कोल्हारमध्ये तीन गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूस हस्तगत पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड


नायक वृत्तसेवा, राहाता
कोल्हार बुद्रुक येथे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आलेले 3 गावठी कट्टे व 3 जिवंत काडतुसांसह पाच जणांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 5 दिवसांपूर्वी कोल्हारमध्ये 3 गावठी कट्टे आणि 6 जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या एकाच आठवड्याच्या आतमध्ये येथे आणखी 3 गावठी कट्टे हस्तगत करण्यात आल्याने कोल्हार परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक केलेल्यांमध्ये दोन कोल्हार, दोन श्रीरामपूर व एक शिबलापूर येथील इसमांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे व हत्यारांबाबत माहिती घेत असतांना कोल्हार बुद्रुक येथे काही इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त खबर्‍याकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक नेमून कारवाई करण्याची सूचना दिली.

गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक फौजदार मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना. शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, पोकॉ. रणजीत जाधव, चापोहेकॉ. संभाजी कोतकर व भरत बुधवंत यांच्या पथकाने शुक्रवारी (ता.9) दुपारच्या सुमारास कोल्हार येथील गौतमनगर भागात चिंचेच्या झाडाजवळ सापळा रचला. 4 ते 5 संशयित इसम आढळून आले. संशयितांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना ते पळून जाऊ लागले. पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

दुर्गेश बापू शिंदे (वय 35, रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर), हारून उर्फ राजू रशीद शेख (वय 31, रा. अहिल्यादेवीनगर, श्रीरामपूर), अश्पाक उर्फ मुन्ना रफीक पटेल (वय 21, रा. बेलापूर रोड, कोल्हार बुद्रुक), प्रसन्न विलास लोखंडे (वय 32, रा. गौतमनगर, कोल्हार बुद्रुक), सदानंद राजेंद्र मनतोडे (वय 27, रा. शिबलापूर, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या अंगझडतीमध्ये तीन गावठी बनावटीचे कट्टे व तीन जिवंत काडतुसे मिळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. अधिक सखोल तपास केला असता गावठी कट्टे व काडतूस हे विक्रीकरिता आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून एकूण 91 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांत गुरनं. 620/2022 आर्म अ‍ॅक्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक केलेल्यांपैकी दुर्गेश शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर, पुणे, नाशिक, जालना, सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत व आर्म अ‍ॅक्टप्रमाणे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. जालना जिल्ह्यातील आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात तो फरार आहे. प्रसन्न लोखंडे याच्याविरुद्ध राहुरी व लोणी पोलिसांत खून व आर्म अ‍ॅक्टप्रमाणे एकूण 2 गुन्हे दाखल आहेत.

Visits: 11 Today: 1 Total: 104864

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *