‘दत्तधाम’ आणि ‘शिवधाम’च्या ‘भोंदू युती’चा पर्दाफाश! कॅन्सरच्या नावाखाली मृत्यूचा व्यापार; सिन्नरच्या कारखान्यातूनच औषध पुरवठा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ‘दत्तधाम सरकार’ या केंद्रात सुरु असलेल्या भोंदूगिरीचा विस्तार आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडून शेजारील सिन्नर तालुक्यात पोहोचला आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर मंत्रोच्चाराने उपचाराचा दावा करणार्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या ‘साम्राज्याला’ औषधांची रसद पुरवणारा खरा सूत्रधार डॉ.मोहन पुरी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील डॉ. पुरी याच्या ‘शिवधाम सरकार’ या औषध निर्मिती कारखान्यावर छापा टाकला असता, दत्तधाम आणि शिवधाममधील औषधांच्या साठ्यात कमालीचे साम्य आढळून आले आहे. या कारवाईने भोंदूगिरीच्या या संघटित जाळ्याचा पर्दाफाश झाला असून, तांत्रिकदृष्ट्या हे प्रकरण आता गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे.

वडगावपानमधील दत्तधाम आश्रमातून पोलिसांनी सुरुवातीला 99 प्रकारची संशयास्पद औषधे जप्त केली होती. या औषधांच्या स्त्रोताचा शोध घेत असताना तपासाची चक्रे जायगावच्या ‘शिवधाम’ कारखान्यापर्यंत फिरली. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तिथेही मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा आणि निर्मिती सुरु असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ज्या औषधांच्या बाटल्या आणि गोळ्या दत्तधाममध्ये रुग्णांना दिल्या जात होत्या, अगदी तशाच स्वरूपाची औषधे शिवधाममध्येही सापडली आहेत. पोलिसांच्या कारवाईवेळी कारखाना सुरु असल्याने केलेल्या चौकशीत व्यवस्थापकाने औषध निर्मितीचा परवाना आणि डॉ. पुरीच्या पदव्या सादर केल्या असल्या, तरी या औषधांचा वापर रुग्णांना फसवण्यासाठी आणि त्यांच्या जिवाशी खेळण्यासाठी केला जात होता, हे स्पष्ट होत आहे. या औषधांचे नमुने आता फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर या भोंदूगिरीतील तांत्रिक आणि वैद्यकीय गुन्हेगारीचे स्वरुप अधिक स्पष्ट होणार आहे.

भोंदू राजेंद्र गडगे याला न्यायालयात हजर करुन तपासात नवीन धागेदोरे आल्याचा दावा करीत पोलिसांनी त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली. त्याला बचाव पक्षाकडून जोरदार विरोधही झाला, मात्र दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. दुसरीकडे, या प्रकरणातील सहआरोपी मधुकर शिंदे याची मात्र न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्याच्या नियमित जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ मानला जाणारा डॉ.मोहन पुरी हा अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटूनही पोलीस या मुख्य सूत्रधाराचा आणि त्याच्या सहकार्यांचा माग काढू शकलेले नाहीत. आजच्या हायटेक युगातही आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत असल्याने, यामागे एखाद्या प्रभावशाली व्यक्तींचा दबाव तर नाही, अशाही शंका उपस्थित होत आहेत.

डॉ.मोहन पुरी याने आपल्या आयुर्वेदाच्या पदव्यांचा वापर समाजसेवेऐवजी भोंदूगिरीसाठी केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. औषध निर्मितीचा कारखाना अधिकृत असला, तरी त्या औषधांच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक केली गेली, तो कायद्याने गंभीर गुन्हा आहे. कर्करोग बरा करण्याचा कोणताही शास्त्रीय आधार नसताना, मंत्र आणि अघोरी मार्गाने उपचार करत असल्याचे भासवून ही टोळी हतबल रुग्णांना लुटत होती. शिवधाममधून तयार झालेली औषधे दत्तधाममध्ये जाऊन तिथे ‘प्रसादाच्या’ स्वरुपात किंवा ‘सिद्ध औषधी’ म्हणून हजारों रुपयांना विकली जात होती. हा सर्व प्रकार म्हणजे एका सुनियोजित कटाचा भाग असून, त्याचे जाळे संपूर्ण राज्यभर पसरले असण्याची दाट शक्यता आहे.

अशाच प्रकारची घटना सोमवारी (ता.27) बेलापूर येथेही उघडकीस आली, तेथील गणेश शिंदे नावाच्या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धार्मिक प्रतीकांचा आधार घेऊन लोकांच्या श्रद्धेशी खेळण्याचे सत्र अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कर्करोग, वंध्यत्व किंवा कौटुंबिक कलह यांसारख्या मानवी दुःखांचा फायदा घेणारे असे भोंदू समाजासाठी कर्करोगापेक्षाही अधिक घातक आहेत. प्रशासकीय यंत्रणांच्या अशा केंद्रांकडे दुर्लक्षामुळेच त्यांचे मनोबल उंचावते. जोपर्यंत डॉ.मोहन पुरी, सूरज शिंदे आणि गडगेची मुलगी ज्ञानेश्वरी गजाआड होत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणाचा तपास तडीस जाणार नाही.

धार्मिक प्रतिकांचा गैरवापर आणि भोंदूगिरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि रुग्णालयातच उपचार घ्यावेत. मंत्र-तंत्र किंवा अघोरी प्रयोगांनी कोणतीही शारीरिक व्याधी बरी होत नाही. औषध देणार्या व्यक्तीची वैद्यकीय अर्हता आणि नोंदणीकृत डॉक्टर असल्याची खात्री करणं आवश्यक आहे. एखाद्याने केवळ ‘डॉक्टर’ ही पदवी लावली म्हणजे ती व्यक्ती अधिकृत असतेच असे नाही. धर्मावर श्रद्धा असणे गैर नाही, पण जेव्हा एखादी व्यक्ती धर्माचा आधार घेऊन पैशांची मागणी करते किंवा विज्ञानाला आव्हान देते, तेव्हा सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

