नद्यांचे पाणी ओसरु लागताच पात्रांवर तस्करांच्या धाडी! मिळेल ‘त्या’ साधनातून वाळूची लुट; बैलगाड्या, रिक्षांसह आता गाढवंही रस्त्यावर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याला लागलेली वाळू तस्करीची किड काही केल्या जात नसून दिवसांगणिक त्यात वाढच होत आहे. त्याचा परिणाम तालुक्याच्या सामाजिक शांततेवर होवून गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत असल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. मात्र थेट मुख्यालयापासून सज्जापर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेला या उद्योगातून कमी-अधिक लाभ मिळत असल्याने हजारों वर्षांच्या प्रवाहातून निर्माण झालेल्या वाळूसारख्या गौणखनिजावर दिवसरात्र दरोडे घालणार्‍या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यातून काल-परवापर्यंत खळाळत वाहणार्‍या नद्यांचे पूर ओसरु लागताच नव्याने वाहून आलेल्या आणि उलटापालट होवून वरती आलेल्या वाळूवर तस्करांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यासाठी ट्रॅक्टर, जीप, बैलगाड्या, भंगारातील रिक्षा अशा विविध साधनांसह नदीपात्रांवर दरोडे पडू लागले आहेत. त्यात आता म्हाळुंगीच्या पात्रातील तस्करीसाठी गाढवांचाही वापर सुरु झाला असून रात्रभर उपसा झाल्यानंतर दिवस उजेडताच अवघ्या दोन-चार तासांतच गाढवांच्या पाठीवरुन ऐच्छिक ठिकाणी वाळूचा पुरवठा करणार्‍या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.


विशिष्ट भौगोलिक रचना लाभलेल्या संगमनेर तालुक्यातील पर्जन्यमान जेमतेम असले तरीही मुळा, प्रवरा, म्हाळुंगी, आढळा आणि कस या पाच नद्यांनी तालुक्यात समृद्धी नांदवली आहे. प्राचीन ग्रंथात या नद्यांना जीवनदायीनी म्हणूनही संबोधले गेले आहे. अगस्ती, धौम्य यासारख्या ऋषिंच्या यज्ञकर्मातून आणि वास्तव्यातून पावन झालेल्या या परिसराला रामायणकाळात प्रभू श्रीरामचंद्र आणि मध्ययुगात संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, शहाजीराजे, जिजाऊसाहेब आणि युगप्ररुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्शही लाभला आहे. नाशिकच्या सिंहस्थानंतर दक्षिणेकडील नागासाधू एका दिवसाचा मुक्काम करुन संगमनेरच्या अमृतवाहीनी प्रवरेत स्नानाशिवाय मार्गस्थ होत नाहीत, इतके या नद्यांना महत्व आहे. मात्र गेल्या दोन-अडीच दशकांत विकासाच्या नावाखाली या नद्यांचे पात्र अक्षरशः ओरबाडून काढले गेले असून त्यांची अवस्था वाळवंटासारखी झाली आहे.


संगमनेर तालुक्यातून वाहणार्‍या सर्वच नद्यांचा ऊगम अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर असल्याने मुसळधार पावसातून प्रवाहीत होणार्‍या असंख्य प्रपातांसोबत दगडही घरंगळत, आपटत, फूटत वाहत या प्रवाहात येवून मिसळतात. हजारों वर्षांच्या या अखंडीत प्रक्रियेतून नद्यांच्या पात्रात वाळूचे थर निर्माण होत गेले. सिमेंटचा शोध लागण्यापूर्वी वाळूला फारसे महत्व नसल्याने पात्रात वाहून येणार्‍या या वाळूचे असंख्य थर एकमेकांवर साचून नैसर्गिक पद्धतीने जलशुद्धीकरणही होत असतं आणि पाण्याचा निचरा होवून नद्यांच्या लगतचे जलस्रोत पुनर्जिवितही होतं असतं. त्यामुळे दोन दशकांपूर्वी पर्यंत थेट पात्रातून प्यालेले पाणीही शुद्ध आणि गोड लागायचे. पूर्वी जलशुुद्धीकरण केंद्राचा अभाव असल्याने पालिकेकडून शहराला पुरवठा होणार्‍या पाण्यात केवळ जंतूनाशक पावडर मिसळलेली असायची, तरीही त्याकाळी कोणाला पोटाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागल्याची उदाहरणे नाहीत.


मात्र मागील दोन-अडीच दशकांत शहरातील बांधकामं क्षेत्राने उचलखाल्ली. पूर्वीच्या एकत्रित कुटुंब पद्धतीच्या संकल्पनेला छेद देवून एकाच घराची चार भागात विभागणी सर्रास बनली. औद्योगिकरणामुळे नवनवीन तंत्रज्ञान समोर येण्यासह शिक्षणाचे महत्वही वाढले. आधुनिकीकरणातून तांत्रिक रोजगार आणि पैशांची आवक यातून भव्य महल, बंगले, बहुमजली इमारती, रस्ते यासाठी सिमेंटला आवश्यक असलेल्या वाळूचा वापर सुरु झाला आणि कालांतराने तो अमर्याद होवून आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यातील बहुतेक नद्यांचे पात्र अक्षरशः वाळवंटासारखे ओसाड बनल्याचे चित्र बघायला मिळते. मात्र निसर्गाच्या भौगोलिक रचनेच्या कारणाने आजही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आणणार्‍या ओढ्यानाल्यांमधून दगडगोटे घरंगळतात, उंचावरुन खाली पडतात, फूटतात आणि वाहत राहातात, त्यातून कमी-अधिक प्रमाणात वाळूची निर्मितीही घडते.


सोबतच अद्यापपर्यंत भौतिक विकासापासून काहीशा अंतरावर असलेल्या वरच्या भागात बांधकामांना अजूनही मर्यादा असल्याने त्या भागातील नद्यांच्या पात्रात वाळू टिकून आहे. परंतू त्याचवेळी खालच्याभागातील पात्रांमधून मात्र बेसुमार वाळू उपसा झाल्याने नद्यांच्या नैसर्गिक पात्रांची खोलीही प्रचंड वाढली आहे. त्याचा परिणाम दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यासह वरच्या भागातील तयार वाळू आणि त्या प्रक्रियेतून तयार होत असलेले दगडगोटेही पुढेपुढे सरकत असतात. संगमनेर तालुक्याला हा प्रकार नवा नाही, तस्करांसाठी तर अजिबातच नाही. उलट आठ-दहा महिने बापाची मालमत्ता समजून, मुख्यालयापासून सज्जापर्यंतच्या यंत्रणेला किडवून गोळा केलेल्या पैशांचा माज जिरवण्यासाठी पावसाळ्यात नद्या वाहताना मिळणारी अघोषित सुट्टी घालवली जाते.


त्यासाठी दारु व चिकन-मटन सोबत घेवून नद्यांच्या पात्रालगतच पार्ट्या रंगतात आणि त्यातून नद्यांच्या पाणीपातळीवरही लक्ष ठेवले जाते. नद्यांचे काठं संकुचित झाल्याचे त्यांच्या नजरेत भरले की मग याच टोळ्या पुन्हा सक्रिय होतात आणि मिळेल त्या साधनांसह जागोजागीच्या नदीपात्रात उतरतात. या धंद्यातून बक्कळ पैसा मिळत असल्याने गेल्या दशकभरात तालुक्यातील पाचही नद्यांच्या पात्रात फुकटचे वतनदार तयार झाले असून त्यांच्याकडे घातकशस्त्रेही असल्याचे वारंवार समोर आले आहे. मध्यंतरी पठारभागातील एका पत्रकाराला धमकावण्यासाठीही अशाच घातक शस्त्राचा वापर केला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल आहे.


पठारभाग तालुक्याच्या मुख्यालयापासून लांब असल्याने या भागातून वाहणार्‍या मुळा आणि कस नदीच्या पात्रात ट्रॅक्टर आणि डंपरचा वापर असतो. तर, प्रवरानदीपात्रात ट्रॅक्टरसह बैलगाड्या आणि भंगारातील रिक्षांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हाळुंगीच्या पात्रावर मात्र पात्रातच घरं उभारुन वर्षभर आश्रय घेणारी भटकी जमातच दरोडे घालीत असून त्यांच्या वतनात शहरातील अन्य कोणत्याही तस्कराची शिरण्याची हिम्मत नाही इतकी या टोळ्यांची दहशत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी प्रचंड वाळू उपशामुळे या नदीच्या पात्रात वाळूचा लवलेशही शिल्लक राहीलेला नाही. मात्र नुकत्याच आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीपात्रात नव्याने वाळू दाखल झाल्याने वर्षभर याच नदीच्या पात्रात सांभाळल्या जाणार्‍या गाढवांच्या पाठीवर त्याचे ओझे रस्तोरस्ती दिसू लागले आहेत. कोठूनतरी आलेली ही अनोळखी जमात राजरोसपणे पात्रावर दरोडे घालीत असताना पोलीस, महसूल व जलसंपदा विभागाला याची कल्पना नाही असे कोणी म्हणेल तर ते वेडेपणाचे ठरेल, मात्र संगमनेरात त्याचा आता पुन्हा एकदा प्रत्यय येवू लागला आहे.


म्हाळुंगी नदीपात्रातून वाळूची तस्करी करण्यासाठी गाढवांचा राजरोसपणे वापर सुरु झाला असून पात्रातच इमले बांधून राहणार्‍या सशस्त्र वाळूतस्करांकडून दिवसरात्र म्हाळुंगीच्या पात्रावर दरोडा घातला जात आहे. खरेतर अनोळखी असलेली ही जमात अज्ञात ठिकाणाहून स्थलांतरीत होवून चक्क नदीपात्रातच विसावली असून या वसाहतीत गुन्हेगारांचा मोठा भरणा आहे. मात्र असे असतानाही जलसंपदा विभागाकडून थेट नदीपात्रात असलेल्या त्यांच्या घरांना संरक्षण प्राप्त असून त्या विरोधात आलेला जिल्हाधिकार्‍यांचा आदेशही बांसनात गुंडाळण्यात आला आहे. त्यावरुन भ्रष्ट यंत्रणांच्या मदतीने संगमनेरात पद्धतशीर गुन्हेगारी वसाहती निर्माण केल्या जात असल्याचे व क्षुल्लक आर्थिक फायद्यासाठी शहराचे दीर्घकालीन सामाजिक नुकसान करण्याचे षडयंत्र पद्धतशीरपणे राबवले जात असल्याचे दुर्दैवी चित्र सध्या बघायला मिळत आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 1925520

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *