मुख्यमंत्र्यांचा ‘तोतया’ सल्लागार संगमनेरातील शिक्षणसंस्थेशी निगडीत! आघाडीच्या कार्यकाळातच बसवला जम; बाहेरख्याली वृत्तीतून झाला कृत्याचा अखेर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेत नव्हेतर चक्क राज्याच्या सर्वोच्च सभागृहाची फसवणूक करीत थेट मुख्यमंत्र्यांचा सल्लागार बनून काही कर्मचार्‍यांच्या मदतीने भ्रष्टाचाराची पायपूस अंथरणार्‍या प्रकरणाचा गेल्या आठवड्यात भंडाफोड झाला. या कारवाईत मुंबई पोलिसांनी संगमनेरच्या दत्तात्रय केशव गुंजाळ या तोतया सल्लागारासह चक्क विधीमंडळाच्या सेवेत असलेल्या सातजणांची टोळी उघड केली. त्यातील पाचजण सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात येत आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून ठळक होत असलेला निमगाव भोजापूरचा गुंजाळ संगमनेरातील एका नामचीन शिक्षणसंस्थेशी निगडीत असून महाविकास आघाडी सरकारच्या काळातच त्याने संगमनेरच्या राजकीय वलयाचा गैरफायदा घेवून भ्रष्टाचाराचे जाळे विणल्याचे आता समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे अतिशय दातृत्वशील परिवाशी संबंधित असलेल्या या तोतयाच्या बाहेरख्याली वृत्तीनेच त्याला कारागृहाचा रस्ता दाखवल्याचेही आता स्पष्ट झाले असून त्याच्या या षडयंत्राला कोणाचे राजकीय पाठबळ तर नव्हते? या प्रश्‍नाची उकल करण्यात मरिनड्राईव्ह पोलीस सध्या व्यस्त आहेत.


महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षित आणि अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज्य विधीमंडळाच्या परिसराला भ्रष्टाचार आणि तोतयेगिरीचे भगदाड पडल्याचे भीषण वास्तव गेल्या महिन्यात समोर आले होते. या प्रकरणात संशय बळावल्याने विधीमंडळाच्या सुरक्षा विभागाने मार्च महिन्याच्या मध्यातच या प्रकरणाचे धागे जुळवण्यास सुरुवात केली होती. त्यातूनच प्रत्यक्ष शासकीय यंत्रणांशी दुरान्वये संबंध नसलेला दत्तात्रय गुंजाळ नामक व्यक्ति मुख्यमंत्र्यांचा सल्लागार म्हणून विधी मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच नख लावत असल्याचे समोर आले. त्याची परस्पर चौकशी सुरु असतानाच त्याच्याकडून विधी मंडळातील दोघा वरीष्ठ लिपिकांसह चार शिपायांना हाताशी धरुन अधिवेशनाच्या कालावधीत वितरित होणार्‍या प्रेक्षक गॅलरीच्या प्रवेशपत्रांचा (पास) काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.


हा प्रकार म्हणजे अतिशय सुरक्षित समजल्या जाणार्‍या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणाराच असल्याने विधीमंडळ सुरक्षा प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेवून खोलवर तपास केला. त्यातून दत्तात्रय गुंजाळ नामक मुख्यमंत्र्यांचा तोतया सल्लागार फारशा चर्चेत नसलेल्या शासकीय विभागांच्या नावाने पत्रव्यवहार करुन अवाजवी संख्येने मोफत प्रवेशपत्र मिळवत असल्याचे समोर आले. त्यातूनच गेल्या महिन्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकृत लेटरहेडचा बनावट पद्धतीने वापर करुन तब्बल 30 प्रवेशपत्र मिळवण्यात आल्याचे समोर आले. या पत्राचा संपूर्ण प्रवास तपासला गेला असता चौकशी पथकाचे डोळेही पांढरे झाले. या गोरखधंद्यात केवळ खासगी व्यक्ति म्हणून दत्तात्रय गुंजाळच नव्हेतर विधीमंडळाच्या सेवेत असलेल्या दोघा लिपिकांसह चार शिपायांचा सहभाग असल्याचे व त्यांच्याकडून प्रवेशपासच्या संदर्भातील प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबवली जात असल्याचे व त्यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे स्पष्ट झाले.


सदरचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर विधीमंडळाच्या सुरक्षा विभागाने मरिनड्राईव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून तत्काळ कारवाई करीत मुख्यमंत्र्यांचा सल्लागार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून विधीमंडळाच्या सभागृहात वावरणार्‍या संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूरच्या दत्तात्रय केशव गुंजाळ (वय 53) याच्यासह त्याला साथ देवून शासकीय पगाराशिवाय अतिरीक्त मलिदा मिळवण्याची वृत्ती अंगी असलेल्या विधीमंडळाच्या सामान्य प्रशासन विभागातील लिपिक महेश पिराजी दुम्पलवार (फरार) व मनोज आनंदा मोरबाळे, शिपाई लवेश शंकर नाकटे (फरार), स्वप्निल रमेश तायडे, गणपत भाऊ जावळे व नागेश शिवाजी पाटील यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यातील पाचजणांना गजाआडही घातले.


सध्या अटक झालेले पाचही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून कधीपासून हा उद्योग सुरु होता, त्यांना कोणाचे राजकीय पाठबळ मिळत होते, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, आजवर कितीजणांना त्यांनी अशाप्रकारे बनावट पत्राद्वारे सभागृहात प्रवेश दिला, त्या बदल्यात त्यांच्याकडून काय मिळवण्यात आले, त्याचा वाटा कोणाकोणाला देण्यात येत होता अशा असंख्य प्रश्‍नांची उत्तरे मिळवली जात आहेत. यासोबतच आरोपी दत्तात्रय गुंजाळ आणि विधीमंडळातील कर्मचार्‍यांची जवळीक कोणाच्या मध्यस्थीने झाली याचाही तपास घेतला जात आहे.


सध्या पोलीस कोठडीत चौकशीचे सत्र सुरु असलेला दत्तात्रय केशव गुंजाळ (वय 53) हा या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून समोर आला असून संगमनेर तालुक्यातील एका नामचीन शिक्षणसंस्थेशी त्याचा थेट संबंध असल्याचेही उघड झाले आहे. याच शिक्षणसंस्थेच्या सरकारशी निगडीत कामांसाठीची कागदपत्रे घेवून तो विधीमंडळ आणि मंत्रालयात हेलपाटे मारीत असतं. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच त्याने आपला जम बसवल्याचेही आता समोर आले असून त्यावेळी त्याने वापरलेल्या राजकीय ‘वजना’ची नावेही सध्या पोलिसांच्या यादीत वरच्यास्थानी आहेत. त्यासोबतच दत्तात्रय गुंजाळ या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला बाहेरख्यालीचा मोठा शोक असल्यानेच त्याचा पाय गाळात रुतल्याचेही आता बोलले जावू लागले आहे. सध्या अटकेत असलेल्या पाचही जणांची पोलीस कोठडी सुरु असल्याने त्यांच्या चौकशीचा सविस्तर तपशिल समोर आलेला नाही, मात्र मिळालेल्या जेमतेम माहितीवरुन सदरचे प्रकरण अतिशय गंभीर आणि खोलवर असल्याचे स्पष्ट झाले असून मुख्यमंत्री कार्यालयाने संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे, त्यामुळे येणार्‍या काळात तोतयेगिरीच्या या प्रकरणाचे ओघळ कुठेकुठे जातील याची खमंग चर्चा सध्या विधीमंडळाच्या सुरक्षा वर्तुळात सुरु आहे.


अधिवेशनाच्या कालावधीत अडगळीतील शासकीय संस्थांच्या लेटरहेडचा वापर करुन मोठ्या प्रमाणात सभागृहात प्रवेश करण्यासाठी प्रवेशपत्र मिळवून त्याची विक्री करण्याच्या प्रकरणात उघड झालेला मुख्य सूत्रधार दत्तात्रय केशव गुंजाळ हा संगमनेर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या निगडीत असून त्याने याच शिक्षणसंस्थेच्या कामातून विधीमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेला सुरंग लावल्याचे आता उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे सदरचा आरोपी मूळ संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातील रहिवाशी असून त्याने गुंठेवारीतून आपल्या जमिनीची विक्री केली व नंतर तो निमगाव भोजापूरमध्ये वास्तव्यास गेल्याचेही उघड झाले आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या कुटुंबाला समाजात दानशूर म्हणून ओळख असून या परिवाराने ‘त्या’ शिक्षणसंस्थेला मोठी जागा दान दिल्याचीही चर्चा आहे. पोलीस तपासातही या मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत करण्यात आले असून या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Visits: 3 Today: 3 Total: 1642369

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *