महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रबंधकांची भूमिकाच संशयास्पद! बनावट सोने तारण प्रकरण; गोल्ड व्हॅल्युअरसह पाच जणांना अटकपूर्व जामीन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अर्जदारांनी बँकेत तारण ठेवलेले सोने खरेच होते, मात्र बँकेच्या शाखा प्रबंधकांनीच कटकारस्थान रचून ते बनावट असल्याचे भासवले. त्यासाठी सोन्याचे लेखा परीक्षण व पुर्नमूल्यांकन करतानाही शासनमान्य पॅनल डावलण्यात येवून परस्पर त्याचे मूल्य ठरविण्यात आले. यासर्व गोष्टी संशयास्पद असून संस्थेच्या प्रबंधकांनीच घडवून आणल्या आहेत. हा प्रकार म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाल्ले, पण आरोप मात्र पाखरांवर लावले जात आहेत’ अशा जोरदार युक्तिवादाच्या बळावर संगमनेरात गाजलेल्या ‘बनावट सोने तारण कर्ज’ प्रकरणातील गोल्ड व्हॅल्युअरसह पाच आरोपींना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संगमनेरात खळबळ उडवून देणार्‍या या प्रकरणात एकूण 32 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

संगमनेरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत एकूण 31 जणांनी बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर जगदीश शहाणे याच्याशी संगनमत करुन बँकेत बनावट सोने तारण ठेवून ते खरे असल्याचे भासवत बँकेची 68 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता. याप्रकरणी अशाप्रकारचे बनावट सोने तारण ठेवणार्‍या 31 जणांसह सदरील तारण सोने खरे असल्याचे बँकेला सांगणार्‍या जगदीश शहाणे याच्याविरोधात संस्थेचे शाखा प्रबंधक नंदकिशोर म्हस्के यांनी गेल्या 5 फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरुन पोलिसांनी या सगळ्यांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 406, 408, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे सोपविला होता.

दरम्यानच्या काळात दाखल गुन्ह्यातील 32 आरोपींमधील गोल्ड व्हॅल्युअर जगदीश शहाणे याच्यासह नानासाहेब भागवत राऊत (रा.घुलेवाडी), मारुती अण्णासाहेब मंडलिक (रा.रा हीींिं://रा.रा/यतेवाडी फाटा), राहुल शिवाजी गायकवाड (रा.वेताळमळा, संगमनेर) व पुष्पा राजेश पवार (रा.घुलेवाडी) यांनी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात विधीज्ञ शरीफ पठाण यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर झालेल्या युक्तिवादात बचावपक्षाचे वकील शरीफ पठाण यांनी जोरदार युक्तीवाद केला. यावेळी पठाण यांनी आपल्या अशिलांनी बँकेत जमा केलेले सोने खरे असल्याचे सांगत बँकेचे अधिकृत मूल्यमापक (व्हॅल्युअर) जगदीश शहाणे यांनीही त्याची पडताळणी केली होती.

सदरील बँकेत एकूण 137 सोने तारण कर्ज प्रकरणे असून त्यातील 31 प्रकरणांतील सोने बनावट असल्याचा आरोप बँकेचे शाखा प्रबंधक नंदकिशोर म्हस्के यांनी केला खरा, मात्र वास्तवात त्यांनीच कटकारस्थान करुन सदरील प्रकरणातील सोने बनावट असल्याचे भासवल्याचा युक्तीवाद पठाण केला. त्यासाठी सदरील प्रकरण चर्चेत आल्यानंतर शाखा प्रबंधकांनी सरकारमान्य सुवर्ण मूल्यमापकाचे पॅनल डावलून त्रयस्त पॅनलकडून ‘त्या’ गहाण सोन्याचे मूल्यांकन केले. तसेच, नियमानुसार सदरील सोन्याचे मूल्यांकन करताना ज्यांच्यावर बनावट सोने तारण ठेवल्याचा आरोप आहे त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्याची गरज होती. मात्र संस्थेच्या प्रबंधकांनी तसे काही केले नसल्याने त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावाही त्यांनी केला.

यानंतर न्यायाधीश कुलकर्णी यांनीही या प्रकरणातील फिर्यादी व बँकेचे प्रबंधक नंदकिशोर म्हस्के यांना या प्रकरणात निर्माण झालेल्या शंका विचारल्या असता त्यावर त्यांना काहीएक सांगता आले नाही. त्यावरुन न्यायालयाने सदरील संस्थेची सुवर्ण पुर्नमूल्यांकनाची पद्धत संशयास्पद असल्याचे निरीक्षणही नोंदवले. यावेळी विधीज्ञ पठाण यांनी हा प्रकार म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाल्ले, पण आरोप मात्र पाखरांवर लावले जात आहेत’ असा जोरदार युक्तीवाद केला, यावेळी अन्य आरोपींच्या वकिलांनीही त्यांच्या सूरात सूर मिसळले. बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे, बँकेच्या शाखा प्रबंधकांना विचारलेल्या शंकांचे न झालेले निराकरण आणि न्यायालयासमोर मांडण्यात आलेले अन्य प्रकरणातील दाखले मान्य करीत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी वरील पाचही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

जवळपास 69 लाख रुपयांच्या या सोनेतारण फसवणूक प्रकरणात वरील पाच जणांसह सचिता दीपक जाधव (मालदाड रोड), दीपक दत्तात्रय जाधव (महात्मा फुले नगर), रवींद्र रमेश राजगुरु (मालदाड रोड), संदीप नंदू कलांगे (पोफळे मळा), आयुब उस्मान शेख (लखमीपुरा), प्रकाश मारुती तुपसुंदर (घुलेवाडी), स्वप्नील भास्कर पगार (चिंचोली गुरव), संजय बद्रीदास बैरागी (देशमुख नगर), विजय भास्कर अवचिते (पावबाकी रोड), प्रतीक नानासाहेब केरे (निळवंडे), कैलास रामनाथ शिरसाठ (घुलेवाडी), ताराबाई रावजी घुगे (नाशिक-पुणे रोड), वैभव प्रकाश वाकचौरे (घुलेवाडी), प्रसाद संजय वर्पे (वरवंडी), लखन शांताराम कडलग (वडगाव पान), विशाल अनिल उगले (डोंगरगाव), मच्छिंद्र एकनाथ मंडलिक (जनतानगर),

सागर गोरक्ष अवचिते (शिबलापूर), कोमल राजेंद्र जगधने (वाकडी), कृष्णा भाऊसाहेब गाढवे (घुलेवाडी), सुधीर रावसाहेब घुगे (अमृतनगर), प्रदीप विठ्ठल गाडेकर (मालुंजे), जगदीश सुभाष म्हसे (घुलेवाडी), अमृतराज किसन वाघमारे (खराडी), संदीप पंढरीनाथ घुगे (मालुंजे), दत्तू खंडू साळवे (अंभोरे) व गणेश भाऊसाहेब अवचिते (घुलेवाडी) अशा अन्य 27 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आता सुवर्ण मूल्यमापकासह चार आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाल्याने उर्वरीत आरोपींकडूनही अटक टाळण्यासाठी जामीन अर्ज दाखल होण्याची व अशाच पद्धतीने युक्तीवाद होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *