वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या? तालुक्यातील मिर्झापूरची घटना; मयत तरुणीच्या पोटात चार महिन्याचा गर्भ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या वर्षभरापूर्वीच प्रेमविवाह झालेल्या आणि पोटात चार महिन्यांचा गर्भ असलेल्या तरुणीने सासरच्या घरातच ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील मिर्झापूर येथून समोर आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून मयतेच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने घातपाताचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होवू नये यासाठी एका वर्गाकडून दबावतंत्राचा वापर झाल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शवविच्छेदनास नकार दिला आहे. त्यामुळे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला संगमनेरात पाचारण करण्यात आले असून त्यांच्याकडून मयतेचे शवविच्छेदन केले जाणार आहे, त्यातून समोर येणार्या निष्कर्षानुसार पोलिसांकडून पुढील कारवाई होणार आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार शुक्रवारी (ता.26) सायंकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी तालुक्यातील मिर्झापूर येथे घडला. मूळ मंगळापूर येथे वास्तव्यास असलेल्या सायली पवार या तरुणीचा अवघ्या वर्षभरापूर्वी मिर्झापूर येथील अविनाश निवृत्ती वलवे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. शेतकरी कुटुंबातील सायली उच्चशिक्षित होती. आई-वडील, छोटे बहिण-भाऊ अशा खुशहाल परिवारात वाढलेल्या सायलीच्या मनाप्रमाणे त्यांचा विवाह लावून देण्यात आल्याने ती आनंदात राहील असेच तिच्या जन्मदात्यांना वाटले असणार. मात्र प्रत्यक्षात काय घडत होते याची कल्पना केवळ प्रेमावर भरवसा ठेवून कोणाचाही विचार न करता ज्याच्याशी आयुष्याचा धागा बांधला त्याच्या घरातच सोसणार्या सायलीलाच ठाऊक.
मयत सायलीची सासू सुभद्रा निवृत्ती वलवे हिने तालुका पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता.26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घराच्या दुसर्या मजल्यावरील शयनकक्षात खिडकीच्या चौकटीला ओढणी बांधून सायलीने आत्महत्या केली. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाने मृत्यू घोषित केल्यानंतर रात्री उशिराने मयतेचे पार्थिव पालिकेच्या शवविच्छेदनगृहात आणण्यात आले. आज सकाळी मयतेच्या पित्याने तेथे जावून आपल्या पोटच्या गोळ्याला शेवटदा बघितले आणि हंबरडा फोडला. लेकीसाठी बापाचा आक्रोश पाहून आसपास उपस्थित असलेलेही गहिवरुन गेले होते. सून्न झालेल्या या दुर्दैवी बापाला नंतर काहीजणांनी धीर देत विच्छेदनगृहाबाहेर नेले.
या दरम्यान तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी शवविच्छेदनगृहात येवून मृतदेहाची पाहणी केली असता मयत तरुणीच्या शरीरावर मारहाण केल्याचा जखमा आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात घातपात घडला असण्याची शक्यता नाकारलेली नाही. या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद होवून प्रकरण बंद व्हावे यासाठी एक ‘लॉबी’ रात्रीपासूनच दबावाचा वापर करीत असल्याची चर्चा आहे. मयत तरुणीचे वडील अतिशय साधारण शेतकरी आहेत. पोलीस निरीक्षकांनी संशय व्यक्त केला नसता तर कदाचित त्यांनाही हा प्रकार सरळसरळ आत्महत्येचाच वाटला असता. मात्र हे प्रकरण सरळ नसून यामागे घातपात असण्याचीच अधिक शक्यता असून ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी विच्छेदनासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला पाचारण करण्याचा सल्ला दिल्याने प्रवराच्या आठजणांच्या टीमकडून पालिकेच्या शवविच्छेदनगृहात मयत सायली अविनाश वलवेची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
शवविच्छेदन अहवाल समोर यायला अजून बराच वेळ लागेल, मात्र विच्छेदनातून मृत्यूच्या कारणांचा अंदाज येतो. त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर समोर येणार्या निष्कर्षानुसार गुन्हा दाखल होईल. अवघ्या वर्षभरापूर्वी लग्न झालेली सायली चार महिन्यांची गरोदरही होती. पोटात गर्भ असताना एखादी महिला असा टोकाचा निर्णय घेईल का?, तिने आत्महत्या केली तर, मग तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा कशा?, खिडकीच्या चौकटीला ओढणी बांधून आत्महत्या करता येईल का?, तिला आत्महत्या करण्याची वेळ का आली? या घटनेतून अशा अनेक प्रश्नांनी जन्म घेतला असून त्याच्या उत्तरातूनच अवघ्या तेवीस वर्षीय गर्भवती तरुणीच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार आहे.
प्रेमविवाह केलेल्या सायली वलवे (पवार) या मूळच्या मंगळापूरच्या तरुणीची पार्श्वभूमी अतिशय साधारण आहे. शेतकरी असलेल्या आई-वडीलांनी आपल्या दोन मुली आणि एकुलत्या एक मुलाला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. धाकटी असलेली सायली तर उच्चशिक्षित होती. शिक्षणादरम्यान तिचे मिर्झापूरच्या अविनाश निवृत्ती वलवेशी सूत जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. अवघ्या वर्षभरातच त्यांच्या प्रेमाचा जणू अंत झाल्यागत चार महिन्याचा गर्भ घेवून सायलीला आत्महत्या करावी लागली. या प्रकरणात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, मात्र काहीजणांकडून दबावतंत्राचा वापर करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. असल्या प्रकारांना पाठीशी घातले गेल्यास भविष्यात त्याचा सर्रास वापर होईल, जो समाज व्यवस्थेसाठी घातक ठरेल याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.