‘बंगाली राजकारणाचे बदललेले संदर्भ आणि संघर्षाची फलश्रुती’ – श्याम तिवारी, कार्यकारी संपादक, दैनिक नायक..


पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात 2026 चा निवडणूक निकाल हा केवळ एका सत्तांतराचा किंवा राजकीय विजयाचा आकडा नाही, तर तो तिथल्या मातीतील संघर्षाचा एक नवीन अध्याय आहे. कोलकाता येथील ज्या ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’ने आजवर अनेक ऐतिहासिक सभा आणि क्रांतीचे वारे अनुभवले, त्याच ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पण हा सोहळा केवळ सत्तेच्या हस्तांतरणापूरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे असलेल्या तीव्र संघर्षाची जाणीव करुन देणारा ठरला.


संघर्षाचा कोलाज आणि बलिदानाची स्मृती :
या ऐतिहासिक क्षणी कार्यक्रमस्थळावरील प्रवेशद्वारात एक मोठा फलक लावण्यात आला होता, ज्यावर 321 नावांची यादी होती. हे ते कार्यकर्ते होते ज्यांनी गेल्या 15 वर्षांत राजकीय संघर्षात आपले प्राण गमावले. सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यावरही आपल्या मूळ आधारस्तंभांना, म्हणजेच ‘त्या’ तळागाळातील कार्यकर्त्यांना न विसरणे, हे राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा पक्ष आपल्या विजयाचे श्रेय अशा बलिदानाला देतो, तेव्हा तो केवळ ‘पार्टी विथ डिफरन्स’ असल्याचे सिद्ध करत नाही, तर आपल्या कार्यकर्त्यांशी असलेले भावनिक नातेही अधोरेखित करतो.


नव्या नेतृत्वाचा उदय आणि ’सबका साथ’चा नवा अर्थ :
शुभेंदू अधिकारी यांचा मुख्यमंत्री म्हणून झालेला उदय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगाली जनतेला घातलेला दंडवत, हे एका बदललेल्या राजकीय संस्कृतीचे प्रतीक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या राष्ट्रीय नार्‍याला जोडूनच ‘जो हमारे साथ, हम उसके साथ’ ही नवीन भूमिका मांडली जाणे, हे आगामी काळातील प्रशासकीय आणि राजकीय रणनीतीचे संकेत देणारे आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या गळ्यातील भगवे उपरणे घालून शुभेंदू अधिकारी यांचे केलेले अभिनंदन केवळ दोन नेत्यांमधील संवाद नव्हता, तर तो दोन राज्यांमधील राजकीय विचारधारेच्या समन्वयाचा क्षण होता.


जनरोषाचे प्रतिबिंब :
पत्रकारितेच्या भूमिकेतून पाहिल्यास, पश्चिम बंगालमधील हा विजय केवळ निवडणुकीच्या गणितावर आधारलेला नाही. अनेक दशकांपासून साचलेला जनरोष आणि बदलाची तीव्र इच्छा यांचे ते प्रतिबिंब आहे. शून्यापासून सुरु झालेला भाजपचा हा प्रवास जेव्हा दोन तृतीयांश बहुमतापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्यामागे केवळ नियोजन नसते, तर लोकांचा विश्वासही असतो. मतदार पुनर्रिक्षणातून वगळलेली लाखों बनावट नावे, ‘आय-पॅक’ वरील छाप्यातून हाती लागलेले टीएमसीचे निवडणुकीचे तंत्र, प्रत्यक्ष निवडणुकीत महिला सुरक्षेसह राष्ट्रीय सुरक्षेला दिलेले महत्व, भ्रष्टाचार, घुसखोरी या सारखे प्रभावी मुद्दे या निवडणुकीतील जमेच्या बाजू ठरल्या. निकालाने बंगालच्या राजकारणाला पारदर्शकतेच्या दिशेने नेण्यास मदत केली आहे, असे म्हणायला वाव आहे.


पश्चिम बंगालमधील हे सत्तांतर केवळ एका राज्यापुरते मर्यादित नाही. भविष्यातील राष्ट्रीय राजकारणाला दिशा देण्याचे माध्यम ठरणार आहे. या शपथविधी सोहळ्यात दिसलेली कृतज्ञता आणि संघर्षाची जाणीव, यातून स्पष्ट होते की, सत्ता हे साध्य नसून ते बदलाचे एक साधन आहे. बंगालची ही ‘परिवर्तनाची लाट’ देशाच्या इतर भागांत कशी प्रतिबिंबित होते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
– श्याम तिवारी
कार्यकारी संपादक, दैनिक नायक
(98817 27111)

Visits: 10 Today: 10 Total: 1796886

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *