संगमनेरचा ‘तोतया’ निघाला चक्क मुख्यमंत्र्यांचा सल्लागार! विधीमंडळ सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे; सातजणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सर्वाधिक सुरक्षित आणि अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या विधीमंडळ सभागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेला भ्रष्टाचार आणि तोतयेगिरीचे भीषण भगदाड पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संगमनेरचा तोतया मुख्यमंत्र्यांचा सल्लागार म्हणून थेट राज्यातील सत्तेच्या सर्वोच्च केंद्रात वावरत असल्याचे उघड झाल्याने संपूर्ण प्रशासन हादरुन गेले आहे. ज्या विधीमंडळात लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यंत्रणांचा कडा पहारा असतो, तिथे एका भामट्याने चक्क बनावट ओळखपत्राच्या आणि पदाच्या जोरावर शिरकाव करुन एकप्रकारे विधीमंडळाच्या सुरक्षेचे वाभाडेच काढले आहेत. या प्रकरणी सातजणांवर बनावटीकरणाचा गुन्हा दाखल झाला असून संगमनेरच्या दत्तात्रय गुंजाळ या ‘तोतया’ सल्लागारासह पाचजणांना गजाआड घालण्यात आले आहे.


या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलेला आरोपी दत्तात्रय केशव गुंजाळ (रा.निमगाव भोजापूर, ता. संगमनेर) याने आपला दबदबा निर्माण करण्यासाठी चक्क ‘सल्लागार, मुख्यमंत्री कार्यालय’ असे बनावट पद धारण केले. विशेष म्हणजे, या भामट्याने विधीमंडळ परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस आणि सुरक्षा रक्षकांवर तसेच कर्मचार्‍यांवर आपल्या या ‘बनावट’ पदाचा वापर करुन प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्र्यांचा सल्लागार आहे, असे भासवून त्याने सर्वांचीच दिशाभूल केली. हा केवळ फसवणुकीचा प्रकार नसून, राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि भीतीदायक विषय ठरला आहे.


मुंबईच्या विधानमंडळात उघड झालेल्या या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) नावाने बनावट पत्र तयार करण्यात आले होते. 18 फेब्रुवारी रोजी या पत्राद्वारे तब्बल 30 प्रवेशपासेसची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात एमआयडीसीने अशी कोणतीही मागणी केली नव्हती. तरीही, विधीमंडळातील ‘घरभेदी’ कर्मचार्‍यांनी कोणतीही शिफारस किंवा कागदपत्रांची पडताळणी न करता हे पासेस वितरीत केले. यातील पास क्रमांक 02593 वर दत्तात्रय गुंजाळ याने स्वतःचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालयाचा सल्लागार असा करुन त्यावर प्रशासनाचे शिक्केही उमटवले.


संगमनेरच्या या भामट्याला विधीमंडळ व सचिवालयातील कर्मचार्‍यांनीच मोकळे रान उपलब्ध करुन दिले होते. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी केलेल्या तपासात विधीमंडळाच्या सामान्य प्रशासन विभागातील लिपिक महेश पिराजी दुम्पलवार (फरार) व मनोज आनंदा मोरबाळे, शिपाई लवेश शंकर नाकटे (फरार), स्वप्निल रमेश तायडे, गणपत भाऊ जावळे व नागेश शिवाजी पाटील या कर्मचार्‍यांनी आधारकार्ड किंवा व्यक्तिगत माहितीची नोंद न घेता प्रक्रियेलाच ‘कोलदांडा’ घातला आणि अनेक तोतया अभ्यागतांना पैशांच्या मोबदल्यात राजशिष्टाचार मिळवून दिल्याचे आता समोर येत आहे.


याप्रकरणी विधीमंडळ सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव यांच्या तक्रारीवरुन बृहन्मुंबईच्या मरिनड्राईव्ह पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 319 (तोतयेगिरी), 336 (बनावटीकरण), 337, 339, 340 आणि 204 (लोकसेवकाची बतावणी) यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या दोघांचा शोध सुरु आहे. या प्रकरणाने एकीकडे विधीमंडळाच्या सुरक्षेचा प्रश्‍न चर्चेत आला असताना दुसरीकडे थेट मुख्यमंत्री कार्यालयाचा सल्लागार म्हणून वावरणार्‍या संगमनेरच्या दत्तात्रय गुंजाळ या तोतयाने बनावट पदाचा वापर करुन आणखी काही उद्योग केले आहेत का? याच्याही चर्चा सुरु झाल्या असून या एकूण प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.


संगमनेरच्या दत्तात्रय केशव गुंजाळ (वय 53, रा.निमगाव भोजापूर, ता.संगमनेर) या तोतयाने आपण मुख्यमंत्र्यांचा सल्लागार असल्याचे भासवून केवळ विधीमंडळातच प्रवेश मिळवला की या बनावट पदनामाच्या माध्यमातून शासनाची अथवा इतर अभ्यागतांची आर्थिक फसवणूक केली आहे?, विधीमंडळ आणि सचिवालयातील या साखळीत या लिपिक आणि शिपायांशिवाय आणखी कोणत्या ‘मोठ्या माशांचा’ सहभाग आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पोलीस शोधत आहेत. विधीमंडळ उडवून देण्याची धमकी आली असतानाच हा सुरक्षा घोटाळा समोर आल्याने राज्याच्या गुप्तचर यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Visits: 5 Today: 5 Total: 1632989

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *