महिना उलटूनही सेवा समितीचा परिणाम जाणवेना! संगमनेरकरांचा प्रवास जीवघेणाच; घोषित ‘रोडमॅप’ कागदावरच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सत्तेच्या विरोधातील वातावरणात विकासाचे चित्र दाखवित विक्रमी विजयासह पालिकेचे सभागृह नियंत्रणाखाली ठेवणार्या संगमनेर सेवा समितीला निवडणुकीत केलेल्या घोषणांचा विसर पडलाय की काय अशी शंका आता उपस्थित होवू लागली आहे. गेल्या साडेतीन दशकांच्या सत्ताधार्यांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नामोनिशाणाशिवाय लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘संगमनेर 2.0’च्या संकल्पनेतून पुढील 50 वर्षांच्या विकसित शहराचे दिव्य स्वप्नं दाखवण्यात आले. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखल्याचे मतदारांना पटवून देण्यातही सत्ताधारी गटाला यश आल्याने त्याचे ठळक प्रतिबिंब निवडणूक निकालातून उमटले. महिन्याभरापूर्वी झालेल्या शपथ सोहळ्यातून जाहीरनाम्याच्या वचनपूर्तीचे अभिवचनही देण्यात आले, मात्र त्या उपरांतही प्रत्यक्षात कोणताच बदल झाल्याचे दिसत नसल्याने घोषित ‘रोडमॅप’चे काय असा प्रश्न सामान्य संगमनेरकरांना पडला आहे. शपथविधीनंतरच्या महिन्याभरात शहरातील खड्डेमय रस्ते चकाचक होतील, स्वच्छतेच्या समस्या संपतील, रस्त्यांवरील बेशिस्तीला चाप लागून अतिक्रमणं नियंत्रणात येतील, सिग्नल व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरु होवून वाहतुक व्यवस्थेला वळण लागेल अशी आशा सेवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देणार्या भाबड्या मतदाराला होती, मात्र ती देखील आता निवडणूक घोषणाच ठरते की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

यंदाची पालिका निवडणूक विविध कारणांनी लक्षवेधी ठरली. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चार दशकांच्या राजकीय सिंहासनाला धक्का देत महायुतीच्या अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवला. या निवडणुकीत झालेल्या मतदानाचे विश्लेषण करता गेल्या आठही निवडणुकांमध्ये माजीमंत्री थोरात यांना चढत्याक्रमाने मताधिक्क्य मिळत गेल्याचे दिसते. त्याउपरांतही 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने त्यांचे गेल्यावेळचे 65 हजारांचे मताधिक्क्य ओलांडून त्यांचा 12 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. हा निकाल तब्बल चार दशकांनंतर संगमनेरात परिवर्तनाचा झेंडा फडकवणारा ठरल्याने त्याचे परिणाम दीर्घकालीन दिसतील असा कयास बहुतेक सर्वच राजकीय जाणकारांनी लावला होता.

अशा वातावरणातच गेल्या वर्षीच्या शेवटी पालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली. विधानसभेतील यशाने मनोबल उंचावलेले असल्याने सुरुवातीला पालिका निवडणुकांचे वातावरण महायुतीसाठी पोषक असल्याचे चित्र होते. माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी इच्छुकांचा मेळावा घेत त्यात हवाही फूंकली. महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय होवून सुकाणू समित्यांचा फार्सही राबवला गेला. प्रत्यक्षात मात्र उमेदवारांची घोषणा करतांना तिनही पक्षातील विस्कळीतपणा समोर येवून राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे वेगळी वाट निवडल्याने अनुकूल वातावरणाला गोलबोटं लागले. त्यातही नगराध्यक्षपदासाठी विद्यमान आमदारांनी आपल्याच परिवारातील व्यक्तिचे नावं जाहीर केल्याने त्याच क्षणी वातावरण फिरले.

दुसरीकडे विधानसभेतील पराभवानंतर पालिकेतील सलग सत्तेच्या कारणाने निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणाचा पूर्वानुमान लावून सत्ताधारीगटाने साडेतीन दशकांच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदा कॉग्रेस पक्षाच्या नामोनिशाणाशिवाय आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडे निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सोपवली. त्यांनी संगमनेरच्या पुढील 50 वर्षांच्या विकासाची ब्लू-प्रिंट तयार करुन त्यावर आधारीत ‘संगमनेर 2.0’ही विकासाची नवसंकल्पना मांडली. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे अभिवचन देत त्यांनी कामाचा रोडमॅपही मांडला. ऐतिहासिक शहराची ओळख निर्माण करणार्या खुणा जोपासण्यापासून खड्डेमय रस्ते, बेशिस्त वाहतूक आणि प्रचंड अतिक्रमणातून चुटकीसरशी दिलासा देण्याचे आश्वासन दिले गेले. त्यामुळे संगमनेरकरांच्या मनात विकासाचे नवचित्र निर्माण होवून त्याचे रुपांतर मतदानात दिसून आल्याने संगमनेर सेवा समितीने विक्रमी यश मिळवताना पालिकेच्या सभागृहावर आपले संपूर्ण नियंत्रण कायम राखले.

महिन्याभरापूर्वी 3 जानेवारीरोजी नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांचा शाही शपथविधी सोहळाही पार पडला. त्यावेळीही समितीच्या अन्य नेत्यांसह या विक्रमी विजयाचे शिल्पकार आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘संगमनेर 2.0’च्या अनुषंगाने जाहीर भाष्य करीत त्याची पूर्तता करण्याच्या आपल्या पूर्वघोषणेचा पुनरुच्चार केला, त्यामुळे पुढील महिना-पंधरा दिवसांतच संगमनेरात बहुतेक खड्डेमय रस्ते तातडीने चकाचक होतील, स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी दिसेल, रस्त्यांवरील बेशिस्तीला चाप लागून जागोजागी बोकाळलेली अतिक्रमणं, वाट्टेल तसे पसरलेले जीवघेणे भाजीबाजार या गोष्टींवर नियंत्रण येईल, सिग्नल व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरु होवून वाहतुक व्यवस्थेला वळण लागेल अशा लागलीच होवू शकणार्या गोष्टी पूर्ण होतील असे सामान्य संगमनेकराला वाटले होते. प्रत्यक्षात मात्र ‘शपथविधी’ सोहळा पार पडून महिना उलटला तरीही संगमनेरची स्थिती जैसे थे असल्याने ‘संगमनेर 2.0’ निवडणुकीचा ‘जुमला’ तर ठरणार नाही? अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात घर करु लागली आहे.

पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधार्यांच्या विरोधात प्रचंड रोष असतानाही आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘धुरंधर’ संघर्ष करीत मतदारांना विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक विचार करण्यास भाग पाडले. ‘संगमनेर 2.0’च्या माध्यमातून त्यांनी केलेल्या घोषणा 50 वर्षांनंतरच्या विकसित शहराचे चित्र दाखवणार्या ठरल्याने संगमनेरकरांनी त्यावर भरवसा ठेवून संगमनेर सेवा समितीला विक्रमी मताधिक्क्याने सत्ता सोपवली. त्यामुळे जबाबदारी वाढलेल्या समितीच्या पदाधिकार्यांना निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागावे लागणार आहे. रस्ते, स्वच्छता, अतिक्रमण व वाहतूक या गोष्टी पालिकेसाठी नियमित कामकाजाचा भाग आहेत. त्यातही होणारा विलंब ‘संशय’ निर्माण करणारा ठरत असून निवडणुकीतील आश्वासने राजकीय जुमला ठरु नयेत अशी अपेक्षा आहे.

