सुसंस्कृत राजकारण आणि बदलत्या समीकरणांच्या कात्रीत अडकलेले ‘युवा’ नेतृत्व! आमदार सत्यजीत तांबे यांचे राजकीय ‘द्वंद्व’; सत्तासंघर्ष, विचारधारा आणि अस्तित्वाची लढाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळत आहेत. निष्ठा, बंडखोरी आणि राजकीय अपरिहार्यता यांच्या त्रिवेणी संगमावर अनेक नेते उभे आहेत. यातीलच एक नाव म्हणजे आमदार सत्यजीत तांबे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून सुरु झालेला त्यांचा ‘अपक्ष’ प्रवास आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे त्यांच्या प्रत्येक विधानाचे आणि कृतीचे राजकीय अर्थ शोधले जात आहेत. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे कल पाहता त्यांनी केलेले ताजे ट्विट केवळ एका प्रक्रियेचे समर्थन नसून, त्याकडे त्यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेचे निदर्शक म्हणून पाहिले जात आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांना काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले. थोरात यांची ओळख राज्यात एक संयमी आणि काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिलेले नेते अशी आहे. अशा घरात वाढलेल्या सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली. मात्र, नाशिक पदवीधर निवडणुकीच्या वेळी जो तांत्रिक आणि राजकीय पेच निर्माण झाला, तिथेच खर्या अर्थाने तांबे यांच्या राजकीय प्रवासाला वेगळी दिशा मिळाली. तो कौटुंबिक कलह नव्हता, तर ती एका तरुण नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेची आणि पक्षीय चौकटीची लढाई होती.

निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणार्या नेत्यांना उद्देशून आमदार तांबे यांनी केलेले ट्विट लोकशाहीच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. पराभवाचे खापर प्रक्रियेवर फोडण्यापेक्षा जनतेचा विश्वास संपादन करणार्यांचा सन्मान व्हावा, ही त्यांची भूमिका एक सुजाण लोकप्रतिनिधी म्हणून योग्यच ठरते. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, हे विधान अशा वेळी येते जेव्हा भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात प्रबळ आहे, तेव्हा त्याचे अर्थ ‘भाजपशी वाढलेली जवळीक’ असे काढले जातात. हे ट्विट म्हणजे एका बाजूला प्रशासकीय व्यवस्थेवर दाखवलेला विश्वास आहे, तर दुसर्या बाजूला सत्ताधार्यांशी सुसंवाद साधण्याचा एक प्रयत्नही असू शकतो.

गेल्या दोन वर्षांपासून आमदार सत्यजीत तांबे विधानपरिषदेत ‘अपक्ष’ म्हणून वावरत आहेत. तांत्रिकदृष्ट्या ते कोणत्याही पक्षाशी बांधिल नसले तरी, विकासकामांसाठी त्यांना सत्तेच्या प्रवाहाशी जुळवून घेणे भाग पडते. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या निकट जाणे ही एका लोकप्रतिनिधीची गरज असू शकते. मात्र, याच गरजेतून ‘विचारधारेची फारकत’ होते की काय, अशी शंका त्यांच्या मूळ समर्थकांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे. तांबे यांच्यासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान हेच आहे की, आपली स्वतंत्र ओळख जपताना मामा बाळासाहेब थोरात यांच्या निष्ठेला धक्का न लावता आपली नवी राजकीय वाट कशी चोखाळावी?

आजचे राजकारण केवळ विचारधारेवर न चालता ते ‘रिझल्ट ओरिएंटेड’ झाले आहे. तरुण पिढीतील नेते अधिक वास्तववादी विचार करताना दिसतात. सत्यजीत तांबे यांचा प्रवासही याच दिशेने जात असल्याचे दिसते. जर काँग्रेसमध्ये त्यांना अपेक्षित संधी किंवा सन्मान मिळत नसेल, तर पर्याय शोधणे हा लोकशाहीतील त्यांचा अधिकार ठरतो. भाजपमधील वरिष्ठ नेतृत्वाशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध भविष्यातील मोठ्या राजकीय बदलाची नांदी असू शकतात. पण हा बदल करताना त्यांना आपल्या मूळ मतदारांना आणि थोरात प्रेमी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे भाग पडणार आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांचा सध्याचा काळ हा ‘वेट अँड वॉच’चा आहे. एका बाजूला त्यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई आणि दुसर्या बाजूला भाजपचा दरवाजा अशा स्थितीत तांबे यांचा प्रत्येक शब्द मोजून-मापून येत असतो. आज राज्यातील 29 महापालिकांचे निकाल जाहीर होत असून मुंबईसह राज्यातील बहुतेक ठिकाणी भाजप आणि महायुतीचे प्राबल्य बघायला मिळत आहे. अशावेळी त्यांनी केलेले ट्विट दर्शवते की, त्यांना आता नकारात्मक राजकारणापेक्षा ‘सकारात्मक आणि विकास केंद्री’ राजकारणाचे नेतृत्व करायचे आहे. यात ते यशस्वी होतात की नाही, हे येणारा काळच ठरवेल; परंतु त्यांच्या या प्रवासाने महाराष्ट्राच्या राजकारणात ‘निष्ठा विरुद्ध प्रगती’ असा एक नवीन चर्चेचा विषय नक्कीच सुरु केला आहे हे निश्चित.

अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांची भूमिका केवळ एका पक्षातून दुसर्या पक्षात जाण्यापूरती मर्यादित नाही, तर ती एका प्रस्थापित राजकीय वारशातून बाहेर पडून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची धडपड आहे. या धडपडीत ते ‘कमळ’ हाती घेतात की पुन्हा ‘हाता’ला बळकटी देतात, यावरच त्यांच्या नेतृत्वाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र आजच्या त्यांच्या ट्विटने त्यांचा पुढील राजकीय प्रवास भाजपच्या रस्त्यावरुनच घडण्याचे संकेत मिळत असून महापालिकांच्या निकालांनी त्यांच्या राजकीय भूमिकेच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा दिली आहे.

