पूर्वी योग्य असलेला रेल्वेमार्ग अचानक अयोग्य कसा ठरला? पालकमंत्र्यांचा माजीमंत्री थोरातांना सवाल; आमदार रोहीत पवारांवरही साधला निशाणा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करावा या मागणीसह जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी हा रेल्वेमार्ग मूळ संरचनेप्रमाणेच पूर्ण करण्याचा आग्रह धरला. त्यावरुन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘शंका’ उपस्थित करीत पालकमंत्र्यांनी नेमका कोणता नकाशा दाखवला असा सवाल करीत राजकीय भाष्य केले होते. त्याला पालकमंत्र्यांनीही प्रत्यूत्तर दिले असून राज्यसरकारच्या अर्ध्या हिश्शासह खासगी क्षेत्राच्या सहकार्यातून प्रस्तावित असलेल्या या रेल्वेमार्गात ‘जीएमआरटी’ची अडचण कशी उभी राहीली?, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मूळनकाशात कोणी बदल केला?, पूर्वी योग्य असलेला रेल्वेमार्ग दोन वर्षात अयोग्य कसा ठरला? असे प्रतिसवाल उपस्थित करीत जोरदार पलटवार केला. यावेळी त्यांनी आमदार रोहीत पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना; दुर्दैवाने काहीजण अजितदादांच्या अपघाताचे राजकीय भांडवल करीत असल्याची जहरी टीका केली. खरेतर राज्यातील जनतेला दादांना मुख्यमंत्रीपदाची संधी असतानाही ती कोणी नाकारली?, त्यांच्या हयातीत आज उठसूठ पत्रकार परिषदा घेणार्‍यांसह त्यांच्या ‘काकां’ची वागणूक कशी होती? याची उत्तरे मिळण्याची अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी जोरदार टोलाही लगावला.


गुरुवारी (ता.19) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील संगमनेरात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी पुणे-नाशिक रेल्वेमार्गावरुन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांच्या सोशल माध्यमातील ‘आपण राजकारणाचा ‘र’ही उच्चारलेला नसताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अजितदादांच्या अपघाताचे ओढूनताणून राजकारण तर करीत नाहीत ना?’ या शंकेलाही जोरदार प्रत्यूत्तर दिले. यावेळी त्यांच्यासमवेत संगमनेरचे आमदार अमोल खताळ व स्थानिक महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री विखे-पाटील यांनी रेल्वेच्या प्रश्‍नावर सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्यासोबतच्या भेटीत त्यांनी 2021 मध्ये झालेल्या रेखांकनानुसार जुन्नरजवळील ‘जीएमआरटी’ प्रकल्पाजवळून हा रेल्वेमार्ग जात असल्याचा नकाशा दाखवला. या प्रकल्पाचे जागतिक महत्त्व लक्षात घेवून सदरचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. प्रत्यक्षात मात्र पुणे-नाशिक रेल्वेप्रकल्पासाठी 2019 मध्ये महायुती सरकारने संगमनेर, अकोले, वीरगावमार्गे रेल्वेला मंजूरी दिली होती असा दावाही त्यांनी केला. या प्रकल्पाचे काम वेगाने व्हावे यासाठी राज्य सरकारने भूसंपादनाचा 50 टक्के वाटा उचलण्यासह एकूण प्रकल्प खर्चाची 60 टक्के रक्कम खासगी क्षेत्रातून कर्जाद्वारे उभारण्याचा निर्णय घेवून हा प्रकल्प राज्य सरकारच्या ‘महारेल’कडे सोपवला होता. त्यासाठी विशेष कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्तिही करण्यात आली होती याकडे त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला अचानक ब्रेक लागण्यासह त्याच्या मूळ नकाशात बदल केला गेल्यानेच हा प्रकल्प रेंगाळल्याचे सांगत एकप्रकारे त्यांनी त्याचे खापर अप्रत्यक्षपणे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावरच फोडले.


महायुती सरकारच्या काळातील निर्णयाप्रमाणे हा प्रकल्प पुढे नेल्यास ‘जीएमआरटी’ प्रकल्पाची अडचण येणार नसल्याचे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत मूळप्रस्ताव पडताळून पाहण्याचे आश्‍वासन दिल्याचा दावाही पालकमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी केला. पुणे-नाशिक व्हाया संगमनेर-अकोले या रेल्वेमार्गासाठी आपण आग्रही असल्याचे ठासून सांगताना त्यांनी पुढील आठवड्यात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आपण मुंबईत जाणार आहोत, त्यावेळी महारेल आणि रेल्वेच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी या प्रकल्पाच्या सर्व सर्वेक्षणाचे नकाशे सादर करण्याच्या सूचनाही दिल्या असून त्यातून नेमकी कोठे अडचण आहे हे पडताळण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी रेल्वेमंत्रालयाला नेमका कोणता प्रस्ताव सादर झाला, त्यांना प्रकल्पाबाबत नेमकी कोणती माहिती दिली गेली, पूर्वी योग्य असलेला रेल्वेमार्ग अचानक अयोग्य कसा ठरला, अचानक ‘जीएमआरटी’ची अडचण का उभी राहीली यासर्व शंकांचे निरसन ‘त्या’ बैठकीतून होणार असल्याचे सांगत त्यांनी रेल्वेमार्गावरुन उत्तेरत रंगणार्‍या भविष्यातील राजकारणाचेही संकेत दिले.


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार गेल्याकाही दिवसांपासून सातत्याने अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन घातपाताची शंका उपस्थित करीत आहेत. त्यावरुन माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एखाद्या दुर्घटनेचे राजकारण योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून आमदार पवार यांनी सोशल माध्यमातील एका पोस्टमध्ये ‘आपण राजकारणाचा ‘र’ ही उच्चारला नसताना जलसंपदामंत्री विखे-पाटील त्यात ओढूनताणून राजकारण तर करीत नाहीत ना?’ अशी शंका त्यांनी उपस्थित केली होती. त्याचाही मंत्री विखे-पाटील यांनी जोरदार समाचार घेतला.


यावेळी बोलताना त्यांनी अजितदादांच्या अपघाती निधनाची घटना राज्यासाठी दुःखदायकच आहे, सर्वांनाच त्याचे दुःख आहे. मात्र दुर्दैवाने आमदार रोहीत पवार ज्या पद्धतीने वारंवार ती घटना माध्यमांसमोर मांडीत आहेत, ते फार क्लेशदायक असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी अजितदादा हयात होते, त्यावेळी तुम्ही आणि तुमचे ‘काका’ त्यांच्यासोबत कसे वागलात? असा खडा सवाल करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्‍न उपस्थित केला. अजितदादांना तुम्ही कधीही सन्मान मिळू दिला नाही, असा घणाघाती आरोप करताना पालकमंत्र्यांनी काँग्रेसच्या राजवटीत राष्ट्रवादीला अधिक जागा मिळालेल्या असतानाही अजितदादांना मुख्यमंत्री करण्यास कोणी विरोध केला? असा रोकडा सवालही केला.


यावेळी त्यांनी अजितदादांच्या अपघाताचे राजकीय भांडवल करण्यापेक्षा दादांची मुख्यमंत्रीपदाची संधी कोणी हिरावली याचे उत्तर महाराष्ट्राला मिळण्याची गरज असल्याचे सांगत आमदार रोहीत पवार यांच्यावरही थेट निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, त्यांनी विमान अपघाताच्या निष्पक्ष चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. या उपरांतही पवार कुटुंबियांना सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी असे वाटत असेल तर, मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. शेवटी अजितदादा लोकनेते होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या अपघाताची सखोल माहिती मिळायलाच पाहिजे हिच आपली भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार रोहीत पवार यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया समोर येते याबाबतची उत्कंठा दाटली गेली आहे.


प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गावरुन सध्या उत्तरेतील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच हा रेल्वेमार्ग रद्द करण्याची घोषणा झाल्यापासूनच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पूर्वेकडील नेत्यांनी रेल्वे पळवल्याच्या वक्तव्यासह रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता नकाशा दाखवला असा प्रश्‍न करीत पालकमंत्री विखे-पाटील यांच्याभोवती संशयाचे कोंडाळे घातले होते. मात्र शिवजयंतीचे औचित्य साधून संगमनेरात आलेल्या पालकमंत्र्यांनी 2019 मध्ये मंजूर झालेल्या रेल्वेमार्गाचा नकाशा 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणी बदलला? असा जोरदार पलटवार करीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरच शंका उपस्थित केली आहे. त्यावरुन आगामी काळात उत्तरेतील राजकारण रंगात येण्याची शक्यता आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 1474060

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *