अहिल्यानगर एटीएसचा श्रीरामपूरमध्ये छापा! परदेशी हँडलरशी कनेक्शन असल्याचा संशय; चौघांची दहा तास कसून चौकशी..

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरात सुरु असलेल्या संवेदनशील घडामोडींचे पडसाद आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर दहशतवाद विरोधी पथकाने अत्यंत गोपनीय मोहीम राबवत श्रीरामपूर शहरातील तिघांसह तालुक्यातील एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्यांची तब्बल दहा तास कसून चौकशी करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास या चौघांनाही कडक अटींसह नोटिसा बजावून सोडण्यात आले असले, तरी या कारवाईमुळे शहरासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

या धक्कादायक कारवाईमागे अत्यंत गंभीर कारण असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. श्रीरामपूरमधील सागर उर्फ चन्या बेग यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हिंदुत्ववादी आणि अत्यंत कडक वक्तव्ये केली जात होती. या वक्तव्यांमुळे एका विशिष्ट वर्गात त्यांच्याविषयी तीव्र रोष निर्माण झाला होता. याच रोषाचा गैरफायदा घेत परदेशातील एका कुख्यात हँडलरने चन्या बेग यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे. या कटाचा भाग म्हणून जिल्ह्यातील सात तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट त्या परदेशी हँडलरच्या संपर्कात आले होते.

अहिल्यानगर एटीएसला या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच त्यांनी या सातही जणांवर गुप्त पाळत ठेवली होती. त्यापैकी चार जणांवरील संशय बळावल्याने त्यांना थेट चौकशीच्या फेऱ्यात ओढण्यात आले. या कारवाईमुळे बेग यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अहिल्यानगरच्या एटीएसच्या पथकाने ही संपूर्ण कारवाई अत्यंत गुप्तपणे केली. दुपारनंतरच या मोठ्या कारवाईची कुणकुण माध्यमांना लागली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले चारही संशयित अवघ्या २० ते २४ वयोगटातील तरुण असून, ते इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरुन परदेशी हँडलरच्या संपर्कात आले होते. एटीएसच्या पथकाने या चौघांचेही मोबाईल फोन तपासणीसाठी जप्त केले असून, त्यांच्या डिजिटल संभाषणाचा सखोल शोध घेतला जात आहे.

ताब्यात घेतलेल्यांमध्ये श्रीरामपूर शहरातील तीन आणि तालुक्यातील एका तरुणाचा समावेश आहे. तब्बल दहा तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर या चौघांनाही पोलिसांच्या परवानगीशिवाय शहराबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, पुढील तपासासाठी कडक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील या आंतरराष्ट्रीय कनेक्शनच्या धाग्यादोऱ्यांमुळे पोलीस प्रशासन आता कमालीचे सतर्क झाले आहे.

