कुटे हॉस्पिटलमध्ये खांद्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांचे होतेय अभिनंदन
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
केवळ नासिक-पुणे यांसारख्या मोठ्या शहरात होणारी अतिशय किचकट व अवघड अशी कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी नुकतीच कुटे हॉस्पिटलमध्ये केल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप कुटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. कुटे यांनी सांगितले, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील एक 60 वर्षीय व्यक्ती खांद्यावर पडल्याने त्यांचे खांद्यातील हाडाचे फ्रॅक्चर झाले. परंतु तीन आठवडे कोणताही उपचार न घेता घरीच थांबून राहिले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉ. सौरभ पगडाल यांनी तपासले असता सदर व्यक्तीच्या खांद्यातील हाडाचे अनेक तुकडे झालेले आढळून आले. खांद्याची सुरळीत हालचाल होण्यासाठी खांद्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. रुग्णाशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारच्या खांद्याच्या कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया ह्या अतिशय किचकट व अवघड असतात व त्या केवळ नासिक, पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरातच होत असल्याचे आपण पाहतो आहोत. परंतु ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सौरभ पगडाल कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले असल्याने कुटे हॉस्पिटलमध्ये डॉ. सौरभ पगडाल यांनी खांद्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून आता ही व्यक्ती शेतीसह इतर कामेही पहिल्यासारखी अगदी नियमितपणे करू लागली आहे.

डॉ. सौरभ पगडाल यांनी ऑर्थोस्कोपिक सर्जरी व कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेचे विशेष प्रशिक्षण घेतले असून त्यांनी आत्तापर्यंत या शस्त्रक्रियेबरोबरच 300 हून अधिक खुबा सांधेरोपण (हिप रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया, गुडघे व इतर सांध्यांच्या लिगामेंट टियरच्या (फाटलेल्या दोरी) दुर्बीणीद्वारे अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या आहेत. दरम्यान, या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉ. पगडाल यांचे वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांतून अभिनंदन होत आहे.
