सफायर एक्स्पो म्हणजे संगमनेरकरांचा आनंदोत्सवच : तांबे लायन्स सफायरच्या ‘बिझनेस एक्स्पोला सुरुवात’; सहा दिवस घेता येणार खरेदीचा आनंद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दरवर्षी आयोजित होणार्या सफायर बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून जमलेले मंदीचे मळभ दूर होण्यास मदत होईल. सलग दीड दशकांपासून आयोजित होणार्या या उपक्रमाशी माझे जवळचे नाते आहे, ज्यावर्षी मी पहिल्यांदाच नगराध्यक्ष झाले तेव्हापासून मी या उपक्रमाचा एक भाग राहिले आहे. सहा दिवस चालणार्या एक्स्पोतून महिलांना खरेदीचा परिपूर्ण आनंद तर मिळेलच शिवाय येथे मनोरंजनासह खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल्सही असल्याने हा उपक्रम म्हणजे संगमनेरकरांसाठी आनंदोत्सवासारखाच असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले.

येथील लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरने आयोजित केलेल्या ‘सफायर बिझनेस एक्स्पो’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, उद्योजक योगेश धापटकर, लायन्स सफायरचे संस्थापक गिरीश मालपाणी, अध्यक्ष मीना मणियार, सचिव पूजा कासट, खजिनदार स्वाती मालपाणी, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिंवसरा, डॉ.रश्मी खिंवसरा व महेश डंग आदी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्षा मीना मणियार यांनी करुन लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरने आत्तापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
![]()
यावेळी पुढे बोलताना दुर्गा तांबे म्हणाल्या की, खरेदी हा महिलांच्या आनंदाचा विषय असतो. मात्र सफायर बिझनेस एक्स्पोमध्ये खरेदीसोबतच मनोरंजन आणि विविध खाद्यपदार्थांचेही स्टॉल्स असल्याने संपूर्ण कुटुंबानेच या उपक्रमात सहभागी व्हावे अशी त्याची रचना केली गेल्याने सहा दिवस चालणारा एक्स्पो म्हणजे संगमनेरकरांसाठी आनंद देणारी जत्राच ठरत असल्याचेही त्या म्हणाल्या. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे उद्योग-व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. या माध्यमातून स्थानिक उद्योगांना काहीसा दिलासा मिळणार असल्याने खरोखरी हा उपक्रम संगमनेरकरांसाठी लाभदायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रांतपाल कोठावदे यांनी आपल्या मनोगतामध्ये एखादा उपक्रमाचे सलग चौदा वर्ष आयोजित करणं ही सहज किंवा सोपी गोष्ट नसल्याचे सांगितले. बरेच उपक्रम सुरु झाल्यानंतर काही वर्षात त्यात बदल होतात, किंवा ते बंद होतात. मात्र लायन्स क्लब संगमनेर सफायरने ही धारणा पूर्णतः बदलून टाकली असून नवउद्योजकांना प्रोत्साहन देणार्या ‘सफायर बिझनेस एक्स्पो’चे व्यापक स्वरुपात दरवर्षी होणारे आयोजन येथील क्लबची ओळख बनल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे मागील चौदा वर्षांपासून दरवर्षी होणार्या या उपक्रमाची जागाही एकच आहे, या उपक्रमाचे नावही एकच आहे आणि दरवर्षी या उपक्रमाचे उद्घाटकही एकच आहे असं दुर्मीळ चित्र अभावानेच महाराष्ट्रात बघायला मिळेल. उदयोन्मुख उद्योजक व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार्या या उपक्रमात सफायरने व्यापारवृद्धी, व्यवसायाप्रती कटिबद्धता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधल्याचेही कोठावदे यांनी यावेळी सांगितले.

पोलीस निरीक्षक देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना महिलांच्या उत्थानाच्या चर्चा आपण दररोज ऐकतो, पण प्रत्यक्षात महिलांना संधी देणार्या संस्था मात्र कमीच असल्याची नेहमी तक्रार असल्याचे सांगितले. संगमनेरच्या संस्कृतीत मात्र अनेक संस्थांच्या माध्यमातून महिलांचे नेतृत्त्व ठळकपणे समोर आल्याचे बघायला मिळाल्याचेही ते म्हणाले. या उपक्रमातून नव्याने उद्योग सुरु करुन त्यासाठी बाजारपेठेच्या शोधात असलेल्या नवउद्योजकांसाठी चांगली संधी असल्याचे सांगत सफायर बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना मोठा वाव मिळाल्याचे चित्र खूप समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सफायरचे संस्थापक गिरीश मालपाणी यांनी यावेळी गेल्या चौदा वर्षांचा प्रवास विशद् केला. सामूहिक प्रयत्नांतून साकार होणारा हा उपक्रम प्रफुल्ल खिंवसरा आणि श्रीनिवास भंडारी या जोडीमुळे सुपरहिट ठरत असल्याचाही उल्लेखही त्यांनी केला. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनांचा स्वीकार करुन व देशातील यशस्वी उद्योजक, व्यावसायिकांची माहिती मिळवून त्यापासून प्रेरणा घ्या, परिश्रमाशिवाय फळ नसते, आज मेहनत घेतली तर उद्या यश आपल्या दारात असेल असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात भरला. सफायर बिझनेस एक्स्पोला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली असून बुधवारपर्यंत (ता.16) सकाळी 10 ते रात्री साडेनऊ पर्यंत तो सुरु राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
