‘अ‍ॅसिडफेक’ प्रकरणाला पंधरवडा उलटूनही पोलीस ‘अंधारातच’! तपासाची चाके नेमकी रुतली कुठे?; अहिल्यानगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात इयत्ता सहावीत शिकणार्‍या एका निरागस चिमुरडीवर अ‍ॅसिडफेक झाल्याच्या घटनेला आता पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, तपासाचा गाजावाजा करणार्‍या तालुका पोलीस आणि अहिल्यानगर गुन्हे शाखेला या प्रकरणाचा उलगडा करण्यात अद्याप यश आलेले नाही. राज्याच्या विधिमंडळापासून ते रस्त्यावरील जनआंदोलनापर्यंत या घटनेचे पडसाद उमटले असतानाही, नराधम आरोपी अद्याप मोकाटच असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात पोलीस अद्यापही अंधारातच चाचपडत असल्याने जिल्ह्यात खरोखरीच कायद्याचे राज्य आहे का अशी शंकाही आता निर्माण झाली आहे.


गेल्या 17 मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली होती. वडगावपानच्या डी.के.मोरे विद्यालयातून घराकडे परतणार्‍या एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात विकृताने अ‍ॅसिड फेकले होते. या हल्ल्यात त्या चिमुरडीच्या उजव्या बाजूचा चेहरा गंभीररीत्या होरपळला. अतिशय गरीब आणि साधारण कुटुंबातील या मुलीवर ओढावलेला हा प्रसंग पाहून संपूर्ण तालुका हळहळला. सध्या तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने पुढाकार घेत या मुलीच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलून तिच्या कुटुंबाला आधार दिला असला, तरी आरोपीला जेरबंद करण्यात आलेले अपयश हा पोलीस प्रशासनावरील मोठा डाग ठरत आहे.


या प्रकरणाची धग घटनेच्या दिवशीच मुंबईतील विधिमंडळापर्यंतही पोहोचली होती. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन या घटनेकडे सरकारचे लक्ष वेधले होते, तर आमदार सत्यजीत तांबे यांनी वरिष्ठ सभागृहात अ‍ॅसिडच्या सहज उपलब्धतेवर प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी कठोर कारवाईचे आश्वासनही दिले होते. मात्र, मंत्र्यांचे आदेश आणि आमदारांचा पाठपुरावा याला स्थानिक पोलिसांनी एकप्रकारे केराची टोपलीच दाखवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेटी देऊनही तपासाची गाडी अजूनही इंचभर पुढे सरकलेली नाही.


या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक पोलिसांची तब्बल 10 तपास पथके आणि अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक कामाला लागल्याचा दावा करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन आणि संशयितांची धरपकड अशा तांत्रिक बाबींचा आधार घेऊनही गेल्या पंधरा दिवसांत आरोपीचा मागमूस न लागणे, हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचेही मोठे अपयश मानले जात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेतील आरोपीने पोलिसांना दिलेले हे खुले आव्हान असून, जिल्ह्यातील तपास यंत्रणांची क्षमता आता संपत चालली आहे की काय, अशी शंकाही आता उपस्थित होत आहे. वडगावपान फाट्यावर झालेल्या मोठ्या जनआंदोलनानंतरही पोलिसांवरील दबाव वाढला असला, तरी त्याचा ‘परिणाम’ मात्र आजही शून्यच आहे.


एका अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला करुन एखादा विकृत बिनधास्त फिरु शकतो, ही बाब समाजासाठी अत्यंत घातक आहे. या दिरंगाईमुळे गुन्हेगारांचे धाडस वाढत असून, सामान्य पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाली आहे. एखाद्या प्रकरणात पोलिसांची तब्बल दहा-दहा पथके मिळूनही आरोपीचा शोध घेऊ शकत नसतील, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग काय? असा संतप्त सवालही नागरिक विचारत आहेत.


या प्रकरणात पीडित विद्यार्थीनी व एका साक्षीदाराकडून माहिती मिळवून पोलिसांनी संशयीत आरोपीचे रेखाचित्रही प्रसारीत केले होते. मात्र त्यालाही आता पंधरवडा उलटला असून कोठूनही पोलिसांना तपासाबाबत दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे भरदिवसा घडलेल्या या घटनेचा तपास सुरुवातीपासून स्थानिक पोलिसांसह अहिल्यानगरची गुन्हे शाखाही करीत आहे, मात्र इतका मोठा कालावधी उलटल्यानंतरही या सर्वांना आरोपीची साधी ओळखही पटवता आलेली नाही, त्यावरुन जिल्ह्यातील पोलिसांची तपासाची कार्यक्षमता आता जवळजवळ संपल्यात जमा असल्याचे चित्रही निर्माण झाले आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 1637973

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *