पत्रकारावरील हल्ल्याचा संगमनेरात निषेध व्हॉइस ऑफ मीडियाचे डीवायएसपींना निवेदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
नेवासा येथील पत्रकार शंकर नाबदे यांच्यावर व त्यांच्या सोबत असलेल्या इतर तीन पत्रकार बांधवांवर स्थानिक पातळीवर भ्याड व अमानुष हल्ला करण्यात आला.
त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील पत्रकार सज्जाद हुसेन व त्यांच्या कुटुंबीयांवरही हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ  व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांच्या नेतृत्वात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि प्रांताधिकारी उंडे यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत नेवासा व अकोला येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांबाबत तत्काळ गुन्हे दाखल करावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी. पत्रकारांना संरक्षण द्यावे. हल्ल्यांची तातडीने स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक व हेल्पलाईन स्थापन करावी, पत्रकार संरक्षण कायद्यास तातडीने अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख, शहराध्यक्ष महेश पगारे, सचिव सचिन जंत्रे, सदस्य संजय अहिरे,आश्विन मुथा, चंद्रकांत महाले, सचिन मदने उपस्थित होते.
Visits: 468 Today: 2 Total: 2123912

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *