उंदिरगावातील एकाच कुटुंबातील दहा व्यक्तींना कोरोनाची बाधा श्रीरामपूर तालुक्यात सद्यस्थितीत पंचवीस सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील ग्रामीण भागातील उंदिरगाव येथे एकाच कुटुंबातील मंगळवारी (ता.16) दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले. सध्या तालुक्यात 25 कोरोनाबाधित रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर येथील दोन खासगी रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालय आणि बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

याबाबत उंदिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील राजगुरु यांनी दिलेल्या माहितीनुसार, उंदिरगाव परिसरातील हरेगाव रस्ता समोरील एका कुटुंबातील एक जण पुणे येथून प्रवास करुन घरी आल्यानंतर त्याला ताप आला. त्यानंतर त्याने निमगाव खैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून कोविड तपासणी केली. त्यात त्याच्यासह कुटुंबातील चौघेजण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, उंदिरगाव येथील प्राथमिक आरोग्य विभागाने सदर कुटुंबातील अन्य लोकांची कोविड तपासणी केली. त्यात सहाजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तपासणीनंतर सर्वांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहेत.

कोरोनाची भीषण लाट अनेक महिन्यानंतर टप्याटप्याने कमी होत असताना अनेक प्रयत्नानंतर लसही मिळाली. आणि टप्प्याटप्याने लसीकरणास सर्वत्र प्रारंभ झाला. प्रारंभी हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस दिली जात आहे. परंतु कोरोनाचा विसर पडल्याने नियमांचे पालन होत नाही. शहरासह ग्रामीण भागात सातत्याने गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग धिम्या पावलांनी पुन्हा वाढतो आहे. सर्व जनजीवन सुरळीतपणे सुरू होत असताना अचानकपणे राज्यातील अनेक भागात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या अनेक नागरिक सर्रास विनामास्कचे फिरत असल्याचे जागोजागी दिसून येते. बाजारात, बस स्थानकात, रेल्वे स्थानक परिसरासह शहरात सर्वत्र गर्दीच्या ठिकाणी विनामास्कचे नागरिक हमखास आढळून येतात. त्यातील अनेकजण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन खुलेआम थुंकतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे कोरोना विषाणू पूर्णपणे संपत नाही. तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा नियमित वापर करणे, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आपल्या घरास परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे बनले आहे. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमासह गर्दीच्या ठिकाणी मास्कचा नियमित वापर करा. कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे विसर पडू देऊ नका. बाहेरुन फिरुन आल्यानंतर न विसरता साबनाने स्वच्छ हात धुवा, साथीच्या रोगांपासून बचावासाठी पुरेशी खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
