उच्चांकी रुग्णवाढीसह संगमनेरात कोविडने घेतला तिघांचा बळी! व्यापार्यांच्या पुढाकारातून आजच्या ‘जनता कर्फ्यूला’ही नागरिकांचा मोठा प्रतिसाद..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू होवून आजचा तिसरा दिवस उजेडूनही रुग्णगतीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसून आजतर आजवरच्या सर्व संख्या मागे टाकीत जिल्ह्याने रुग्णसंख्येचा नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे ‘कठोर निर्बंधातून’ काहीही साध्य होणार नसल्याचेही स्पष्ट होत असून कडकडीत लॉकडाऊनशिवाय कोविडची साखळी तोडणे अशक्य असल्याचे जाणकारांचे मत बनले आहे. आजही जिल्ह्यात उच्चांकी 3 हजार 280 रुग्ण आढळून आले. तर संगमनेरात 184 आणि अकोल्यात 137 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या 11 हजार 544 झाली असून जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 32 हजार 537 झाली आहे. शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील दोघांसह नाशिक जिल्ह्यातील एकाचा संगमनेरात कोविडने बळीही घेतला आहे.
सध्या राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरु आहे. मात्र अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली डझनभर आस्थापनांना सुट देण्यात आल्याने लागू असलेले निर्बंध कूचकामी ठरले आहेत. जिल्ह्यात दररोज समोर येणार्या उच्चांकी रुग्णसंख्येतूनही ही गोष्ट स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे संगमनेरातील व्यापारी असोसिएशन या संघटनेने आपल्या किराणा मालाच्या व्यापारी सदस्यांना दिवसाआड दुकाने सुरु ठेवण्याची सूचना केली होती. त्यानुसार संगमनेरात आज जनता कर्फ्यु पाळला जात आहे. मात्र तरीही शहरातील मेडिकल दुकाने सुरुच असल्याने काही नागरिक किरकोळ कारणांसाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसत असून पोलिसांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी लागत आहे.
आजही शासकीय प्रयोगशाळेच्या 798, खासगी प्रयोगशाळेच्या 808 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 1 हजार 674 अशा जिल्ह्यातील उच्चांकी 3 हजार 280 रुग्ण समोर आले असून त्यात सर्वाधीक 887 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातून समोर आले आहेत. त्या खालोखाल नगर ग्रामीणमधून 341, राहाता 280, कर्जत 236, श्रीरामपूर 189, राहुरी 186, संगमनेर 184, शेवगाव 164, कोपरगाव 152, अकोले 137, पारनेर 101, पाथर्डी 98, नेवासा 95, भिंगार लष्करी परिसर 68, इतर जिल्ह्यातील 55, जामखेड 48, श्रीगोंदा 46 व लष्करी रुग्णालयातील 13 जणांचा समावेश आहे. आजच्या उच्चांकी रुग्णवाढीने जिल्हा आता 1 लाख 32 हजार 537 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
आज संगमनेर व अकोले शहरातही उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेच्या 50, खासगी प्रयोगशाळेच्या 73 व रॅपीड अँटीजेनद्वारा 61 अशा संगमनेरातील 184 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून तालुक्याची रुग्णसंख्या आता 11 हजार 544 वर पोहोचली आहे. तर तालुक्यातील तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या शहरातील एक, ग्रामीण भागातील एक व नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील एका तरुणाचा कोविडने बळी घेतला आहे. त्यामुळे तालुक्याच्या कोविड मृतांच्या संख्येतही आज तीन जणांची भर पडून एकूण मृतांचा शासकीय आकडा आता 73 वर पोहोचला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 15 एप्रिलपासून कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरु आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम गेल्या दोन दिवसांत दिसून आला नव्हता, मात्र संगमनेर व्यापारी असोसिएशनने दिवसाआड किराणा मालाची दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे स्पष्ट परिणाम आज संगमनेरात दिसून आले. अनेकांनी आजच्या दिवसातील रस्त्यावरील सामसुम पाहून गेल्यावर्षीच्या ‘लॉकडाऊन’मधील आठवणींना उजाळा दिला. संगमनेर शहर पोलिसांनीही शहरात सर्वत्र बंदोबस्त ठेवून विनाकारण भटकणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने शहरातील सर्वच रस्ते आज निर्मनुष्य जाणवत असल्याचे दिसून आले.
मात्र उद्या पुन्हा सर्वकाही ‘अत्यावश्यकच्या’ नावाखाली सुरु होणार असल्याने या ‘बंद-चालू’ पद्धतीचा कोविडच्या संक्रमणावर कोणताही परिणाम होेणार नसल्याचे जाणकांराचे स्पष्ट मत आहे. असेच सुरु राहील्यास अखेर पंधरा दिवसांच्या निर्बंधानंतर पुन्हा लॉकडाऊनचा सामना करण्याचा प्रसंगही समोर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्थानिक व्यापार्यांनी उद्याचा विचार करुन आजच नियमांचे पालन केल्यास व प्रशासनास सहकार्य केल्यास लॉकडाऊन टाळता येईल असेही अनेकांचे मत आहे. ते प्रत्यक्षात उतरेल का याबाबत मात्र साशंकता आहे.