवले होते अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान त्यानंतर हे दाम्पत्य बेपत्ता झाले होते. प्रजासत्ताक दिनी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वकील राजाराम आढाव यांची चारचाकी गाडी ही राहुरी शहरातील न्यायालय परिसरामध्ये आढळून आली होती. पोलीस पथक गाडीच्या जवळ पोहोचले, त्यावेळी तिथे आढाव यांच्या गाडीच्या जवळ दुसरी एक कार गाडी उभी होती. मात्र पोलिसांची गाडी आलेली पाहताच ती गाडी वेगामध्ये निघून गेली.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेत तपासणी केली. त्यामध्ये एक हातमोजा, दोर आणि एक बूट आढळून आला होता. आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँकेसमोर बेवारस आढळून आले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आढाव दाम्पत्याचा शोध सुरु केला. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सदर वेगाने निघून गेलेल्या कार गाडीचा शोध घेतला. त्याआधारे किरण आणि आणखी एक असे दोघांना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींकडे पोलिसांनी विचारपूस केली. त्यांनी सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली. गुरुवारी आढाव दाम्पत्याचे अपहरण करून त्यांना मानोरी येथील घरी घेऊन गेले. रात्री त्यांचा खून करून त्यांचे मृतदेह दगड बांधून स्मशानभूमी जवळील विहिरीत टाकून दिले अशी माहिती या दोन्ही आरोपींनी दिली. मात्र, नेमका त्यांचा कोणत्या कारणासाठी खून केला आणि का केला या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे.

Visits: 26 Today: 1 Total: 119049

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *