संगमनेरच्या गंगामाई घाटावर तरुण बुडाला! अग्निशमन दलाकडून शोध सुरु; नदीपात्रात तीन हजार क्यूसेकचा प्रवाह..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पंधरवड्यापासून भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. अशा स्थितीत नदीपात्राजवळ जावू नये यासाठी प्रशासनाच्या सक्त सूचना असतानाही पारेगावच्या 25 वर्षीय तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आज सकाळी समोर आले आहे. या घटनेत पाण्याच्या प्रचंड प्रवाहात तो वाहून गेला असून पालिकेच्या अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरु आहे. मात्र पात्रातील पाण्याची पातळी आणि वेग पाहता वृत्त लिहेपर्यंत त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नव्हता. ऋषिकेश नवनाथ गडाख असे प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असावे असा काठावर सापडलेल्या सामानावरुन संशय आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार आज (ता.30) दुपारी साडेबाराच्या सुमारास सदरचा प्रकार संगमनेर नजीकच्या गंगामाई घाटावर घडला. सध्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने एरव्ही गजबजलेल्या या परिसरात जेमतेम गर्दी असते. मात्र साडेबाराच्या सुमारास ऋषिकेश नवनाथ गडाख (वय 25, रा.लिंबाचामळा, पारेगाव) हा तरुण घाटावर आला आणि त्याने कपडे काढून पात्रात उडी घेतली. मात्र पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज नसल्याने तो प्रवाहासोबत वाहून गेला. या घटनेनंतर अज्ञात इसमांनी फोनद्वारे पालिकेच्या सुरक्षा विभागाला याची माहिती दिली.
त्यानुसार सुरक्षापथकाने अग्निशमन दलासह गंगामाई घाटावर धाव घेत स्थानिक पोहणार्यांच्या मदतीने बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीपात्रात सध्या तीन हजारांहून अधिक क्यूसेक पाण्याचा प्रवाह असल्याने अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. विशेष म्हणजे पालिकेचे पथक घाटावर पोहोचले त्यावेळी त्यांना फोन करणार्यांपैकी कोणीही आढळून आले नाही. मात्र घाटावर चपला, कपडे, मोबाईल आणि काही कागदपत्रे आढळली. त्यावरुन वाहून गेलेल्या तरुणाचे नाव ऋषिकेश नवनाथ गडाख असल्याचा अंदाज आहे. त्याच्यासोबत त्याचे मित्रही असण्याची शक्यता असून या प्रकाराने घाबरल्याने त्यांनी फोन करुन तेथून पलायन केले असावे असा संशय आहे. तूर्त बुडीत तरुणाचा शोध सुरु असून ओझरपर्यंतच्या यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.
