साकूर दरोड्यातील आरोपींवर होणार ‘मोक्का’न्वये कारवाई? अडीच महिन्यांपूर्वीची घटना; आत्तापर्यंत चौघांना अटक मात्र तिघे अद्यापही पसार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या नोव्हेंबरमध्ये साकूरमधील कान्हा ज्वेलर्स या सुवर्णपेढीवर पडलेल्या दरोड्यातील आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे निर्देश नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार घारगाव पोलिसांनी अटकेत असलेल्या चौघांसह एकूण सात जणांविरोधातील गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. साकूरमध्ये घडलेल्या ‘त्या’ घटनेत पाचजणांच्या टोळीने बंदुकीच्या धाकावर भरदिवसा 52 लाख रुपयांचे दागिने लुटून पोबारा केला होता. विशेष म्हणजे या घटनेनंतर काही वेळातच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी थरारक पाठलाग करीत पारनेर तालुक्यातील डोंगरांमध्ये लपून बसलेल्या दोघा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने पकडून त्यांच्या चौकशीतून अन्य दोघांना अटक करीत त्यांच्याकडून सुमारे 15 लाखांचे दागिनेही हस्तगत केले. मात्र या घटनेला आता जवळपास अडीच महिन्यांचा काळ उलटूनही उर्वरीत आरोपी आणि मुद्देमाल हाती लागलेले नाही. त्यातच या प्रकरणात सहभागी असलेल्या नऊ आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये 21 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आल्यानंतर आता या सर्वांवर ‘मोक्का’ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई होणार आहे. कोणत्याही गुन्हेगारावर ‘मोक्का’ लागल्यास त्याची अटक अटळ होते. शिवाय त्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकारही पोलिसांना प्राप्त होतो.


अडीच महिन्यांपूर्वी 11 नोव्हेंबररोजी भरदुपारी दीडच्या सुमारास साकूरमधील कान्हा ज्वेलर्स या सुवर्णपेढीत हा प्रकार घडला होता. दोन मोटारसायकलवरुन आलेल्या पाचजणांनी बंदुकीचा धाक दाखवून सुवर्णकार संकेत सुभाष लोळगे व त्यावेळी दुकानात हजर असलेल्या एका ग्राहकाला निमूटपणे बसण्यास भाग पाडले. त्यातील दोघांनी दुकानातील भिंतीला केलेल्या शोकेसमधून सुमारे अर्धाकिलो वजनाचे आणि 51 लाख 51 हजार 600 रुपये मूल्य असलेले सोन्याचे दागिने आणि गल्ल्यातील 90 हजार रुपयांची रोकड असा एकूण 52 लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला होता. हा प्रकार घडत असताना बाहेरील बाजूला लोकांची गर्दी होवू लागल्याने दरोडेखोरांनी पळून जाताना पाठलाग होवू नये म्हणून आपल्याकडील गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबारही केला होता. भरदुपारी घडलेल्या या घटनेने साकूरसह संपूर्ण संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असतानाच पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी सिनेस्टाईल थरारक पाठलाग केला.


आपण चारही बाजुंनी पोलिसांच्या गराड्यात अडकणार याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी वासुंदे (ता.पारनेर) या गावालगतच्या डोंगराळ भागात मोटार सायकल सोडून पलायन केले. मात्र तो पर्यंत अहिल्यानगरहून स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांसह पारनेर पोलीस आणि साकूरच्या दिशेने संगमनेरच्या पोलीस उपअधिक्षकांसह घारगावच्या पोलीस निरीक्षकांचे पथकही मागावर असल्याने ते फसले. मात्र तो पर्यंत अंधार दाटल्याने पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण रात्र त्या परिसराला सशस्त्र वेढा घालीत 12 नोव्हेंबररोजी भल्या सकाळीच त्यातील दोघांना पकडले. मात्र पहाटेच्या धुक्याचा फायदा घेत त्यातील तिघे पसार झाले. पकडलेल्या दोघांच्या कोठडीतून त्यांच्यासह उर्वरीत सर्व आरोपींचे नाव व गाव स्पष्ट झाल्यानंतर पोलीस पथकांनी त्यांचाही माग काढण्याचा प्रयत्न केला.


त्यातून आणखी दोघे पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांच्याकडून सुमारे 20 तोळे (मूल्य 15 लाख) सोनेही पोलिसांनी हस्तगत केले. साकूर प्रकरणात प्रत्यक्ष दरोडा टाकणार्‍या टोळीत पाचजणांचा समावेश असला तरीही या प्रकरणात पोलिसांनी एकूण नऊ जणांची टोळी उघड केली असून या सर्वांवर एकत्रितपणे केलेले 21 तर अन्य टोळ्या अथवा व्यक्तिगत पातळीवर केलेल्या गुन्ह्यांची जंत्रीच समोर आणली आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या या टोळीने अहिल्यानगरसह या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यांचे कारनामे समोर आल्यानंतर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी साकूर प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या गुन्हेगारांची सखोल माहिती मिळवून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याबाबतचा अहवाल तयार केला जात असल्याची माहिती दैनिक नायकच्या हाती लागली आहे.


त्यानुसार गेल्या 11 नोव्हेंबररोजी साकूरमध्ये घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा प्रमुख अक्षय बाळासाहेब वावरे (वय 24), टोळीचे सदस्य स्वप्निल किशोर येळे (वय 22, दोघेही रा.माळेवाडी, ता.बारामती), सुनील उर्फ नील विजय चव्हाण (वय 28, रा.गणेशपेठ, पुणे), मनोज उर्फ दयावान बाळु उर्फ बाळासाहेब साठे (वय 25, रा.गोरडवाडी, ता.माळशिरस), अजय उर्फ भोर्‍या उर्फ भोल्या बाळु देवकर (वय 22, रा.कौठे यमाई, ता.शिरुर), योगेश अंकुश कडाळे (वय 27, रा.धामणी, ता.आंबेगाव), आकाश सखाराम दंडवते (वय 28, रा.मलठण, ता.शिरुर), धोंडीभाऊ उर्फ धोंड्या महादू जाधव (रा.निघोज, ता.पारनेर), सुरजसिंग उर्फ मन्ना उर्फ अजयसिंग (रा.पंजाब) अशा नऊजणांच्या टोळीवर मोक्का लावण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात गुन्हेगारी कारवाया करणार्‍यांमध्ये दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे.


गेल्या अडीच महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच होती. भरदुपारी गजबजलेल्या साकूरच्या बाजारपेठेत दोन दुचाकीवरुन पाच सशस्त्र दरोडेखोर येतात काय, बंदुकीच्या धाकावर तब्बल अर्धाकिलो सोने आणि 90 हजारांची रोकड असा एकूण 52 लाखांचा मुद्देमाल घेवून पळतात काय आणि त्यानंतर पोलिसांच्या वाहनातून त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग होवून रात्रभर चक्क डोंगरांना वेढा घालून दोघांना अटक होते काय.. सगळंच एखाद्या कथानकानुसार. मात्र आता या कथानकाला गंभीर वळण लागणार असून साकूरमध्ये दरोडा घालणार्‍यांना अटकेपासून वाचण्याचे मार्ग बंद होणार आहेत. शिवाय या कलमांचा समावेश झाल्यानंतर गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा अधिकारही पोलिसांना मिळणार आहे.

Visits: 64 Today: 2 Total: 255252

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *